मी महाराष्ट्राला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी करेन, नाही केल्यास मला फाशी द्या .

महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ मुख्यमंत्रीपदी असणारे मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक. ५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५ सलग बारा वर्ष वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले. यवतमाळ सारख्या मागासलेल्या जिल्ह्यातल्या गहुली या छोट्याश्या गावातील वसंतराव नाईकांचा जन्म.

तुलनेने अत्यंत लहान आणि गरीब असलेल्या बंजारा समाजात झाला. आपल्या आगळ्या कार्यशैलीने त्यांनी मुंबई आणि दिलीच्या राजकारणात आपल्या नावाचा ठसा उमटवला. शेती आणि मातीवर निस्सीम प्रेम असेलेले नाईक साहेब पुढे हरितक्रांतीचे प्रणेते बनले.

त्यांच्या कामाचा आवाका इतका विस्तृत होता की असं कोणताच क्षेत्र नसेल की त्या संधर्भात नाईकांनी निर्णय घेतला नसेल. ग्रामीण रोजगार हमी योजना असेल, गरिबी हटावो योजना व तिची अंमलबजावणी,कृषी विद्यापीठांची निर्मिती असे अनेक निर्णय त्यांनी घेतले ज्याचा महाराष्ट्राला प्रगती करण्यास खूप फायदा झाला. १९५२ साली कॉंग्रेस पक्षाच्या तिकिटावर ते आमदार झाले आणि लगेच उपमंत्री ही झाले. वऱ्हाड भाग तेव्हा मध्यप्रदेश मध्ये  होता. रविशंकर शुक्ला यांचे ते मंत्रिमंडळ होते.

पुढे १९५६ साली हा भाग महाराष्ट्रात सामील झाला आणि नाईक महाराष्ट्राच्या राजकारणात आले. मुख्यमंत्री होण्याआधी त्यांनी सहकार,कृषी आणि महसूल ही खाती सांभाळली होती. त्यापेकी कृषी हे त्यांचे आवडीचे खाते होते. ग्रामीण भागात लहानपण गेले असल्यामुळे नाईक साहेबांना त्यांच्या समस्यांची जाण होती. ते नेहमी म्हणत,

“जर शेती मोडली तर लोकशाही मोडून पडेल.”

जगामध्ये सर्वात जास्त शेतीवर अवलंबून असणारा आपला देश आहे हे ते जाणत होते. तोच धागा पकडून नाईक साहेब महाराष्ट्राला हरित क्रांतीच्या दिशेने घेऊन गेले. महाराष्ट्राचा पदभार स्वीकारल्यानंतर नाईक साहेबांसमोर अन्नधान्य टंचाई सारखा मोठा प्रश्न होता. दिवस दिवसभर लोकं एक किलो गहू किंवा तांदळासाठी रेशनच्या लायनीत उभी राहिलेली असायची इतकी बिकट परिस्थिती होती. हे सर्व नाईक साहेब बारकाईनं  पाहत होते.

vasantrao naik cm5

नाईक साहेबांनी महाराष्ट्राला अन्न,धान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्याचा ध्यास मनात धरला. मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये एक सभा होती. तिला तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपस्थित होते. याच सभेत नाईकसाहेबांनी घोषणा केली

“मी अन्न धान्याच्या बाबतीत महाराष्ट्राला स्वावलंबी करू शकलो नाही तर मला फासावर द्या”.

त्यांच्या या घोषणे मागे महाराष्ट्रातील सामान्य लोकांची तळमळ होती. त्या तळमळीला हा नेता साद घालू पाहत होता. काही वाटेल ते झालं तरी चालेल पण आपलं राज्य अन्न धान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालेच पाहिजे. घोषणा करून नाईक साहेब लगेच कामाला लागले. त्यावेळी महाराष्ट्र अमेरिकेवर अवलंबून होता. अगदी रेशनवर वाटण्याचा गहू पण आपल्याला अमेरिका पुरवायची.

सखोल माहिती घेतल्यानंतर वसंतराव नाईकांच्या हे लक्षात आले की आपले दर एकरी उत्पन्न पाच पोत्यांचे आहे ते जोवर पंचवीस पर्यंत जात नाही तोवर आपण स्वावलंबी होणार नाही. त्यांनी पुढे हायब्रीड धान्याचे माहिती घेतली आणि तिचा प्रचार महाराष्ट्रात सुरु केला. विरोधी पक्षांनी हायब्रीड चा बराच अपप्रचार केला. हायब्रीड खाल्याने अपंगत्व येतं, अंधत्व येतं असा खोटा प्रचार त्या काळी विरोधकांनी केला.

पण नाईक साहेबांनी ही आपला प्रचार चालूच ठेवला जाईल तिथे शेतकऱ्यांना ते विश्वासाने सांगत,

“जोवर तुमचे उत्पन्न वाढणार नाही तोवर तुम्ही समृद्ध होणार नाही.”

त्या काळात एक एक मैल रेशनच्या रांगा लागायच्या. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या ज्वारीला किलोला ३५ पैसे भाव चालू होता. एकीकडे आड आणि एकीकडे विहीर अशी ही परिस्थिती होती. नाईक साहेबांनी रेशनवर ज्वारी देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला.

सरकार पहिल्यांदाच व्यापाराच्या भुमिकेत येणार होते. शेतकऱ्याकडून ज्वारी थेट विकत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री सुब्रमण्यम यांनी उघड विरोध केला, पण लाल बहादूर शास्त्री यांनी पाठींबा दिला आणि योजना अमलात आली. नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळात अनुभवी दिग्गज माणसे होती.

बाळासाहेब देसाई, मधुकरराव चौधरी, अर्थमंत्री जीवराज मेहता, यशवंतराव मोहितेंसारखी माणसे होती. सर्वांची चर्चा झाली आणि निर्णय झाला. शेतकरयाची सर्वच्या सर्व ज्वारी आपण एकाधिकार पद्धतीने विकत घ्यायची. तेव्हा ज्वारीला ३५ रुपय क्विंटल चा भाव होता म्हणजे ३५ पैसे किलो शेतकरी मरत होता. शेतकऱ्याकडून ६५ रुपय क्विंटलने ज्वारी घ्यायचे ठरले.

सर्व मंत्र्यांना तसे आदेश देण्यात आले आणि बघता बघता कलेक्टर कार्यालयासमोर उंचच्या उंच ज्वारीच्या थप्या लागू लागल्या. मग तीच ज्वारी रेशन मध्ये वाटण्यात आली आणि संकटाच्या काळात महाराष्ट्राला जगवणारा मुख्यमंत्री म्हणून वसंतरावांना नावाजलं गेलं.

इतक्यात नाईक साहेब थांबले नाहीत त्यांनी कमी पाण्यात जास्ती चांगली उत्पादन देणाऱ्या बियाण्याचा शोध घ्यायला सुरवात केली. त्यांनी महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे यु .जी. सीकडून  मंजूर करून आणली. त्यातील एक राहुरीला, दुसरे दापोलीला, एक अकोल्यात आणि एक विदर्भात परभणीला त्यांनी दिले. पुढे याच विद्यापीठांनी शेतीतल्या वेगवेगळ्या विषयांवर उत्तम काम केले ज्याचा महाराष्ट्राला प्रचंड उपयोग झाला.

पुढे वि.स. पागे यांच्या कल्पनेतून रोजगार हमी योजना तयार झाली. चाणाक्ष नाईक साहेबांनी तिचा उपयोग ही शेती साठी करून घेतला. उन्हाळ्यात तळ्यातला गाळ काढणे, नविन तळी खोदणे अशी कामे त्यांनी या योजने अंतर्गत करून घेतली. जेणेकरून पावसाळ्यात त्यात पाणी साठेल आणि शेतीला पुरेसे पाणी उपलब्ध होईल.

नाईक साहेबांनी  शेतकऱ्याला पुरेसं पाणी आणि वीज देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जायकवाडी, उजनी, पेंज आणि अप्पर वर्धा सारखी अनेक धरणे उभी केली. तर कोराडी, पारस,खापरखेडा ,परळी,भुसावळ सारखे विद्युत प्रकल्प ही उभे केले.

१९७२ चा तीव्र दुष्काळ ही त्यांनी पाहिला त्यातून त्यांनी महाराष्ट्राला तारुण नेले. याकाळात सुद्धा ह्या द्रष्ट्या नेत्याने लोकांना रोजगार हमी योजनेत कामाच्या मोबदल्यात धान्य दिले आणि महाराष्ट्रात अनेक तळी खणून घेतली. पुढे ते खासदार म्हणून केंद्रात गेले. पण शेवट पर्यंत महाराष्ट्राला दिलेल्या शब्दाला ते जगले.

म्हणूनच महाराष्ट्र या हरित क्रांतीचे प्रणेतेच्या गौरवार्थ त्यांच्या जयंतीला कृषीदिन साजरा करतो.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.