राजकारणाच्या डावपेचात एक सल्ला देखील खूप महत्वाचा ठरू शकतो, वाचा हा किस्सा..

राजकारणाच्या डावपेचात लहान आणि मोठ्ठा असा भेदभाव करायचा नसतो. निवडणूक मग ती अगदी ग्रामपंचायतीची असो की राष्ट्रपतीपदाची असो. सल्ला घेवूनच पुढची पाऊलं टाकायची असतात. अशा वेळी सल्ला देणारा आपल्यापेक्षा किती लहान पदावर आहे याचा विचार करायचा नसतो तर त्याचा अनुभव मोजायचा असतो.

असाच एक किस्सा, राजकारणातल्या एका सल्ल्याचा..

विदर्भातील यवतमाळ हे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे होम ग्राऊंड होते. मात्र दरारा होता तो फॉरवर्ड ब्लॉकच्या विदर्भसिंह जांबुवंतराव धोटेंचा. वसंतराव आणि धोटेंमधून विस्तव देखील जात नव्हता.

वसंतराव मुख्यमंत्री असतानाच धोटे विधानसभेत निवडून गेले होते. त्यामुळे मतदारसंघासोबतच आता विधानसभेत देखील दोघांमध्ये अनेकदा आक्रमक चर्चा व्हायच्या. डोक्यावरील वाढलेले केसं आणि भारदस्त दाढी अशा नेहमीच्या अवताराची धोटेंचा सत्तारुढ कॉंग्रेसला नेहमी धसकाच वाटायची

धोटेंच्या याच दराऱ्यामुळे त्यांच्या विरोधात निवडणुका लढण्याची कोणाची हिंमत ही होत नव्हती.

नानाभाऊ एंबडवार, भुपेंद्रसिंग कोंगारेकर, होलेश्वर गादे, प्रल्हादराव बोंक्षे, अ‍ॅड. हरीष मानधना, सुधाकरराव धुर्वे, देवीदास भोरे अशा ‘एक से बढकर एक’ लढवय्या कार्यकर्त्यांची फौज धोटेंजवळ होती, अशा वेळी धोटेंना पराभूत करण्याचं शिवधनुष्य मुख्यमंत्र्यांना पेलायचं होतं.

१९७१ च्या लोकसभा निवडणुकीत धोंटेंनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्याचा कोणी विचारही केला नव्हता. कॉंग्रेसने मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

पण धोटेंना टक्कर देणारा नेता मात्र कॉंग्रेसजवळ नव्हता.

अशा स्थितीत उमेदवारी कोणाला द्यावी हा महत्वाचा प्रश्न होता. वसंतराव नाईकांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. अशा वेळी वसंतराव नाईकांना यवतमाळ जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक असणाऱ्या भीष्मराज बाम यांच नाव आठवलं.

मुख्यमंत्र्यांनी थेट भिष्मराज बाम यांना बोलावणं धाडलं. ठरल्याप्रमाणे भेट झाली. या भेटीत धोंटेंच्या विरोधात कोणता उमेदवार टिकू शकेल असा प्रश्न भिष्मराज बाम यांना विचारण्यात आला. त्यांनी सदाशिव ठाकरे यांच नाव समोर केलं.

तेव्हा विनोबांच्या भूदान चळवळीतील सर्वादयी कार्यकत्रे सदाशिवराव ठाकरे यांना उमेदवारी दिल्यास तेच धोंटेंचा पराभव करू शकतील, असा सल्ला भीष्मराज बाम यांनी वसंतराव नाईकांना दिला.

यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, आमदार असा सदाशिवरावांचा राजकीय प्रवास होता.

यवतमाळ जिल्ह्यात त्यांनी सपत्नीक भूदान पदयात्रा करून, विदर्भात सर्वाधिक जमिनीचे दान मिळविले होते. त्यासाठी आयोजित कार्यक्रमात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते त्यांना सन्मानीतही करण्यात आले होते. गांधी आणि विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून सर्वोदयवादी जीवन जगत होते.

मात्र, कॉंग्रेसच्या सर्व ज्येष्ठ व अनुभवी दिग्गज नेत्यांनी सदाशिवरावची उमेदवारी अजिबात फलदायी ठरणार नाही, जांबुवंतराव धोटे सारख्या अत्यंत आक्रमक, लढवय्या आणि लोकप्रिय उमेदवारांसमोर कॉंग्रेसचे सर्वोदयी नेते, शांत स्वभावाचे आणि अत्यंत सामान्य प्रकृतीचे सदाशिवराव ठाकरे यांचा निभाव लागणार नाही असे वसंतराव नाईकांना सांगितले.

पण मुख्यमंत्र्यांनी सर्व नेत्यांचा सल्ला बाजूला ठेवत सदाशिवराव ठाकरे यांनाच कॉंग्रेसची उमेदवारी दिली.

प्रचार चालू झाला. जांबुवंतरावांचा वऱ्हाडी बाजातील आसमंतात घुमणारा आवाज विरुद्ध सदाशिवरावांचा धीरगंभीर आणि संयमी आवाज. जोरात लढत झाली. हवा धोटेंच्या बाजूने होती.

पण निकालानंतर सदाशिवराव ठाकरेंच्या शांत, संयमी भाषणांपुढे धोटेंची आक्रमकता वाऱ्यासारखी उडून गेली. सदाशिवराव ठाकरे विजयी होऊन लोकसभेत पोहाचले. तर धोटे नागपूरमधून देखील उभे होते. ते तिथून निवडून आले.

वसंतराव नाईकांनी मुख्यमंत्रीपदाचा शिष्टाचार बाजूला ठेवत पोलीस अधीक्षक असलेल्या भीष्मराज बाम यांचे अभिनंदन करत दिलेल्या योग्य सल्ल्याबद्दल आभार ही मानले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.