राजीव गांधींना हटवून वसंतदादांना पंतप्रधान करण्याचा राष्ट्रपतींनी प्लॅन केलेला.. 

1985 च्या जानेवारी महिन्यात राजीव गांधींजी पंतप्रधान झाले. इंदिरा गांधींच्या पश्चात झालेल्या निवडणूकांमध्ये सहानभुतीची लाट देशभर पसरली होती. या लाटेत इंदिरा कॉंग्रेसला 426 जागांवर विजय मिळाला. आणि राजीव गांधी प्रचंड बहुमतात सत्तेत आले. 

राजीव गांधी यांनी आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यातलाच एक निर्णय होता राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांचे पंख छाटण्याचा.

सत्तेत आल्यानंतर ग्यानी झैलसिंग यांना दिल्लीतच अडकवून ठेवण्याचे धोरणं राजीव गांधींनी अवलंबले. राष्ट्रपतींची अवहेलना करण्यास सुरवात केली. अखेरच्या काळात हे राजकारण इथपर्यन्त पोहचलं की आलेल्या परिस्थितीचा फायदा घेवून राजीव गांधींना पंतप्रधान पदावरून हटवून वसंतदादा पाटलांना पंतप्रधान पदावर बसवण्याचा प्लॅनच राष्ट्रपतींनी केला होता.. 

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींमध्ये टोकाचे मतभेद 

सत्तेत येताच मे 1985 मध्ये राजीव गांधींनी राष्ट्रपतींचे दौरे रद्द करण्यास सुरवात केली. राष्ट्रपतींचा झिम्बॉम्बेचा दौरा परस्पर रद्द करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रपतींनी प.बंगालचा दौरा आखला होता. हा दौरा देखील परस्पर रद्द करण्यात आला. दूसरीकडे अफवा पसरवण्यात आली की ग्यानी झैलसिंग यांचे निटकवर्ती राजकीय नेत्यांनी तुरूंगात जावून भिंद्रनवालेच्या सावत्र भावाची भेट घेतली. 

थोडक्यात राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या संबंधांची सुरवातच मनात अढी ठेवून झाली होती. यात भर पडली ती लोकसभेत झालेल्या एका चर्चेमुळे. केंद्रीय मंत्री के.के. तिवारी यांनी लोकसभेत थेट राष्ट्रपतींवर आरोप केले. भिंद्रानवाले यांच्याशी संबंधित व्यक्ती राष्ट्रपती भवनात उतरल्या होत्या अशा प्रकारचे आरोप लोकसभेत राष्ट्रपतींवरच करण्यात आले. 

वास्तविक राष्ट्रपतींवर कोणतेही आरोप लोकसभेत करता येत नाहीत असा एक प्रघात होता.

यापूर्वी देखील इंदिरा गांधींच्या काळात निलम संजीव रेड्डी यांच्यावर आरोपांची चर्चा लोकसभेत घडून येणार होती मात्र ते प्रथेला धरून नाही हे कारण सांगून खुद्द इंदिरा गांधींनीच लोकसभेत राष्ट्रपतींच्या विरोधात चर्चा घडवून आणली नव्हती. मात्र राजीव गांधी यांच्या पुढाकारातूनच लोकसभेत राष्ट्रपतींच्या विरोधात चर्चा घडून आल्याने हे संबंध प्रचंड टोकाला गेले. 

दूसरीकडे राजीव गांधी यांनी 1987 च्या काळापर्यन्त राष्ट्रपतींचे एकूण 40 दौरे रद्द केले होते.

दूसरीकडे कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटण्यास जातात हा प्रघात होता. पण राजीव गांधी आजवर एकदाही राष्ट्रपतींना भेटण्यास गेले नव्हते. इतर कॅबिनेट मंत्री देखील राष्ट्रपतींकडे दुर्लक्ष करू लागले. राष्ट्रपतींकडून भेटण्यास येण्यासाठी सांगणाऱ्या पत्रांना उत्तर सुद्धा कॅबिनेट मंत्री देत नव्हते. 

दोघांमधील हा तणाव वाढल्यानंतर राष्ट्रपतींनी सहन करण्याचे धोरण सोडून राजकारणाचा डाव टाकायचं निश्चित केलं. यासाठी त्यांनी प्रणब मुखर्जी आणि गुंडूराव या कॉंग्रेसच्या बंडखोर खासदारांना भेटण्यासाठी वेळ दिला. राष्ट्रपतींनी आत्ता थेट विरोधी पक्षातील नेत्यांना सुद्धा वेळ देण्यास सुरवात केली. 

टपाल विधेयकामुळे ठिणगी पेटली.. 

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात ठिणगी पडलीच होती. फक्त ती पेटायची बाकी होती. ती पेटली ती टपाल विधेयकामुळे. कोणाचेही टपाल फोडून पाहण्याचा अधिकार टपाल खात्याला देण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले. हे विधेयक राष्ट्रपतींकडे मंजूरीसाठी आले. 

राष्ट्रपतींनी मात्र विधेयकावर स्वाक्षरी न करता सुचना मागवल्या. यामुळे देशभर असणाऱ्या बिगर कॉंग्रेसी राज्यातील सरकार व विरोधी पक्षांचा पाठींबा राष्ट्रपतींना मिळाला. दूसरीकडे मिझोरोम नेते लालडेंगा यांच्यासोबत राजीव गांधींनी करार केला. यावर राष्ट्रपतींनी हरकत घेतली. याला पंतप्रधानांनी “ सरकारी कामातला हस्तक्षेप” असे उत्तर दिले. 

२७ मार्च १९८७ रोजी पहिली भेट झाली.. 

सत्तेत आल्यानंतर राजीव गांधी आणि राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांची एकत्र बैठक झाली ती सुमारे दोन वर्षानंतर. दोन तास चाललेल्या या बैठकीत एकमेकांवर आरोप करण्यात आले. आपणाला मागवलेली माहिती का दिली जात नाही अस राष्ट्रपतींच म्हणणं होतं तर पंतप्रधानांच्या मते राष्ट्रपती भवनातील माहिती गोपनीय रहात नाही अस म्हणणं होतं. 

अशातच बोफोर्स प्रकरण गाजू लागले 

बोफोर्स प्रकरणांनी वेग घेतला. तेव्हा मात्र राजीव गांधींचा राष्ट्रपतींबाबत असणारा स्वॅग गळून पडू लागला. मे १८८७ रोजी ग्यानी झेलसिंग यांच्या वाढदिवसानिमित्त राजीव गांधींनी त्यांची दोनदा भेट घेतली. 

एकीकडे राष्ट्रपतीपदाचा काळखंड देखील संपूष्टात येत होता तर दूसरीकडे पंतप्रधान देखील अडचणीत आले होते. अशा वेळी राष्ट्रपतीपदाचा दुसरा कार्यकाळ खेळायच्या विचारात ग्यानी झैलसिंग होते. अडचणीच्या याच काळाचा वापर करायचं धोरण ग्यानी झैलसिंग यांनी आखलं. 

पंतप्रधानांना पदावरून दूर करण्याचे प्रयत्न 

ग्यानीजी पंजाबचे गृहमंत्री होते तेव्हा पंजाबचे ॲटर्नी जनरल जोगिंदर सिंग वासू होते. वासूंना ग्यांनीजींनी बोलावून घेतलं. पंतप्रधान भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणात दोषी आढळले तर त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो का याची विचारणा त्यांनी केली. त्याविषयी कायद्याचा अभ्यास करण्यास सुरवात करण्यात आली. 

अर्जूनसिंग हे पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत व ते लॉबिंग करत आहेत अशी माहिती ग्यानी झैलसिंग यांच्याकडे पोहचली.  त्यांनी आपल्या सहाय्यकाला अर्जूनसिंग यांच्याकडे पाठवले. अर्जूनसिंग यांनी आपल्याला काही खासदारांचा पाठींबा असल्याचं सहाय्यकला सांगितलं. 

मात्र सहाय्यक हा निरोप घेवून येण्यापूर्वीच गृहमंत्री बुटासिंग यांनी ग्यानी झैलसिंग यांना फोन करुन तुम्ही राजीवजींच्या विरोधात कट का रचत आहात अशी विचारणा केली. पुढे बुटासिंग यांच्याकडून ग्यांनी झेलसिंग यांना दिल्लीत योग्य निवासस्थान आणि मुलीला खासदारकीची ऑफर दिली मात्र राष्ट्रपतींनी ही ऑफर धुडकावून लावली. 

दूसरीकडे नव्या राष्ट्रपतींसाठी पपुल जयकर, श्री शंकरानंद आणि पीव्ही नरसिंहराव यांची नावे समोर आली. १४ जून रोजी राष्ट्रपती पदासाठी आर. व्यंकटरमण यांच्या नावाची शिफारस करण्यात आली. 

राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग आत्ता कोणता डाव खेळणार यांची माहिती घेण्याची जबाबदारी बुटासिंग व राजेश पायलट यांच्याकडे देण्यात आली होती. राष्ट्रपतींनी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर खटला भरण्यासाठी कायदेतज्ञांची मदत घेण्यास सुरवात केली. दूसरीकडे राम जेठमलानी यांनी देखील राजीव गांधींना अडचणीत आणण्यास सुरवात केली. 

राष्ट्रपतींकडे दोन पर्याय उपलब्ध होते. पैकी एक राजीव गांधींवर खटला भरण्यास परवानगी देणे किंवा आरोपांचे गांभीर्य सांगून पंतप्रधानांना बडतर्फ करणे. या गोष्टी करून कॉंग्रेसमध्ये उभी फूट निर्माण करणे व त्यासाठी पर्यायी योग्य पंतप्रधान निवडणे. 

इथे वसंतदादांचे नाव समोर आले. 

विद्याचरण शुक्ला यांनी वसंतदादांचे नाव सुचवले. वसंतदादा पाटील तेव्हा राजस्थानचे राज्यपाल होते. त्यांना राष्ट्रपतींनी दिल्लीत बोलावून घेतलं. राष्ट्रपतींना भेटायला जाण्यापूर्वी वसंतदादांचा मुक्काम महाराष्ट्र सदन मध्ये होता. 

पण इकडे राष्ट्रपतींच्या प्रत्येक डावपेचाकडे लक्ष ठेवण्यासाठी बुटासिंग यांची नियुक्ती करण्यात आली होती. राष्ट्रपतींनी वसंतदादांना बोलावून घेतलं आहे आणि  राजीव गांधीवर खटला भरून दादांना पतप्रधान करण्याच्या हालचाली राष्ट्रपती करत असल्याची माहिती बुटासिंग यांना मिळाली. 

बुटासिंग यांनी महाराष्ट्र सदन गाठलं. बुटासिंग यांनी वसंतदादांना थेट राजीव गांधी यांच्याजवळ नेलं. राजीव गांधी आणि वसंतदादांची भेट झाली व त्यानंतर वसंतदादा पाटील राष्ट्रपतींना भेटण्यासाठी गेले. 

या भेटीत ग्यानी झेलसिंग यांनी वसंतदादांना थेट विचारलं की, तुम्ही पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास तयार आहात का? 

वसंतदादांची आणि राजीव गांधींची पुर्वीच भेट झाल्याने दादांच उत्तर होतं, माझं मत बदललं आहे, निर्णय बदलला आहे.. 

त्यानंतर पी.व्ही नरसिंह राव, अशोक सेने यांची नावे चर्चेत आली. राजीव गांधींवर खटला भरण्यासाठी राष्ट्रपती डावपेच करत गेले. त्यासाठी यशवंतराव चंद्रचुड, सिक्री आणि अशोक सेन या माझी सरन्यायाधिशांकडून त्यांनी अभिप्राय मागवले. त्यापैकी दोघांनी खटला दाखल करता येवू शकतो पण पर्याप्त पुरावे नाहीत असा शेरा दिला.

आणि हे प्रकरण प्रयत्न करुन करुन शांत झाले. नवीन राष्ट्रपती म्हणून आर. व्यकंटरमण यांची नियुक्ती झाली..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.