दिल्लीवरून ज्याचं तिकीट कापलं गेलं त्यालाच वसंतदादांनी मुख्यमंत्री बनवलं !

साल होतं १९८३. महाराष्ट्रातील सत्ता आपल्या हातात राहावी म्हणून लोकांचा पाठींबा नसणाऱ्या अंतुले, बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री करणाऱ्या इंदिरा गांधीनां अखेर जनमानसावर आणि संघटनेवर पकड असणाऱ्या वसंतदादांना मुख्यमंत्री करावं लागलं होतं.

गेली अनेकवर्षे मुख्यमंत्रीपदाची खुर्चीशी दादांचा पाठशिवणीचा खेळ सुरु होता तो संपला होता. आपल्या इतक्या वर्षाच्या अनुभवाला प्रत्यक्षात उतरवण्याची संधी दादांना मिळाली होती.

पुढे एका वर्षातच इंदिराजींची हत्या झाली. राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने त्यावेळची लोकसभा न भुतोनभविष्यती अशा बहुमताने जिंकली. इंदिरा गांधींच्या हत्येमुळे जनतेत उमटलेला आक्रोश व सहानुभूती लाट यामध्ये विरोधी पक्ष उडून गेले.

भाजपचे पूर्ण देशभरात फक्त २ खासदार निवडणून आले. काँग्रेसचे ४१४ खासदार हा एकप्रकारचा विक्रम होता.

राज्यात काँग्रेसने जबरदस्त यश मिळवले. शरद पवारांच्या काँग्रेसची धूळधाण उडाली. एवढे प्रचंड यश मिळाल्या मुळे आय काँग्रेसचा आत्मविश्वास गगनाला पोहचला होता. भारताचा सर्वात तरुण पंतप्रधान बनण्याचा मान मिळवणाऱ्या राजीव गांधीनी काँग्रेसमध्ये मोठे बदल करण्याचे सुतोवाच केले.

जास्तीतजास्त तरुणांनी राजकारणात यावे ही राजीव गांधींची इच्छा होती. त्यांचे अनेक उच्चशिक्षित मित्र आपली नोकरी सोडून सरकारमध्ये सामील झाले होते. गावपातळीपर्यंत असेच व्हावे असे आदेश त्यांनी दिले. लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पुढच्याच वर्षी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुका आल्या.

राजीव गांधींच्या कॉम्प्युटर वापरणाऱ्या सल्लागारांनी संशोधन केले आणि त्याला धरून पक्षश्रेष्ठींनी एक अजब निर्णय जाहीर करण्यात आला.

“महाराष्ट्रातील ज्या काँग्रेस आमदाराच्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते पडली आहेत, त्या आमदाराला १९८५ च्या विधानसभा निवडणूकीच तिकीट द्यायचे नाही.”

या धोरणाचा फटका महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना बसला.

गटबाजीवर आळा बसावा म्हणून राजीव गांधीनी छडी उगारली होती. त्याचा फटका वसंतदादांच्या मंत्रीमंडळातील १३ मंत्र्यांना देखील बसला होता. यात मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले म्हणून ओळखले जाणारे तीन मंत्रीदेखील होते. लातूरचे शिवाजीराव पाटील निलंगेकर, जळगावच्या प्रतिभाताई पाटील आणि इचलकरंजीचे कल्लाप्पा आवाडे.

प्रतिभाताई पाटील या एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतील नेत्या होत्या. त्यांचे दिल्लीतही वजन होते. प्रतिभाताईना विधानसभेमध्ये डावलले पण त्यांची रवानगी राज्यसभेत केली गेली. काही दिवसातच त्या राज्यसभेच्या उपाध्यक्षा बनल्या.

कल्लाप्पा आवाडे हे दादांच्या मंत्री मंडळातील उद्योगराज्यमंत्री. वसंतदादांच्या सांगलीच्या जवळचेच. त्यांनी आयडिया केली, कल्लाप्पा आवाडे यांच्या जागी त्यांच्या मुलाला प्रकाश आवाडे यांना आमदारकीचं तिकीट दिल. यामुळे आपला कार्यकर्तासुद्धा टिकला आणि दिल्लीचा नियम देखील पाळला गेला.

वडीलांच्या जागेवर मुलाला तिकीट देण्याचा हा घराणेशाहीचा पहिला प्रयोग वसंतदादांनी केला होता.

असाच प्रकार त्यांनी शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासाठी देखील केला. त्यांचे सुपुत्र दिलीपराव पाटील यांना निलंगा येथून विधानसभा तिकीट दिले. असं म्हणतात की यावेळी वसंतदादा यांनी घोषणा केली होती की,

“दिल्लीकरांनी निलंगेकरांच तिकीट कापल पण मी त्यांना मुख्यमंत्री करून दाखवेन.”

पुढे ही वेळ लवकरच आली. निवडणुका झाल्या. दादांच्या अनुभवी नेतृत्वाखाली कॉंग्रेसचा मोठा विजय झाला. त्यांच्या कार्यकर्त्यांची पोरं देखील निवडून आली. दादा परत मुख्यमंत्री बनले.

पण राजीव गांधी यांची लहर फिरली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी प्रभा राव यांची नियुक्ती केली. अस म्हणतात की मुख्यमन्त्र्यावर दिल्लीहून वचक राहावा यासाठी राजीव गांधींच्या सल्लागारांनी ही नियुक्ती करायला लावली होती.

स्वाभिमानी वसंतदादा पाटलानां हा प्रकार आवडला नाही. दिल्लीच्या श्रेष्ठींची हांजी हांजी करणे त्यांच्या स्वभावात नव्हते. प्रदेशाध्यक्ष बदलण्यासारखा मोठा निर्णय मुख्यमंत्र्यांना विचारून घेतला पाहिजे हे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी थेट राजीनामा देऊन टाकला.

अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडाली. 

राजीवजीनां वसंतदादा हा निर्णय घेतील अस अपेक्षितच नव्हत. त्यांच्यासारखा गेली स्वातंत्र्यलढयापासून पन्नास वर्षे राजकारणात असलेला जननेता महाराष्ट्रात नाराज करून चालणार नव्हते. दादांची मनधरणी करायचे अनेक प्रयत्न झाले. पण दादा प्रभा राव नां हटवा या एका मुद्द्यावर ठाम होते.

अखेर तोडगा निघाला की दादांचा राजीनामा घेण्यात येईल आणि त्या जागी ते सांगतील त्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्यात येईल.

वसंतदादानी रिकाम्या झालेल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आपले समर्थक शिवाजीराव निलंगेकर यांना बसवले आणि आपले शब्द खरे करून दाखवले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.