हे एकच कारण होत ज्यामुळे वाद होऊनही दादा डी वाय पाटलांच्या पाठीशी उभे राहिले
मागे काही दिवसांपूर्वी शिक्षणसम्राट माजी राज्यपाल डी वाय पाटलांनी वयाच्या ८४व्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणात सक्रीय होण्याचा संदेश दिला. त्यांच्या या येण्यामागे शरद पवारांची खेळी आहे असं म्हटलं जात होतं. पुढे त्यांनी जास्ती पुढाकार घेतला नाही पण तरी या खेळीमुळे अनेकांची भंभेरी उडालेली आपण पाहिली.
डी वाय पाटलांच्या राजकारणाची हि स्टाईलच होती. या वयातही त्यांची जिद्द तरुणांना लाजवेल अशीच आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबप येथे ज्ञानदेव यशवंतराव उर्फ डी वाय पाटलांचा जन्म झाला.
कोल्हापूरच्या महानगरपालिकेमधून त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीचा प्रारंभ केला. इस्लामपूरचे राजारामबापू पाटील यांनी त्यांना राजकारणात आणल. १९६७साली त्यांना काँग्रेस पक्षाकडून विधानसभेच तिकीट मिळालं. डी वाय पाटील पन्हाळा मतदारसंघातून १९६७ आणि १९७२ अशा दोनवेळा निवडून आमदार बनले होते.
१९६७च्या काळात डी.वाय.पाटील व शरद पवार विधानसभेवर निवडून गेले.पवार आणि पाटील यांची कारकीर्द जवळजवळ सारखीच आहे.
दक्षिण महाराष्ट्राच्या राजकारणात इस्लामपूरचे राजारामबापू पाटील आणि सांगलीचे वसंतदादा पाटील या दोन दिग्गज नेत्यांचा विकासाच्या मुद्द्यावरून उभा दावा होता. अनेक नेते कार्यकर्ते या दोन गटात विभागलेले असायचे. डी वाय पाटील यांचे मात्र दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध होते.
सांगली जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वारणा नदीवर बांधल्या जाणाऱ्या धरणाच्या जागेवरून वाद सुरु झाला. सांगली जिल्ह्याचे नेते विरुद्ध कोल्हापूर जिल्ह्याचे असा हा वाद होता.
यात वसंतदादाच्या विरुद्ध जाऊन राजारामबापूंनी कोल्हापूरच्या नेत्यांची बाजू घेतली. या वादात डी वाय पाटील यांनी वसंतदादांच्या अपेक्षेविरुद्ध जाऊन राजाराम बापू गट पकडला. वसंतदादा पाटील यांचे आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले.
पुढे वसंतदादा पाटील हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. दादांच्या सर्व विरोधकांनी त्याकाळात राजीनामे दिले होते. डी वाय पाटील याही वेळी राजाराम बापूंच्यासोबत राहिले. त्यांनी फक्त राजीनामाच दिला नाही तर सक्रीय राजकारणाला देखील रामराम केला. शैक्षणिक कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले.
राजारामबापूंचे अकाली निधन झाले. वसंतदादा पाटील तेव्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यांनी शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थाना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. डी वाय पाटलांच्याही संस्थांचा प्रस्ताव दादांच्या टेबलावर आला होता. पण त्यांनी आपल्या जुन्या वैराचा कोणताही आकस मनात न ठेवता डी वाय पाटलांच्या शिक्षण संस्थाना एकोणचाळीस परवानग्या दिल्या.
डी वाय पाटलांना दादांच्या या अकृत्रिम स्नेहाच आश्चर्य वाटायच. त्यांनी एकदा वसंतदादाना याबद्दल विचारलं. दादा म्हणाले,
“मी स्वातंत्र्यलढ्याच्यावेळी भूमिगत होतो. तुझ्या वडलांनी तेव्हा क्रांतीकार्यासाठी १००० राणीछाप रुपये दिले होते. ते उपकार माझ्या कायम स्मरणात आहेत. “
डी वाय पाटील यांनी अनेक शैक्षणिक संस्था काढल्या. स्वतःचे अभिमत विद्यापीठ सुरु केले. याकाळात ते काँग्रेसच्या विचारधारेचे कार्यकर्ते राहिले पण त्यांनी सक्रीय राजकारणात परत प्रवेश केला नाही.
१९९१ साली त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून पद्मश्री आणि २००९साली त्रिपुरा राज्याचा राज्यपालपदी निवड झाली. आज अनेक वर्षांनी वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी आपले जुने मित्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून नव्याने शड्डू ठोकला आहे.
हे ही वाचा भिडू.
- वसंत पाटलानं जेल फोडला..
- हिंदकेसरी मारूती माने :पैलवानकी विरुद्ध खासदारकी.
- हिशोबाला पक्के “जयंत पाटील”
- वसंतदादा, “तुम्ही जेल फोडला तेव्हा मी कृष्णाकाठी डबा घेवून संडासला बसलो होतो.”