१९ वर्षांच्या लढ्यानंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच पत्र पाठवलं आणि….

मराठी कोरा या सोशल साईटवरती अरुण नारायण सबनीस यांनी हा किस्सा लिहला होता. त्यांच्या अकाऊंटवरून ते सिडकोचे माजी महाव्यवस्थापक असल्याची माहिती मिळते. त्याचसोबत प्रख्यात अभिनेते सचिन पिळगावकर यांचे ते सासरे असल्याची माहिती मिळते.

पण त्याहून अधिक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संदर्भातून लिहलेला हा किस्सा. 

हा किस्सा त्यांच्याच भाषेत…

माझे वडील १९ वर्षे महाराष्ट्र राज्याच्या शासकीय सेवेत होते.

ते अत्यंत कष्टाळू आणि मेहनती होते. त्यांच्या कामावर त्यांचे एवढे प्रेम होते की पूर्ण १९ वर्षाच्या सेवा काळात कोणत्याही प्रकारची एकही सुट्टी त्यांनी कधीही घेतली नाही. रविवारी सुद्धा ऑफिसमधे जाऊन काम करत एकटे बसत.हे सर्व त्याच्या सर्विस बुकावरुन मला त्यांच्या निधना नंतर समजले.

दुर्दैवाने वयाच्या ५६ व्या वर्षीच शासकीय सेवेत असतानाच एका रविवारी अगदी किरकोळ आजाराने त्यांचे अचानकच निधन झाले.

ठणठणीत प्रकृतीमुळे आयुष्यभर आपण एका नव्या पैशाचे सुद्धा औषध न घेता जगलो याचा त्यांना फारच अभिमान होता. इतका की अगदी या शेवटच्या आजारात सुद्धा त्यांनी डॉक्टर कडे जाण्याचे टाळले आणि हाच त्यांचा दुराभिमान जीवघेणा ठरला.

त्यांच्या मृत्यूपश्चात यांच्या कपाटातील १-२ भरगच्च पत्रव्यवहाराच्या फायली पाहून मी त्या कुतुहलाने वाचायला लागलो.

एरवी त्यांच्या कपाटाला हात लावण्याची सुद्धा आमची हिम्मतच नव्हती. तशी आम्हाला कडक ताकीदच होती !

या फायलीवरुन मला असे कळले की जवळपास 19 वर्षे ते ज्या पोस्टवर काम करत होते होती ही पोस्टच “टेम्पररी” म्हणजे तात्पुरती होती.

म्हणजे ते स्वतः जरी शासकीय सेवेत “कायम” झालेले होते, तरीही ज्या वरिष्ठ पदावर ते बरीच वर्षे काम करत होते ते पद मात्र १९ वर्षे “तात्पुरते” म्हणूनच मंजूर होते.

ते पद कायम स्वरुपी करावे यासाठी माझ्या वडिलांनी सतत १९ वर्षे केलेला सर्व पत्रव्यवहार मला समजला. शासनाने ज्या तात्पुरत्या वरिष्ठ पदावर त्यांची बढती देऊन नेमणूक केली होती ते पद कायमस्वरूपी समजावे किंवा करावे अशी विनंती या सगळ्या पत्रव्यवहारातून त्यांनी शासनाकडे वारंवार केली होती. परंतु १९ वर्षात त्यांच्या विनंतीला शासनाने कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नव्हता.

निदान त्यांच्या फाईली वरून तरी मला तसेच स्पष्ट दिसत होते.. मला हे सर्व वाचून प्रचंडच वाईट वाटले व शाॅकच बसला.

कारण माझ्या वडिलांनी शासनाची प्रचंड निष्ठेने आयुष्यभर सेवा केली होती. त्यांच्या सर्विस बुकावरून मला असे दिसले की त्यांनी कधीही ही साधी किरकोळ रजा, नैमित्तिक रजा, आजारपणाची रजा किंवा अर्जित रजा अशी कोणती ही रजा यांच्या सेवेमध्ये हे एकदाही घेतलेली नव्हती.

फक्त काम आणि काम हाच त्यांचा एकमेव विरंगुळा होता. इतके प्रचंड निष्ठेने “अति ” काम करून सुद्धा यांच्या कष्टांची मेहनतीची शासनाने “माती “केली होती.

हे सर्व पाहून मला अत्यंत वाईट वाटले. या कारणामुळे यांच्या आकस्मिकपणे झालेल्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांना कोणतीही शासकीय मदत देण्यात आली नव्हती.

यामुळे त्यांची वरिष्ठ पदावर केलेली १९ वर्षाची “तात्पुरती” नेमणूक पेन्शन पात्र समजली गेली नाही. त्यामुळे आईला सुद्धा “फॅमिली पेन्शन” ला मुकावे लागले होते.

मी या सर्व फाइली नीट अभ्यासून एका इन लॅंड पत्रा वरती त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या पत्नी सौ वत्सलाबाई नाईक यांना माझ्या आईच्या स्वाक्षरीने वर्षा बंगल्यावर एक खाजगी पत्र पाठवले.

त्यात मला वरील फाईलींच्या अभ्यासातून समजलेली सर्व आवश्यक माहिती बारीक अक्षरात लिहून शेवटी,

” तुम्ही एक स्त्री आहात. १९ वर्षात एकही रजा न घेता, रविवारी सुद्धा काम करत सलग १९ वर्षे सेवा देणार्‍या एका शासकीय कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्निला होणारे कष्ट समजावेत म्हणून हे खासगी पत्र तुम्हाला लिहावे लागले आहे. हेच पत्र जर मुख्यमंत्र्यांना पाठवले तर ते सचिव, अवर सचिव,उपसचिव, अशा खालती सरकवण्या पलिकडे काहीही उत्तराविना अगोदरच्या पत्रांप्रमाणेच फिरत राहील. तरी तुमच्या बहिणीचे हे दुःख्ख आहे असे समजून तुम्ही स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलावे “

अशी कळकळीची विनंती केली होती.

आणि काय आश्चर्य !!

हे पत्र पाठवून ८-१० दिवसच झाले असतील एवढ्यात वडिलांच्या ऑफिस कडून आम्हाला पेन्शन मंजूर झाल्याचा आदेश आलेला आहे हे असा सुखद संदेश एका पत्राद्वारे मिळाला.

आणि शेवटी वडिलांच्या अति कष्टांची शासनाने केलेली माती, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी च्या हस्ते एका शुभ मूर्तीत परिवर्तीत झाली.

आईला शासकीय फॅमिली पेन्शन मंजूर झाले. तिला ३५ वर्षे म्हणजे वडिलांच्या सेवाकाळाच्या जवळ जवळ दुप्पट काळ हे निवृत्तीवेतन उपभोगता आले.

  •  अरुण सबनीस ( मराठी कोरावरून साभार)

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.