वसंतदादा नसते तर तटकरेंच राजकीय करियर सुरु होण्या आधीच संपून गेलं असतं..

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात सर्वात गाजलेला वाद म्हणजे माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील. दोघेही दिग्गज नेते. एक होता अत्यंत हुशार बॅरिस्टर, गांधी घराण्याचा विश्वासू, आपल्या तडफदार निर्णयासाठी फेमस असलेला नेता तर दुसरा म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा लाडका, सहकारावर जबरदस्त पकड असलेला लोकनेता.

या दोघांनी केलेली ईर्ष्या आणि स्पर्धा महाराष्ट्राच्या राजकारणावर चांगला वाईट परिणाम करून गेली. मात्र याच स्पर्धेत अनेक कार्यकर्ते भरडले गेले हे निश्चित.

असाच किस्सा एका तरुण कार्यकर्त्याचा. त्यांचं नाव सुनील तटकरे.

सुनील तटकरे रायगड जिल्ह्यातील कोलाडचे. त्यांच शिक्षण पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं. पण  वडील दत्ताजी तटकरे हे काँग्रेस पक्षातून राजकारणात सक्रिय असल्यामुळे सुनील तटकरे यांचाही ओढा राजकारणाकडे होता. दत्ताजी यांनी सरपंच पदापासून ते जिल्हापरिषद सदस्यांपर्यंत मजल मारली होती. अनेकदा त्यांच्या दौऱ्यात गाडीचे ड्रायव्हर म्हणून सुनील तटकरे सोबत असायचे. याच प्रवासादरम्यान त्यांनी राजकारणाचे धडे तटकरे यांनी गिरवले. 

पुढे वडिलांचं अपघाती निधन झालं आणि सुनील तटकरे यांना स्वतः राजकरणात यावं लागलं.

नेमका हाच काळ बॅरिस्टर अंतुले आणि वसंत दादा पाटील या दोन दिग्गजांच्या संघर्षाचा होता. वसंतदादा पाटलांच्या प्रयत्नातूनच धडाकेबाज अंतुलेंचं मुख्यमंत्रीपद गेलं. पुढे त्यांचेच समर्थक असलेले बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री बनले पण दादांनी त्यांचीही डाळ शिजू दिली नाही. 

अखेर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांची मागणी व वाढती राजकीय अस्थिरता पाहून इंदिरा गांधींनी वसंतदादा पाटलांनाच मुख्यमंत्री केलं.

लवकरच दादांनी अंतुलेंचे पंख कापण्यास सुरवात केली. १९८४ सालच्या लोकसभा निवडणुका आल्या. इंदिराजींची हत्या झाल्यानंतर काँग्रेसने राजीव गांधी यांना आपला नेता म्हणून निवडलं होतं. सर्वत्र त्यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट पसरली होती. 

महाराष्ट्रात लोकसभेचे तिकीट वाटप सुरु होतं. अंतुलेंनी आपल्या नेहमीच्या कुलाबा मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरु केली होती. पण वसंतदादांनी त्यांचं तिकीट कापण्यात यश मिळवलं. अंतुले भडकले. त्यांनी चक्क काँग्रेसच्या विरोधात जाऊन कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली.

शेतकरी कामगार पक्षातर्फे दि. बा. पाटील, काँग्रेसकडून अंबाजी तुकाराम तथा ए. टी. पाटील आणि या दोन्ही उमेदवारांच्या विरोधात अपक्ष म्हणून ए. आर. अंतुले असे चित्र त्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात तयार झाले आणि तिन्ही उमेदवारांनी रायगड जिल्हा ढवळून काढण्यास सुरुवात केली. तिघांकडूनही हजारो कार्यकर्ते निवडणूक मैदानात जणू आपलीच निवडणूक असल्यासारखे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आणि सारा रायगड जिल्हा राजकीय अभिनिवेशाने ढवळून निघाला. 

वसंतदादा पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. स्वतः शालिनीताई पाटील रायगड जिल्ह्यात पंधरा दिवस तळ ठोकून होत्या.

या बहुचर्चित निवडणुकीत ए. आर. अंतुले यांच्या निवडणूक प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी तटकरे यांच्यावर होती. रायगड जिल्हा युवक काँग्रेसचं काम तटकरेंनी अंतुलेंच्या हाताखाली केलं असल्यामुळे त्यांचा प्रचार करणे हे भाग होतं. 

या चुरशीच्या निवडणुकीत अपक्ष उभे असलेले अंतुले आणि काँग्रेसचे उमेदवार ए.टी.पाटील या दोघांचाही पराभव झाला. दोघांच्या भांडणात शेकापचे दि.बा.पाटील सहज निवडून आले.

 काँग्रेसची लाट असूनही हा पराभव झाला हे पक्षश्रेष्ठींना लाजिरवाणं वाटलं. प्रदेश काँग्रेसने अंतुले यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई सुरू केली. ठरावीक काळासाठी त्यांना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले. अंतुले यांच्यापाठोपाठ सुनील तटकरे यांच्याविरुद्धही कारवाईचा बडगा उगारण्यात आला. तेव्हाचे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुरुदास कामत यांनी पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

सुनील तटकरे यांची राजकीय कारकीर्द सुरु होण्या आधीच संपण्याची भीती निर्माण झाली. 

तटकरे घाबरत घाबरत मुंबईला मुख्यमंत्री निवासमध्ये वसंतदादांच्या भेटीला आले. दादांचे स्वीय सहाय्यक यशवन्तराव हाप्पे यांच्याशी तटकरे यांची चांगली ओळख होती. सुनील तटकरे यांना दादांची भेट घालून देण्यात आली.

वसंतदादा आणि दत्ताजी तटकरे यांचा चांगला परिचय होता. त्यांनी सुनील तटकरेंना पाहता क्षणी विचारलं,

“तू दत्ताचा मुलगा ना ? तू अशी कशी काय चूक केलीस ?”

तटकरेंनी खाली मान घातली. अंतुले जिल्ह्याचे नेते होते म्हणून त्यांचा प्रचार केला असल्याचं सांगितलं.  वसंतदादा पाटलांनी पुन्हा अशी चूक करू नको असं सांगितलं. तटकरेंनी मान डोलावली. दादांनी लगेच गुरुदास कामत यांना फोन केला आणि म्हणाले,

‘सुनील तरुण आहे. त्याने अंतुलेंचा प्रचार केला असला तरी तो आपलाच माणूस आहे. त्याच्यावर कारवाई करून त्याचे राजकारण संपवू नका.’ 

पुढे १९८५ सालच्या विधानसभा निवडणुका आल्या. दादांनी सुनील तटकरे यांना पुन्हा बोलावून घेतलं आणि त्यांना सांगितलं आमदारकीची तयारी सुरु करा. नुकताच दत्ताजी तटकरे यांचं निधन झालं होतं. सुनील तटकरे यांच्याकडे आर्थिक पाठबळ देखील नव्हतं. पण वसंतदादा यांनी आग्रहाने त्यांना माणगाव इथे उभं केलं.

या निवडणुकीच्या प्रचारावेळी स्वतः राजीव गांधी महाड येथे आले होते. प्रचारसभा झाल्यावर ते पुढच्या सभेला निघाले तेव्हा सुनील तटकरे त्यांना निरोप देण्यासाठी जिल्ह्यातील इतर नेत्यांसोबत आले.  मुख्यमंत्री वसंतदादा देखील राजीव गांधींच्या सोबत जाणार होते. पण अचानक त्यांना सुनील तटकरे यांच्या चेहऱ्याकडे पाहून चिंता जाणवली. 

दादांनी तटकरेंना हेलिकॉप्टरच्या मागे बोलावलं. काही न बोलता आपल्या बंडीच्या खिशात हात घातला आणि दहा हजारांचं बंडल उचलून तटकरेंच्या खिशात कोंबलं. 

सुनील तटकरे म्हणतात वसंतदादांनी दिलेले पैसे महत्वाचे नव्हते पण त्यांच्या त्या कृतीतून मिळालेलं बळ शेकडो हत्तींपेक्षा जास्त होतं. या निवडणुकीपासून सुनील तटकरे नावाचा कार्यकर्ता राजकारणात नेता म्हणून पुढं आला.      

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.