वाहत्या महापुरात क्रांतिकारकांनी उडी मारली. हाकाटी पसरली, “वसंतदादाने जेल फोडला “

24 जुलै 1943, स्थळ-गणेश किल्ला तुरुंग सांगली.

सकाळ पासून पावसाची संततधार सुरू आहे. जेलर च्या डोकेदुखीला कारणीभूत असणारे काही कैदी तुरुंगात आहेत.
खर तर आज त्यांचा निकाल होता व त्यांनतर त्यांची रवानगी साताऱ्याच्या जेल मध्ये होणार होती पण ऐनवेळी त्यांचा वकील अनुपस्थितीत राहिल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्यात आली. अजून दोन दिवस तरी ह्यांच्यापासून सुटका नाही ह्या विचाराने जेलर आणखीन त्रासाला आहे.

कोण होते हे कैदी ?

स्वतः ला गांधीबाबाचे भक्त म्हणवून घेणारे पण बंदुकाचा बॉम्ब चा वापर निर्धास्तपणे करून जुलमी ब्रिटिश अधिकाऱ्यांना धडा शिकवणे, सरकारी ऑफिस ताब्यात घेणे, रेल्वे लुटणे अशा उचपत्या करणारे तरुण.

देशाला इंग्राजांच्या मगरमिठीतून सोडवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा विधिनिषेध ते बाळगत नव्हते. 1942 च्या काँग्रेस अधिवेशनातील “करेंगे या मरेंगे ” या घोषणेला मंत्र मानून त्यानी क्रांतिकार्य सुरू केले होते. यातच त्यातील काही जणांना अटक झाली होती.त्यात होते हिंदुराव पाटील,गणपतराव कोळी, जयराम कुष्टे,जिनपाल खोत, सातलींग शेटे, महादेवराव बुटाले, वसंत सावन्त, मारुती आगलावे,अण्णासाहेब पत्रावळे,बाबुराव जाधव,विठ्ठल शिंदे,जयराम बेलवलकर,दत्तात्रय पाटील,नामदेव कराडकर, कृष्णा पेंडसे,बाबुराव पाचोरे,तात्या सोनीकर.

त्यांचा म्होरक्या होता वसंता बंडू पाटील…

जुन्या किल्ल्यामध्येच तुरुंग बनवण्यात आले होते..सभोवताली भक्कम तटबंदी व त्यापलीकडे खंदक…जागोजागी सशस्त्र पोलिसांचा पहारा होता. वसंतराव पाटील यांना स्वतंत्र खोलीत डांबण्यात आले होते व त्यांच्यावर विशेष पाळत होती. दिवसातून दोन वेळा शौचासाठी म्हणून त्यांना बाहेर आणलं जाई. ह्या शौचालयातच एक कट शिजत होता.

अण्णासाहेब पत्रावळे आणि बाबुराव जाधव हे अल्पवयीन असल्याने त्यांना तुरुंगात थोडी फार मोकळीक असायची. वसंतराव पाटील आणि हिंदुराव पाटील यांच्या सुपीक डोक्यातून बनलेले सांकेतिक भाषेतील संदेश इतरांपर्यंत पोहचवण्याचे काम ते करत होते. प्लॅन बनला होता. दिवस ठरला होता.

सकाळीच हिंदुराव पाटलांनी संदेश दिला की आज पत्रावळेच्या लग्नाला जायचं. दुपारी 2.30 वाजता वसंतरावांना शौचासाठी बाहेर आणण्यात आलं. अण्णासाहेब पत्रावळे तेव्हा मधल्या मोकळ्या मैदानात पांढरा रुमाल घेऊन उभा राहिला व सगळ्यांना इशारा मिळाला.

शौचाचेच निम्मित करून बाहेर आलेल्या हिंदुराव पाटलांनी सोबतच्या पहारेकऱ्यावर पहिला हल्ला चढवला व त्याची बंदूक ताब्यात घेतली.

वसंत रावांनी देखील सोबतच्या पहारेकऱ्यावर हल्ला केला. दोन्ही पहारेकर्यांना तुरुंगात कोंडले व इतर सहकाऱ्यांची सुटका केली. सर्व जण मुख्य ठाण्याकडे शस्त्रे व काडतुसे मिळवण्यासाठी धावले. वेळ खूप कमी होत. मुख्य कार्यालयात 15 बेसावध पोलीस होते. बाहेरून एक पोलीस तिकडे जायचा प्रयत्न करत होता तर त्याच्यावर पत्रावळे नी गोळी चालवली. तसाच जखमी अवस्थेत तो मुख्य इमारतीच्या दिशेने सरकु लागला.

हा प्रकार पाहून प्रवेशद्वारावरील पहारेकरी घाबरले आणि बंदुका टाकून हात वर करून ते उभे राहिले.तुरुंगातील घंटी च्या ठिकाणच्या रखवालदारावर देखील हल्ला करून त्याची पण बंदूक काढून घेण्यात आली.

तुरुंग कर्मचार्यांना बाहेर काय चालू आहे याचा काहीच अंदाज लागत नव्हता. ह्या हलकल्लोळात जिनपाल खोत यांनी ठाणे ताब्यात घेतले. तिथल्या कर्मचाऱ्यांना बंदूक दाखवून पुढे याला तर जीवे मराल अशी धमकी दिली. तशातच एका पोलिसाने बंदूक उचलायचा प्रयत्न केला तर गणपतराव कोळी ने त्याला बंदुकीच्या दस्त्याने तडाखा दिला. तो वार इतका ताकदीचा होता की बंदुकीचे दोन तुकडे झाले.

शस्त्रास्त्रे खोली तुन बंदुका काडतुसे पिशवीत भरण्यात आली व सगळे क्रांतिकारक तटाकडे धावले.गोळीबाराचा आवाज ऐकून बाहेरच्या तबेल्यातून हत्यारबंद घोडेस्वार शिपाई तटाकडे आले तर हिंदुराव पाटलांनी गोळीबार करून त्यांना तिथून पांगवले.तटावरून पाण्याने भरलेल्या खंदकात सर्व प्रथम जिनपाल खोत यांनी उडी मारली.

भारतमातेचा जयजयकार करत वसंतराव पाटील व इतर क्रांतिकारकांनी उड्या मारल्या. हिंदुराव पाटील तटावर पाय रोवून उभे होते. सर्व क्रांतिकारक तटावरून उतरे पर्यंत एकाही पोलिसाला पुढे येऊ दिले नाही. सगळ्यात शेवटी त्यांनी खंदकात उडी मारली मात्र दुर्दैवाने त्यांची उडी चुकली व काठावरच्या दगडाचा मार त्यांना लागला. तसेच उठून पळण्याचा त्यांनी निषफळ प्रयत्न केला मात्र त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते.

शनिवार हा सांगलीचा आठवडी बाजाराचा दिवस होता सर्वत्र वर्दळ होती. अशात कैद्यांनी तुरुंग फोडला अशी आवई सुरू झाली आणि गोंधळ सुरू झाला.

भर पावसात बाजारातून शिवाजी महाराज की जय , वंदे मातरम आशा आरोळ्या देत कैदी वेड्यासारखे धावतायत पाठीमागून पोलीस पाठलाग करत आहेत असे ते चित्र होते. पोलिसांची 125 जणांची तुकडी घोडेस्वार तसेच लष्कराच्या दोन गाड्या असा फौजफाटा चवताळलेल्या लांडग्याच्याटोळीप्रमाणे क्रांतिकारकांच्या पाठीवर होते. गोळीबार होत होता. मारुती मंदिर च्या पाठून गावभागातून नदिपूलाकडे क्रांतिकारक धावत होते. हरिपूर ला असलेल्या कृष्णा वारणा संगमा पलीकडे कोल्हापूर संस्थान हद्दीत सुरक्षित ठिकाणी जाण्याचा त्यांचा प्लॅन सरळ दिसत होता. पोलीस अधिकाऱ्याने दोन होड्या सज्ज करण्याचे आदेश दिले.

सर्व दिशेने सुटनाऱ्या गोळ्या पासून वाचण्यासाठी लोक घरात दडले .पोलीस व क्रांतिकारक यांच्यात अवघे काहीच अंतर उरले मग वसंतराव, जयराम कुष्टे व गणपतराव कोळी यांनी पोलिसांना रोखायचे व बाकीच्यांनी नदी पार करायची असा निर्णय झाला. काही क्रांतिकारकांनी पेरूच्या बागेत आश्रय घेतला पण त्याचया पलीकडे पाणी असल्यामुळे त्यांना पुढे सरकता येईना.

जिनपाल खोत व अजून दोन साथीदारांनी रोरावणार्या कृष्णेच्या महापुरात उडी मारली.

दरम्यान अण्णासाहेब पत्रावळे चा पाय गाळात अडकला आणि पाठीमागून येणाऱ्या पोलिसांच्या गोळी ने त्यांना टिपले. पोहत नदी पार करत असणाऱ्या बाबुराव जाधवला पण गोळी लागली.

त्यांचा लालभडक मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.हे दोन्ही मृत्यू डोळ्यासमोर झाल्याने क्रुद्ध झालेले वसंतराव त्वेषाने लढू लागले. जयराम कुष्टेनी त्यांना तुम्ही पुढे जा आम्ही पोलिसांना थांबवून धरतो असं सांगितलं.

पण वसंतदादा म्हणाले,

“लहान मुलांचा बळी देऊन मला जायचे नाही आता मेलो तरी बेहत्तर”

जिनपाल खोत आणि सहकारी पलीकडच्या काठावर पोहचले.एव्हाना पेरूच्या बागेतील क्रांतिकारक पोलिसांच्या हाती लागले होते.

उंबराच्या झाडामागे लपून लढणाऱ्या वसंतरावांच्या बंदुकीची कळ ऐनवेळी निकामी झाली आणि पोलिसांच्या गोळीने त्यांच्या उजव्या खांद्याचा अचूक वेध घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध झालेल्या वसंतराव पाटलांना पोलिसांनी जेरबंद केले. 3 क्रांतिकारक वगळता सर्व क्रांतिकारक पोलिसांना सापडले. दोन जण शहीद झाले.त्या दोघांच्या मृत्यूचे व्रण आयुष्यभरासाठी वसंतदादाच्या मनावर उठले.

फसलेली मोहीम ?

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही थरारक घटना. रूढार्थाने म्हणावं तर ही मोहीम फसली. मात्र ह्या क्रांतिकारकांचे कार्य वाया गेले नाही. कधीही सूर्यास्त न होणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या किल्ल्याला भगदाड पडता येऊ शकते ही प्रेरणा सह्याद्रीच्या असंख्य तरुणांच्या मनात जागली. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याने लढणारया क्रांतिकारकांच्या प्रतिसरकारची दखल ब्रिटिश संसदेत सुद्धा घेण्यात आली. स्वातंत्र्य संग्रामा मध्ये आपला वाटा आशा परीने मराठी क्रांतिकारकांनी उचलला.

सर्व क्रांतीकारकांना कडक शिक्षा झाल्या पण काही वर्षांनी जनतेच्या दबावामुळे सगळ्यांची सुटका झाली. सर्वत्र जल्लोषात यांचे स्वागत करण्यात आले.

पुढे स्वातंत्र्य प्राप्ती नंतर हे क्रांतिकारक परत आपल्या उद्योगाकडे लागले.काही जण शेतीकडे वळले, काही जण नोकरी ला लागले. बंदुका व बॉम्ब खेळवणारे हात सगळे विसरून तुमच्या आमच्या गर्दीतील एक भाग बनून सामान्य आयुष्य जगू लागले.

FB IMG 1532070648457

वसंतदादा पाटलांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. अंगात असलेल्या पहिलवानकीप्रमाणे रांगड राजकारण केलं , मुख्यमंत्री पद भूषवल पण कधी मातीला विसरले नाहीत.. त्यामुळे त्यांची जनतेचा मुख्यमंत्री ही बिरुदावली कोणी हिरावू शकले नाही.

सरस्वतीच्या उपासकांचा वरदहस्त डोक्यावर नसल्यामुळे इतिहासाने या क्रांतिकारकांच्या वर अन्याय च केला.

या घटनेचे अखेरचे साक्षीदार स्वातंत्र्यसेनानी जयराम कुष्टे यांचे आज वयाच्या १०४ व्या वर्षी सांगलीमध्ये निधन झाले. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे स्मरण करू.

“मांडियला यज्ञ तो न अजून संपला| वेगाने तो तर मग परत पेटला |
क्षण आता एक न पुरे दास्य जाळण्या | तो क्षण दे मायभूमी एकदा पुन्हा || “

(या लेखासाठी महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा या राजा माने यांच्या पुस्तकाची व क्रांतिकारक जयराम कुष्टे या पुस्तकाची मदत झाली)

  • भूषण टारे.
3 Comments
  1. sarvesh says

    Mast re bhidu bhusha..!

  2. Mohsin Mulani says

    सांगलीचे भाग्य विधाते

  3. Rahul says

    🙏🙏🙏🙏

Leave A Reply

Your email address will not be published.