शेकापचे दत्ता पाटील कट्टर विरोधक होते तरी वसंतदादांनी एका वाक्यात त्यांचं कॉलेज मंजूर केलं

विधानसभा असो किंवा लोकसभा. लोकांचं प्रतिनिधित्व करणारी हि सभागृह आजकाल मात्र कुस्त्यांचा आखाडा बनला आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा एकमेकांची राजकीय उणीदुणी काढणे, जुने स्कोर सेटल करणे असे प्रकार जास्त करून पाहायला मिळतात. अनेकदा तर मारामारी देखील होताना दिसते.

पण एक काळ असा होता जेव्हा सत्ताधारी व विरोधकांमध्ये संघर्ष तर व्हायचा मात्र ज्यावेळी जनतेच्या हिताचा प्रश्न असायचा तेव्हा मात्र सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकत्र आलेले दिसायचे. असाच एक अनुभव महाराष्ट्राच्या विधानसभेने १९८३-८४ च्या दरम्यान घेतला होता. 

कारण त्यावेळी शेकापचे दत्ता पाटील कट्टर विरोधक होते तरी वसंतदादांनी एका वाक्यात त्यांचं कॉलेज मंजूर केलं होतं. स्वतः शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी याबाबतचा किस्सा सांगितला आहे.

वसंतदादा पाटील तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते. दादांचे लौकिक अर्थाने शिक्षण जास्त झालं नव्हतं. ते स्वतःला सातवी नापास म्हणायचे, मात्र त्यांचं व्यवहार ज्ञान प्रचंड मोठं होतं. माणसांना ओळखायची आणि त्यांना जिंकून घेण्याची जबरदस्त ताकद त्यांच्याजवळ होती. अशाच या सातवी नापास माणसाने इंजिनियरिंग शिक्षणाचे महत्व ओळखले होते.

त्यावेळी ग्रामीण भागात एमएसईबीचा इंजिनिअर म्हणजे केरळी किंवा कानडी असायचा. लाईनमन असो किंवा कोणीही असो, इंजिनिअर केरळी किंवा कानडी असायचा. ते वसंतदादांना खटकले आणि त्यांना वाटले की, महाराष्ट्रातील व्यक्ती इंजिनिअर का होऊ शकत नाही? त्यामुळे त्यांनी मेडिकलपेक्षा इंजिनिअरिंग कॉलेज विनाअनुदान तत्वावर काढण्याची कल्पना मांडली. 

आणि एका फटक्यात ऐतिहासिक निर्णय घेऊन महाराष्ट्रातील तंत्रशिक्षण खुलं केलं. 

१९८३ मध्ये वसंतदादा पाटील यांनी वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापन करण्याचा निर्णय घेतला. दादांच्या त्या निर्णयानंतर राज्यात विनाअनुदान तत्वावरील इंजिनिअरिंग कॉलेज काढण्यास सुरूवात झाली. जेव्हा या संदर्भात घोषणा केली, तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या अनेक लोकांनी एकामागोमाग एक इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर करवून घेतली.

त्यावेळी विरोधी बाकावर शेकाप अर्थात शेतकरी कामगार पक्ष होता. शेकापचे तब्बल ९ आमदार विधानसभेत निवडून आले होते. यात ऍड.दत्ता पाटील, केशवराव धोंडगे, गणपतराव देशमुख अशा मोठ्या नेत्याचा समावेश होता. पण असं म्हंटलं जायचं कि काँग्रेस आणि शेकापमध्ये त्यावेळी विस्तव देखील जात नव्हता.

आता आमदार असलेले जयंत प्रभाकर पाटील त्यावेळी २६-२७ वर्षांचे असतील. ते त्यावेळी प्रेस गॅलरीमध्ये आपल्या काकांचे भाषण ऐकण्यासाठी बसले होते. त्यांचे काका म्हणजे ऍड. दत्ता पाटील.

दत्ता पाटील यांची आणखी ओळख सांगायची म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून डाव्या विचारांचे पाईक असणारे सर्वसामान्यांचे थोर नेते. दि.बा.पाटील आणि प्रभाकर पाटील यांच्या सोबत त्यांनी रायगड जिल्ह्याला शेकापचा बालेकिल्ला बनवला.  

दत्ता पाटील यांनी २७ वर्षे विधानसभेत अलिबागचे प्रतिनिधीत्व केले. १९८७ ते १९८९ या काळात त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून संसदीय कामकाजावर ठसा उमटविला. भरदार आवाज, धारदार वक्तृत्व, हजरजबाबीपणा यांच्या जोरावर संसदीय आयुधांचा अचूक वापर करीत त्यांनी विधानसभा गाजवली.

त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभेत खाली येऊन चिठ्ठी पाठवून काकांना बाहेर बोलावले आणि म्हणाले कि,

आपल्यालाही एक इंजिनिअरिंग कॉलेज मागा. कोकणासाठी कोणी मागितलेले नाही.

तसे काहीसे बोलण्यासाठी फटकळ असणारे दत्ता पाटील जयंत पाटील यांना म्हणाले, अरे, वेडा आहेस काय, काँग्रेसवाले आपल्याला इंजिनिअरिंग कॉलेज देऊ शकत नाहीत. मग कशाला बोला?

त्यावर जयंत पाटील पुन्हा म्हणाले, आपण मागा तरी, बोलायला काय बिघडत आहे? ते रेकॉर्डला राहील.

दत्ता पाटील यांना आपल्या पुतण्याचं म्हणणं पटलं आणि ते वसंतदादांना म्हणाले, 

तुम्ही सर्वांना इंजिनिअरिंग कॉलेज देता. मी इंजिनिअरिंग कॉलेज काढले तर चालेल का, तुम्ही ते द्याल का?

त्यावर वसंतदादा तात्काळ म्हणाले,

दत्ता, तुला कॉलेज दिले.

दत्ता पाटील यांना २ मिनिट कळालेच नाही. त्यामुळे त्यांनी वसंतदादांना पुन्हा विचारले,

कधी दिले?

वसंतदादा म्हणाले,

आज, आता दिले. तू तुझ्या लेटरहेडवर फक्त आता अर्ज लिही, आता परवानगी देईन.

त्यावर दत्ता पाटील यांनी ताबडतोब त्यांच्या लेटरहेडवर अर्ज लिहिला, आणि दादांनी तो मंजूर केला. इतकंच नाही तर आजच्या आज ऑर्डर काढा आणि बाकीचे प्रोसिजर नंतर करा असे देखील सांगितले. त्यामुळे त्यादिवशी कोकणाला एक इंजिनीरिंग कॉलेज मिळाले.

सरकारी काम आणि सहा महिने थांब असं आजही आपल्याकडे म्हंटले जाते. नेते मंडळींना कामाबद्दल विचारले असता मी घेतले. मी त्यामध्ये आहे. मागाहून त्याचा प्रकल्प अहवाल झाला अशी कारण सांगितली जातात. पण आपल्या विरोधकाचे काम देखील एका वाक्यात मंजूर करणारे वसंतदादा होते. कारण त्यांचे काम कोकणासाठी होते.

हे हि वाच भिडू

1 Comment
  1. Kunal says

    Unfortunately, college was closed by its management very early. They could run its operations for hardly a decade or less

Leave A Reply

Your email address will not be published.