सातारा जिल्ह्यातल्या या किल्ल्यावर रावणाच्या भाच्याचं मंदिर आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेलं भव्य असं मराठा साम्राज्य. ज्याच्या पाऊलखुणा आजही अस्तित्वात आहेत. त्यांच्या शौर्याच्या आणि पराक्रमाच्या गाथा कथा – कादंबऱ्यांमधून तर आपण आज ऐकतोच पण या सगळ्याची साक्ष म्हणून गडकिल्ले आजही खंभीरपणे उभे आहेत. त्यातलाच एक गड म्हणजे वसंतगड.
वसंतगड हा साधा, सरळ, सोपा किल्ला. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाडच्या अलिकडे १३ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पुणे-बंगलुरू नॅशनल हायवेच्या जवळचा. तिथलं तळबीड हे किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं गाव. छत्रपती शिवरायांच्या मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते आणि त्यांची कन्या रणरागिणी महाराणी ताराबाई याचं गावचे.
वसंतगड हा किल्ला इतर किल्यांच्या मानाने कमी उंचीचा पण पसरट. आधी या किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगरचढाई करायला लागायची. पण नंतर ग्रामस्थांनी गडावर जाण्यासाठी जवळपास दीडशे पायऱ्या बांधल्या. पायऱ्या चढल्यानंतर गडाचं प्रवेशद्वार लागतं. तिथून जेमतेम अर्ध्या ते पाऊण तासात आपण गडावर पोहोचतो. भोज शिलाहाराने बांधलेल्या किल्ल्यात वसंतगडाची गणना होते. सातवाहन काळातील बरेच अवशेष या परिसरात सापडलेले आहेत.
या किल्ल्याला छत्रपती शिवारायांमुळे ऐतिहासिक वासरा आणि ओळख तर आहेच. पण सोबतच त्याला पौराणिक जोडही आहे. तसं तर शिवाजी महाराजांच्या हर एक किल्ल्यावर एखाद ऐतिहासिक मंदिर असतचं. जी मुख्यतः देवदेवतांची असतात. या गडावरही प्रवेशद्वारातून आत गेल्यावर डाव्या हाताच्या पडक्या मंदिरात श्रीगजाननाची मीटरभर उंचीची शेंदरी मूर्ती आहे. तसेच गडात एक छोटेखानी प्राचीन शिवमंदिरही आहे.
पण विशेष म्हणजे या गडाच्या मध्यभागी दैत्य कुळाचेही एक मंदिर आहे. ते मंदीर म्हणजे चंद्रसेन महाराजांचे. असं म्हणतात कि, चंद्रसेन दैत्य कुळातले जे रावणाचे भाचे होते. रावणाप्रमाणेच त्यांनीही भगवान शंकराची तपःश्चर्या करुन खड्ग मिळवले होते. पुरातन असणाऱ्या या भव्य अश्या मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर उजवीकडच्या भिंतीत ताम्रपट असून त्यावर काही नोंदी कोरलेल्या आहेत. ज्यानुसार १७००च्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे.
या मंदिराच्या स्थापने मागची आख्यायिका सांगताना ग्रामस्थ रामायणाचा संदर्भ सांगतात कि, भगवान राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना ते या भागातही राहिले होते. गडावरील वनराईत तपश्चर्या करीत असताना लक्ष्मणाजवळ असलेलं खड्ग शस्त्र नजर चुकीनं लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले. तरीसुद्धा चंद्रसेन महाराजांनी शंकरांची तपश्चर्या पूर्ण केली.
त्यानंतर भगवान राम आणि लक्ष्मणाने वर दिला कि, चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराज पुजले जातात.
मंदिरात असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मुर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत आहेत, त्यामुळे अख्यायिकेला दुजोरा मिळतो. चंद्रसेन देवांची मूर्ती हीं रामायण काळातील आहे.
चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात येथे मोठी जत्रा भरते. तिथल्या आसपासच्या अश्याच एका खास प्रसंगी जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. त्यांच्या उजव्या बाजूस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस जानाईदेवीची मूर्ती आहे. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण असल्याचं म्हंटल जात.
जुन्या काळी मंदिरापुढे भव्य दीपमाळ होती. नंतरच्या काळात ती पडली ज्यामुळं. त्याच चौथऱ्यावर दोन दीपमाळा उभारण्यात आल्यात. गडावर कोयनातळे आणि कृष्णतळे अशी पाण्याची दोन मोठी तळी आहेत. कृष्णतळ्याच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी सुद्धा केला जातो.
हे ही वाच भिडू
- पाकिस्तानने ढापलेल्या काश्मीरमध्ये एक लाल किल्ला आहे. त्याचा सुद्धा इतिहास मोठ्ठाय
- एकमागून एक इंटरनॅशनल स्पर्धा भरत गेल्या आणि नजफगड खेळांचा बालेकिल्ला बनला
- अब्दालीचा मुलगा मराठ्यांच्या भीतीने लाहोरचा किल्ला सोडून पळून गेला