कुंडल गावात आजही दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली हा किस्सा रंगतो.

सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचे लोक दिल्लीला पर्यटनासाठी गेले होते. हे लोक किर्लोस्करवाडी येथील कारखान्याचे कामगार होते. दिल्लीला जाताना ते रेल्वेने गेले होते. दिल्लीत गेल्यावर त्यांनी सुरक्षेचा भाग म्हणून आपल्याजवळची सर्व रक्कम एकत्र केली आणि ती एका सहकाऱ्याजवळ एका बॅगमध्ये ठेवली.

ती रक्कम तीस हजार रुपये होती.

दिल्लीत फिरत असताना ती बॅग गर्दीत चोरीला गेली.बॅग चोरीला गेलेली समजताच सर्वजण घाबरून गेले. कारण सगळ्यांचे पैसे गेले होते. आता गावापासून तर इतक्या दुर आलोय काय करणार? कोणालाच काही सुचेना.

दिल्लीमध्ये ओळखीचही कोणी नाही. सगळे विचारात पडले. आता काय करायचं? मग कुंडल येथील दत्तात्रय बंडू झरेकर नावाच्या कार्यकर्त्याला एकदम वसंतदादांच्या आठवण झाली. ते म्हणाले,

“चला आपण वसंतदादांना भेटून हे सगळ सांगूया.”

मग ते सगळे दिल्लीमध्ये वसंतदादा यांचा पत्ता शोधत गेले. ते घरी गेले तेव्हा दादा उपस्थित नव्हते. मग ते काळजी करत दादांची वाट पहात बसले. काही वेळाने दादा आले.त्यानी दादांना सगळा प्रसंग सांगितला.

वसंतदादा म्हणाले,

” काळजी करू नका तुम्ही पहिलं जेवण करा आपण काय कायतरी करू.”

मग ते सर्वजण काळजीतच दादांच्या घरी राहिले. बॅग सापडणार नाही असेच सगळ्याना वाटत होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी दादानी दोघांना बोलवून घेतले आणि त्यांची जी हरवलेली ती बॅग दाखवत विचारले

“तुमची हरवलेली आहे ती हीच आहे का?”

तीच बॅग होती. ती बॅग बघून ते आश्चर्यचकित झाले. त्याना खूप आनंद झाला.कारण दिल्लीत बॅग सापडणे मुश्किल वाटत होते.पण दादांनी तपास यंत्रणा कामाला लावून गावाकडच्या माणसांची बॅग शोधून दिली होती.

वसंतदादा पाटील यांनी दिल्लीत केलेल्या मदतीची आठवण कुंडलचे लोक आजही काढतात.आजही वसंतदादा पाटील यांचा विषय निघाला की ‘दादांनी दिल्लीत हरवलेली बॅग कशी शोधून दिली.’ हा किस्सा निघतो. कुंडलचे विजय बाजीराव पवार हे आजही हा किस्सा सांगतात.

संपत मोरे यांच्या फेसबुकवरून साभार 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.