दादा म्हणाले मिलिट्रीवाल्याला गुलाल लावा, लोकांनी त्यांना थेट आमदारच केलं..!
वसंतदादा पाटील म्हणजे एकदम मोकळ्या मनाचा आणि दिलदार माणूस. सातवी नापास असले तरी संपूर्ण राज्याच्या राजकारणावर होल्ड ठेवणारा नेता अशी ओळख. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद ४ वेळा भूषवलेल्या वसंतदादांचे राज्यातील आणि काँग्रेस पक्षातील वजन साऱ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे.
सांगलीत तर दादांनी फक्त “याला गुलाल लावा” असा संदेश दिला की लोक त्या उमेदवाराला निवडून द्यायचे.
पण राजकारणाच्या या प्रवासातही अगदी अखेर पर्यंत ते आपल्या स्वभाव धर्माप्रमाणेच वागत राहिले. माती आणि शेतीचे संस्कार असल्यामुळे माणूस जोडण्याच कसब अफलातून होते. त्यांच्याबरोबरच्या सहवासात आलेल्या अनेकांना हा अनुभव येतो.
असाच अनुभव आला होता तो जतच्या माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांना.
१९८५ सालची गोष्ट आहे. वसंतदादा त्यावेळी बाबासाहेब भोसलेनंतर मुख्यमंत्री बनले होते. विधानसभा निवडणूक जवळ होती. एक दिवस जत तालुक्यातील लोक वसंतदादा पाटील यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले,
‘आमच्या तालुक्यातील मिल्ट्रीवाला लोकांच्यासाठी काम करतोय. त्याला तिकीट द्या.”
दादा त्यांना म्हणाले,
‘त्या मिल्ट्रीवाल्याला माझ्याकडे घेऊन या.’
नागेवाडीच्या माळावर त्यावेळी पंचायत समिती सदस्य असलेले उमाजीराव दादांना भेटायला गेले. दादांनी बोलता-बोलताच उमजीरावांची मुलाखत घेतली. आणि माळावरच उभं राहून सांगितले,
‘पोरा तू जा. तुझे तिकीट फायनल आहे. तयारीला लाग.’
तत्कालीन २ वेळचे आमदार राहिलेले आणि वसंतदादांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे अॅड. जयंत सोहनी यांच्या जागी सनमडीकर यांना तिकीट देण्यात आलं.
उमाजीराव हे मुळचे जत तालुक्यातील सनमडी गावचे. त्यापूर्वी भारतीय सैन्यदलात कार्यरत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण करून १९६२ साली सैन्यात दाखल झाले. शिपाई, हवालदार, नायक या पदावर काम केलेल्या सनमडीकरांचा १९६५ सालच्या युद्धात सहभाग होता.
त्यानंतर १९७१ च्या दरम्यान सनमडीकरांची निवड मुंबईला अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी झाली. तिथे कार्यरत असताना ज्या सैनिकांना जमीन नाही त्यांना त्यांच्या गावात जमीन मिळावी म्हणून ते अर्ज करायचे. त्यामुळे नेतृत्व गुण उपजतच होतेच. त्यांना सगळे तिथं लीडर म्हणत.
पुढे १९७७ साली निवृत्त होऊन गावी आले आणि लोकांची कामे करायला लागले.
त्याच वर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहिले. निवडून आले आणि लगेचच उपसरपंच झाले. त्यानंतर १९७९ साली पंचायत समितीच्या निवडणुकीत तालुक्यात सर्वात जास्त मतांनी निवडून आले. त्यांनी केलेली कामे लोकांना आवडू लागली.
४-५ वर्षातील काम बघून पुढे जत राखीव मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून १९८५ मध्ये विजयसिंह डफळे राजे आणि तालुक्यातील लोकांनी वसंतदादा पाटील यांच्याकडे साकडे घातले.
दादांनी उमेदवारी दिली आणि १९८५ साली सनमडीकर आमदार झाले. कॉंग्रेसला देखील २८८ पैकी १६१ जागा मिळाल्या. वसंतदादा पुन्हा मुख्यमंत्री झाले.
पुढे ९० सालच्या निवडणुकीत कॉंग्रेस रिपब्लिकन पक्षाची युती झाली आणि हा मतदारसंघ रिपब्लिकला गेला. सनमाडीकरांनी अपक्ष उभे राहुन निवडणूक जिंकली. पुढे १९९५ ला पराभूत झाले.
आणि त्यानंतर २००४ साली असं तीन वेळा निवडून आले. पुढे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.
हे ही वाच भिडू
- नगर मधल्या सर्वात हूशार माणसामुळं सांगली जिल्ह्यात कारखाना उभा राहू शकला
- या सांगलीकराने पुण्याला प्रत्येकवेळी सावरलं.
- सांगली जिल्ह्यास द्राक्षभूमी बनवणारा अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला..