नियम कायदे महत्वाचे होतेच पण ते पाळताना दादांनी जमिनीशी नातं सुटू दिलं नव्हतं

काही माणसं राजकारणात गेल्यानंतर त्या क्षेत्रात इतकी हरवून जातात, की खास त्यांच्या अंगी असणारी खास वैशिष्ट्येही झाकोळून  जातात. मुखवटे चढविताना मूळ चेहेराच दिसेनासा होतो. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले वसंतदादा पाटील यांचं वैशिष्ट्य सुद्धा असंच राजकीय मुखवट्या आड झाकलं गेलं होतं.

मोकळ्या मनाचा आणि दिलदार असा हा माणूस राजकारणाच्या प्रवासात आपल्या स्वभावधर्माप्रमाणेच वागत राहिला. 

त्यांच्याबरोबरच्या सहवासात आलेल्या अनेक अनुभवांतून लोकांच्या मनावर ठसला तो त्यांचा दिलदार स्वभाव. सहकार, शिक्षण, प्रशासन, राजकारण या क्षेत्रात त्यांनी गाजविलेल्या कर्तृत्वाचा आलेख काढतानाही त्यांचे हे माणूसपण ठळकपणे नजरेत येते.

असाच वसंतदादांच्या माणूसपणाचा एक किस्सा.

त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते वसंतदादा पाटील. फक्त चौथी पर्यंत शिक्षण झालेले दादा व्यवहारचतुर होते. विधिमंडळात त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव होता पण जनतेतही ते प्रचंड लोकप्रिय होते. लोकांची नस अचूक पकडली होती. विरोधकांशी जुळवून घेऊन जनतेचे प्रश्न मार्गी लावणे हि दादांची हातोटी होती.

दादांचे वैशिष्ट्य असे, की ते एखाद्याला केलेल्या मदतीची कधीही जाहीर वाच्यता करायचे नाहीत. अगदी त्यांना विचारले तरी. येणाऱ्या प्रत्येकाला ते भरभरून मदत करायचे. त्यांना माणसांची अचूक पारख होतीच. माणसांनी केलेल्या उपकाराची परतफेड जेवढी जमेल तेवढी करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा. 

अल्प शिक्षण झाले असले तरी अफाट निरीक्षण क्षमतेचा हा नेता होता. त्यांना नजरेतूनच सारं काही समजायचं. त्यांच्यात एक सुसंस्कृतपणा होता. त्यांनी कधीच कोणाला अपशब्द कधी वापरला नाही. कोणालाही तोडून बोलले नाहीत. एखाद्याने खूपच घोळ केला, तर ते त्यांना “आता परत चुकू नकोस. तुला शेवटचे सांगतोय’ असे बोलून माफ करायचे. त्यामुळे चुकणारा माणूसही कधी त्यांच्यापासून तुटायचा नाही.

त्यामुळेच प्रशासकीय अधिकाऱ्यांत त्यांचा आदरयुक्‍त प्रभाव होता. 

१९७५ – ७६ मधली ही घटना असावी. त्या वेळी मराठवाड्यात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी औरंगाबाद मध्ये एक तरुण कलेक्‍टर नुकताच जॉईन झाला होता. त्या कलेक्टरने जळगाव येथून आयात धान्याच्या बोगी मागवल्या होत्या. पिण्याचा प्रश्‍न भेडसावू नये म्हणून सगळ्या विहिरी, तलाव ज्या ठिकाणी पाण्याचा साठा आहे त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवत नजर ठेवली होती.

पाण्याच्या साठ्यांवर अशाप्रकारे बंदोबस्त ठेवणे खरं तर चुकीचं होत. हे ज्या वेळी त्या वेळच्या मुख्य सचिवांना कळाले तेव्हा त्यांनी त्या कलेक्‍टरला डायरेक्‍ट निलंबनाचे फर्मान काढले आणि ताबडतोब मुंबईत भेटायला सांगितले. तो अधिकारी मुंबईत आला.  त्यावेळी   त्याच्या काय डोक्‍यात आलं कुणास ठावूक त्याने थेट “वर्षा’ गाठलं.

त्या अधिकाऱ्याने तिथं दादांची भेट घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर दादांनी मुख्य सचिवांना फोन करून सांगितले, की त्या कलेक्‍टरवर काही कारवाई करू नका. तरुण आहे, त्याचा दोष नाही. त्याचा हेतू चांगला आहे. त्याला मी सांगितले आहे. त्यामुळे तो पुन्हा तसे करणार नाही. 

दादांनी अशा प्रकारे त्या तरुण अधिकाऱ्याला माफ करणं म्हणजे दादांची माणुसकी दिसून येते. अशा तऱ्हेने सनदी अधिकारी, सरकारी अधिकाऱ्यांशी त्यांचा खुला व्यवहार असायचा. त्यांच्या निरीक्षणापुढे, आकलनापुढे भले-भले अधिकारी भांबावून जायचे. त्यांची प्रशासनावर जबरदस्त पकड होती.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.