अस्सल राज्यपाल नियुक्त : वसंत देसाई

कला, साहित्य, विज्ञान, क्रिडा, सहकार, समाजसेवा अशा क्षेत्रामधील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून विधानपरिषदेत राज्यपालांमार्फत १२ सदस्यांची नियुक्ती करण्यात येते. लहानपणापासून नागरिकशास्त्राच्या पुस्तकात आपण हेच वाचत आलेलो आहोत.

महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० साली झाली. महाराष्ट्रात द्विस्तरीय विधीमंडळ आहे. पैकी विधानपरिषदेत स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, विधासभेतील आमदारांचे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रतिनिधी निवडून जातात तर राज्यपालांकडून विविध क्षेत्रातील १२ सदस्यांची कलम १७१/ नुसार नियुक्ती होते.

हे सगळं झालं नागरिकशास्त्र, जे आपण विसरून टाकू आणि प्रॅक्टिकल मुद्यांवर येवू…

महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर दर सहा वर्षांनी जे १२ सदस्य निवडले जातात अशा व्यक्तींची आजतागायत एकूण संख्या होते १०६. आत्ता गंम्मत अशी की या १०६ पैकी १२-१३ व्यक्तीच वास्तविक त्या त्या क्षेत्राशी संबधित होत्या.

१०६ मधून निवडक १५-१६ वजा केले तर उर्वरीत ९० जण फक्त राजकीय पुनर्वसनासाठी आमदार झालेले.

असो तर अशाच १५-१६ जणांची माहिती घेण्यासाठी आपण ही सिरीज सुरू करतोय,

याच नाव आहे, अस्सल राज्यपाल नियुक्त.

या सिरीजमधलं  तिसरे नाव आहे ते सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई. 

भारतीय कीर्तीचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक. सर्कासीमध्ये जाणारा मुलगा ते आभिनेता आणि त्यानंतर सुमारे ४५ हिंदी व २० मराठी चित्रपट आणि १० मराठी नाटके यांना संगीत देवून ते अजरामर करणारा संगीतकार असा काहीसा त्यांचा प्रवास. आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर भारत सरकारचा नागरी सन्मान ‘पद्मश्री’आणि सोबतच इतर अनेक राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारे संगीतकार वसंत कृष्णाजी देसाई.

मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनवडे गावचे. त्यांची आई मुक्ताबाई यांना कीर्तनाची गोडी. तर मुक्ताबाईंचे वडील आबा भास्कर परुळेकर हे देखील प्रसिद्ध कीर्तन होते. त्यामुळे लहानपणापासून घरात आणि गाव देवळात होणार्‍या भजन-कीर्तनांमुळे त्यांना संगीतात रुची निर्माण झाली.

त्यातच गावात एक सर्कस आली; ती पाहिल्यावर त्यांना सर्कशीत कामे करून लोकांना आनंद द्याव  असे वाटू लागले. त्यासाठी त्यांनी १९२९ मध्ये कोकण सोडले व कोल्हापूरला त्यांचे काका नरहरी यांच्याकडे आले. सर्कसमध्ये काम मिळाले नाही पण प्रभात फिल्म कंपनीत नोकरी मिळाली.

सुरुवातीला काही दिवस मूकपटांतून किरकोळ भूमिका केल्या. त्याच सुमारास १९३१ मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या अयोध्येचा राजा या पहिल्या बोलपटात त्यांनी पहिल्यांदा संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांचे साहाय्यक म्हणून काम केले.

कोल्हापुरातील वास्तव्यात ते गायन समाज देवल क्लब या संगीत संस्थेत जात असत. तेथे त्यांना शास्त्रीय संगीतातील दिग्गज उस्ताद अलाउद्दीनखाँ, उस्ताद अब्दुलकरीमखाँ, उस्ताद मंजीखाँ आणि रामकृष्णबुवा वझे यांचा सहवास लाभला. परिणामी त्यांची शास्त्रीय संगीतातील रूची वाढली.

पुढे १९३४ साली कंपनी कोल्हापूरहून पुण्याला आल्यावर वसंत देसाई ही पुण्यात आले आणि त्यांना मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर व केशवराव भोळे या दोन दिग्गज संगीतकारांचा सहवास लाभला. तेथेच वसंतराव संगीतातले स्वर, तान, फिरकी, आणि रसानुकृत भावदर्शन शिकले.

प्रभातच्या गाजलेल्या चित्रपटांच्या काही चाली व बरेचसे पार्श्वसंगीत वसंत देसाई यांचे आहे. त्याच वेळी त्यांनी कंपनीच्या धर्मात्मामधील ‘राणू महार’ आणि संत ज्ञानेश्वरमधील ‘भैरू गाडीवान’ चित्रपटांतून भूमिकाही केल्या. इथेच त्यांनी इनायत खाँसाहेब यांच्याकडे शास्त्रोक्त संगीताची साधना केली.

१९३९ मध्ये ते प्रभात फिल्म कंपनी सोडून मुंबईला आले. १९४३ मध्ये व्ही. शांताराम यांच्या राजकमल कला मंदिराच्या शकुंतला या चित्रपटापासून  त्यांचा स्वतंत्र संगीत दिग्दर्शन म्हणून प्रवास चालू झाला. नंतर ३२ वर्षे जवळपास ६५ हिंदी-मराठी चित्रपटांचे ते संगीत दिग्दर्शक होते. चित्रपट-नाटकांशिवाय त्यांनी बालगीतांना आणि समरगीतांनाही संगीत दिले. त्यांच्या सुंदरा मनामध्ये भरली, घनश्याम सुंदरा, सांगा मुकुंद कुणी हा पाहिला, छडी लागे छमछम, भरजरी गं पितांबर अशा अनेक संगीतबद्ध रचना अनेकांच्या तोंडी असतात.

त्यांच्या आयुष्यात त्यांना ओळख मिळवून देणारी आणखी एक घटना म्हणजे दिल्लीमधील पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबतची मिटिंग. १९५० मध्ये पंत्राप्रधनांनी देशातील ख्यातनाम गीतकार आणि संगीतकार यांची मुलांकडून राष्ट्रगीत गायनासाठी मिटिंग बोलावली होती. तेवढ्यात एक सनदी अधिकारी तुच्छतेने म्हणाला, काय इथल्या शाळकरी मुलांची अवस्था, एक-दोन मुल एकत्र ताला-सुरात राष्ट्रगीत म्हणून शकत नाहीत, तर काय होणार.

वसंतरावांच्यातील संगीतकार बोलला, दोनच काय, शेकडो, हजारो, लाखो मुलांना एका ताला-सुरात शिकवीन. नुसते म्हणून शांत न बसता त्यांनी लाखो मुलांकडून गायन करून घेतले. एका दसऱ्याच्या दिवशी मुंबईमधील शिवाजी पार्कवर एक लाख मुलांनी मिळून राष्ट्रगीत म्हंटले, आणि या कार्यक्रमास स्वतः पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते आणि हे समूह गायन ऐकून ते स्वतः भारावून गेले होते.

१९६२च्या चीन युद्धाच्या वेळचे ‘जिंकू किंवा मरू’ या ग.दि. माडगुळकरांच्या गीताला त्यांनीच चाल लावली होती. त्यांचे ’ए मालिक तेरे बंदे हम’ हे गाणे आजही भारतासह पाकिस्तानातही गायले जाते.

बराच काळ ते महाराष्ट्र राज्य शासनाचे ही संगीत दिग्दर्शक होते. त्यांच्या कारकीर्दीचा सन्मान म्हणून १९७५ साली त्यांना संगीत तज्ञ या क्षेत्रातून राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आणि ती मंजूर देखील झाली. मात्र त्यानंतर लगेचच म्हणजे ३ महिन्यांमध्येच आणीबाणी घोषणा झाली.

आणीबाणीच्या कालखंडात २२ डिसेंबर १९७५ रोजी पंतप्रधानांच्या २० कलमी कार्यक्रमावरील गाण्याचं मुद्रण आणि त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष पी.के. सावंत याचं भाषणाचे ध्वनिमुद्रण असे सगळे काम संपवून कंपनीचे अधिकारी काशिनाथ जयस्वाल यांच्यासोबत पेडर रोडवरील त्यांच्या निवासस्थानाच्या इमारतीत आले. पण तिथे लिफ्ट अचानक सुरु झाल्याने लिफ्टच्या दारात अडकून वयाच्या एकसष्टाव्या वर्षीच त्यांचा करूण अंत झाला.

आणीबाणी आणि त्यानंतर अचानक झालेला मृत्यू यामुळे दुर्दैवाने विधिमंडळाला त्यांचा सहवास अगदीच तोकडा लाभला. पण ते राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधानपरिषदेवर जाण्यासाठी अस्सलच होते यात शंकाच नाही. आपण अशाच साहित्य, कला, विज्ञान, चळवळ यातून मानाने, सन्माने आणि अनुभवातून मोठ्या झालेल्या आमदारांची या सिरीजमधून ओळख करून घेत आहोत.

लवकरच भेटूया पुढच्या भागात….

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.