मुख्यमंत्र्यांनी खिश्यातून बंदूक काढली आणि एका हाताने नेम धरून वाघ मारला..

वाघाची शिकार ! काय म्हणता.

अहो इथे माणसं मारणारा वाघ मारायचे आदेश द्यायचे म्हणले तरी कोर्टात जायला लागतं. विशेष परवानगी घेवून वाघ मारण्याचे आदेश दिलेच तर काय होतं हे माजी वनमंत्र्यांना विचारू शकता. 

आत्ता विचार करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वाघाची शिकार केली होती तर तुमचा विश्वास बसेल का ?

नाही ना.. 

पण हा किस्सा तसाच आहे.

माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केलेल्या वाघाच्या शिकारीचा. 

वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. एका हातात पाईप असणारे वसंतराव त्यांच्या खास स्टाईलसाठी देखील प्रसिद्ध होते. मुंबईच्या राजकारणातून वेळ मिळाला की ते ताडोबाला जावून निवांत विश्रांती घ्यायचे. अशाच एका अधिवेशनातून मोकळं झाल्यानंतर त्यांनी ताडोबाचा रस्ता पकडला. 

नागपुरच्या विमानतळाहून त्यांची ओपन जीप ताडोबाच्या दिशेने वळली. त्यांच्यासोबत तत्कालीन वनमंत्री दादासाहेब देवतळे आणि वसंतरावांच्या पत्नी वत्सलाबाई देखील होत्या. काही दिवसांपुर्वी वसंतराव नाईकांचा अपघात झाल्यामुळे त्यांचा एक हात प्लॅस्टर गुंडाळलेल्या अवस्थेत होता. 

गाडी ताडोबाच्या अभयारण्यात प्रवेश करत असतानाचा वसंतराव नाईकांच्या गाडीसमोर एक वाघ आला. वाघ रस्त्यावर निवांतपणे पहुडला होता. वसंतराव शिकारी असल्याने त्यांना रहावलं नाही. खिश्यातून बंदूक काढत त्यांनी चाप ओढला आणि वाघाची शिकार केली.

एका हाताने धरलेला अचूक नेम वनमंत्री दादासाहेब देवतळेंना विशेष आवडला. 

त्याच रात्री गप्पांच्या ओघात वनमंत्री दादासाहेब देवतळे यांनी मीठ मसाला लावून ही बातमी पत्रकारांना सांगितली. कसा एका हाताने साहेबांनी नेम धरला. वाघ कसा जागच्या जागी खल्लास झाला याच वर्णन लागलीच दुसऱ्या दिवशीच्या वर्तमान पत्रात छापून आले. 

त्या वेळी नुकतच आपलं राज्य स्थापन झालं होतं. लोक अजूनही इंग्रजांच्या कायदाव्यवस्थेतून बाहेर पडले नव्हते, त्यामुळ वाघ मारणं हा गुन्हा आहे हे लोकांच्या लक्षात आल नव्हतं की प्रशासनाच्या. त्यामुळे या बातमीचं पत्रकारांकडून देखील कौतुक झालं आणि लोकांकडून देखील. 

वसंतराव नाईक यांनी मात्र बातमी छापल्याच्या दिवशी सर्वांना ताडोबाच्या विश्रामगृहावर बोलावून घेतलं. सर्व पत्रकार जातीने हजर राहिले. चहापाणी झाल्यानंतर एकाने विषय काढला, 

साहेब तुम्ही मात्र चांगलीच शिकार केली. 

तसे वसंतराव काहीच माहित नसल्यासारखे म्हणाले? 

शिकार, ती आणि कशाची.

अहो वाघाची, आज बातमी लावली आम्ही, तुम्ही वाघाची शिकार केल्याची ? 

वसंतराव म्हणाले, “ कोण म्हणालं, मी तर कुठलीच शिकार केली नाही” 

पत्रकार म्हणाले, “अहो काल रात्री तर तुमच्या शिकारीच वनमंत्र्यांनी चांगलच कौतुक केलं. 

वसंतराव, “अहो राज्यात वाघाच्या शिकारीला बंदी आहे हे माहित नाही का वनमंत्र्यांना. मी कशाला शिकार करु.” 

तेव्हा पत्रकारांच्या लक्षात आले की, वाघाच्या शिकारीला बंदी असल्याने मुख्यमंत्री वाघ मारलाच नसल्याचं सांगत आहेत. 

पत्रकारांना देखील काय ते समजून गेले. जाताजाता पत्रकारांनी देखील स्मितहास्य करुन वसंतरावांचा निरोप घेतला. 

पण “वाघाच्या शिकारीची बातमी” मुबंईच्या राजकारणात तापू लागली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी वाघ मारणं म्हणजे शरमेचीच गोष्ट होती. 

विधानसभेत या मुद्यावरुन वसंतराव नाईकांना लक्ष्य करण्यात आलं. तेव्हा मात्र विधानसभेतल्या चर्चत वसंतराव नाईकांनी आपण वाघाची शिकार केल्याचं कबुल केलं. इतकच काय पुर्वीपासून शिकारी असल्याने समोर वाघ पाहताच भावना आवरता आल्या नाहीत. झाली ती चूक झाली अशी पुष्टी देखील त्यांनी जोडली. 

पुढे बोलत असताना वसंतराव नाईकांच्या डोळ्यात पाणी आले. अश्रुपुर्ण अंदाजात ते सभागृहात म्हणाले,

माझ्याकडून चुक झाली पण तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. 

या चर्चेनंतर मात्र सर्वांनीच या विषयावर पडता टाकला, आणि वाघाची शिकार करणारे एकमेव मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईकांच नाव इतिहासात कोरलं गेलं. 

हे ही वाचा भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.