वसंतदादा पाटलांनी आपल्या गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा सुरु केली होती.
स्वातंत्र चळवळीतील लढवय्या क्रांन्तीकारक आणि कॉंग्रेसचे नेते अशी वसंतदादा पाटील यांची ओळख पण अचानक तुम्हाला कोणी सांगितल,
वसंतदादा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते, तर ?
Wtsapp विद्यापीठाचा बळी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहाल. आमच्या एका भिडूने देखील आम्हाला अस सांगितलं तेव्हा आम्ही देखील तुमच्यासारखंच आश्चर्यचकित झालो. आम्हाला वाटलं whatsapp युनिव्हर्सिटीचे मेसेज वाचून आमचा भिडू येडा झालाय.
साक्षात वसंतदादा पाटील संघामध्ये ?
आयुष्यभर कट्टर काँग्रेसी राहिलेले वंसतदादा संघामध्ये कसे असू शकतील ?
पण आमचा भिडू सिरीयस होता. कारण हि गोष्ट त्याला जून्या जाणत्या लोकांनी सांगितली होती. अशाच काळात आमच्या इनबॉक्समध्ये कुठल्यातरी दिवाळी अंकातील छोट कात्रण पाठवण्यात आलं.
त्यावर लिहलेला मजकूर असा की,
तात्काळ आमच्या भिडूने सांगलीच्या ग्रीन्स पानपट्टीचा शोध घेतला. सध्याच्या SFC मॉलसमोरच्या हॉटेल विहारमध्ये ग्रीन्स पानपट्टीची चौकशी केल्यानंतर समजल, ती पानपट्टी तर गेली. पण त्यांचा मुलाची सध्या पानपट्टी आहे. आम्ही ती पानपट्टी देखील शोधून काढली तेव्हा त्याचे मालक म्हणाले, वडीलांकडे खूप जुने फोटो होतो. सगळे घरात अडगळीत आहेत. वेळ मिळाल्यावर या ! सांगतो !!
ते अजून सांगतायच असो,
पण इतकं तर फिक्स झालेलं की वसंतदादा संघात असल्याचे सेफरन्स दिली जातायत. त्यातून शोधाशोध केल्यानंतर जे आमच्या हाती आलं ते पुढीलप्रमाणे होतं.
१३ नोव्हेंबर १९१७ साली ऐन दिवाळीत वसंत बंडूजी पाटलाचा जन्म एका सुखवस्तू शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील सांगली जवळच्या पद्माळे गावचे पाटील. कृष्णाकाठी चांगली पिकणारी शेती. पण वसंतदादा दहा महिन्याचे असतानाच त्यांनी आई आणि वडील दोघांनाही प्लेगच्या साथीमध्ये गमावलं. आजी खंबीर होती. तिन घरशेती सांभाळली. पोरांना मोठ केलं. शाळेत घातलं.
वसंतदादानां कमी वयातच घरच्या जबाबदारीची जाणीव झाली. कसंबसं त्यांनी सातवी पर्यंतच शिक्षण पूर्ण करून शाळा सोडली आणि घरच्या शेतीला लागले. अनेक वर्ष दुर्लक्ष झालेल शेत त्यांनी घामाने फुलवलं. अवघ्या चौदा पंधराव्या वर्षी ते पट्टीचे शेतकरी बनले. आता वसंता आयुष्यभर मळ्यातच रमणार अशी सगळ्यांची खात्री झाली.
सुगीचे दिवस झाल्यावर फावल्या वेळेत वसंतदादा गावच्या तालमीत कुस्ती खेळू लागले. तालमीत फक्त कुस्तीच चालायची असं नाही. दररोज संध्याकाळी गावातले तरुण जमून जगभराच्या बातम्यावर चर्चा झडायच्या. वसंता पण त्यात भाग घेऊ लागला, महात्मा गांधीची सविनय कायदेभंगाची चळवळ तेव्हा ऐन भरात होती.
मातृभूमीला पारतंत्र्याच्या जोखडातून सोडवण्यासाठी गांधीजींना आपण सुद्धा मदत केली पाहिजे असा विचार त्या चर्चेमधून पुढे येऊ लागला.
एक दिवस बातमी आली की सोलापुरात चार स्वातंत्र्य सैनिकांना ब्रिटीश सरकारने फासावर चढवल.
तरूण वसंतदादा अस्वस्थ झाले. देशासाठी लोक फासावर चढत आहेत आणि इथ आपण नुसता चर्चा करत बसलोय. त्या दिवशी सगळ्या मित्रांसोबत गांधी टोपी डोक्यावर चढवून त्यांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात उडी घेण्याची शपथ घेतली.
काही तरी भरीव कार्य करण्यासाठी पद्माळेचे हे तरुण रक्त फुरफुरत होते. दरम्यानच्याकाळात गांधीजीनी सविनय कायदेभंग आंदोलन मागे घेतले होते. त्याकाळात सातारा सांगली जिल्ह्यामध्ये सत्यशोधक चळवळ जोरात सुरु होती. बुवासाहेब गोसावी आणि अप्पासाहेब साखळकर यांनी तासगाव तालुक्यात काँग्रेस सेवा दला ची स्थापना केली. या सेवा दलाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे उभे राहिले. हुंडाबंदी, स्त्रीशिक्षण अशा सामजिक सुधारणानी जोर धरला होता.
वसंतदादा आणि कंपनी सुद्धा याच्यामध्ये उतरली. गावोगावी जाऊन लोकांना स्वातंत्र्यचळवळीबद्दल, सामाजिक सुधारणाबद्दल जागृत करण्याचं काम हे कार्यकर्ते करत होते. ग्रामसुधारणा मंडळ स्थापन करून श्रमदानातून कृष्णेच्या तीरावर घाट बांधला. शक्य आहे त्या मार्गातून देशकार्यात हे तरूण हात गुंतले होते.
वसंतदादांचा दत्तू येडेकर नावाचा एक मित्र होता. कामगार चळवळीमध्ये तो काम करायचा. एक दिवस तो वसंतदादाना घेऊन सांगलीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघा च्या शाखेत गेला. अजून बाळसं धरत असलेल्या या संघटनेला सांगली संस्थानचा पाठींबा होता. या मुळे सांगली मधील शाखेचे काम इतर गावाच्या मानाने जोरदारपणे सुरु होते. संघाच्या शाखेत चालणारी शिस्तबद्ध कवायत बघून वसंतदादा खूपच प्रभावित झाले.
वसंतदादांनी पद्माळेला संघाची शाखा स्थापन केली.
पण काही दिवसातच वसंतदादांच्या लक्षात आले की आरएसएस चे आणि आपले स्वातंत्र्य प्राप्तीचे मार्ग वेगवेगळे आहेत. धर्म आणि संस्कृतीचे रक्षण हा प्रमुख त्यांचा उद्देश होता. संघाने कॉंग्रेसच्या ब्रिटिशांच्या विरोधातल्या सत्याग्रहामध्ये भाग घेण्यास कार्यकर्त्यांना मनाई केली होती. १९३४ साली काँग्रेसने सुद्धा हिंदू महासभा ,मुस्लीम लिग,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या धार्मिक संघटनेपासून अंतर राखण्याचा ठराव पास केला होता.
संघाचा महात्मा गांधी विरोध, त्यांची वेगळी विचारधारा या साऱ्याचा परिणाम होऊन अखेर वसंतदादा पाटलांनी पद्माळे गावातली संघाची शाखा बंद केली. पुढे १९४२ च्या चलेजाव चळवळीनंतर त्यांनी प्रतिसरकारच्या क्रांतिकार्यात भाग घेतला, तुरुंग फोडला हे सगळ्यांना ठाऊकच आहे.
एकूण काय तर वसंतदादा पाटील हे काही काळासाठी संघ शाखेमध्ये गेले होते हे निश्चित.
पण काही दिवसात विचार वेगळे असल्यामुळे त्यांनी तो मार्ग सोडला. आता राहिला प्रश्न त्या वसंतदादा पाटलांच्या खाकी चड्डीमधल्या फोटोचा. तर तो फोटो कधी काढला गेला होता याची पूर्ण माहिती आम्हाला मिळू शकली नाही. तो फोटो वसंतदादांच्या पद्माळे मधल्या शाखेत काढला गेला असू शकतो.
किंवा तो फोटो सेवा दलाच्या गणवेशातला असेल अशीही शक्यता आहे. कारण काँग्रेस सेवा दलाचा गणवेश सुद्धा असाच होता. खुद्द जवाहरलाल नेहरूं चा सेवा दलामधला गणवेशामधला फोटो आर एस एस मधला फोटो म्हणून WtsApp वर फिरत असतो. वसंतदादा पाटील हे तासगाव सेवा दलात सक्रीय असल्यामुळे तेव्हा तो फोटो काढला असू शकतो.
हे ही वाच भिडू.
- वसंत पाटलानं जेल फोडला..
- दादा, “तुम्ही जेल फोडला तेव्हा मी कृष्णाकाठी डबा घेवून संडासला बसलो होतो.”
- हाफ चड्डी बंद करणारे भाई..
- प्रतिसरकार की पत्रीसरकार ?