राज्याचा मुख्यमंत्री आणि एक शेतकरी एकत्र येवून शेतीत विक्रम रचत गेले

या विक्रमाची दखल राज्यातील वृत्तपत्रांनी आणि दूरदर्शन वाहिन्यांनी घेतल्याने ही माहिती सर्वदूर पसरली होती.

गोष्ट आहे साठच्या दशकातली. एकदा धोतराला गाठी असलेला एक शेतकरी मुंबईच्या मुख्यमंत्री निवासावर ‘वर्षा’ बंगल्यावर आला होता. तिथल्या सुरक्षारक्षकांनी त्याचा वेश पाहून त्याला आत सोडले नाही.

त्याने सांगितले मुख्यमंत्र्यांना निरोप द्या लक्ष्मण पहिलवान आला आहे. हे नाव ऐकताच स्वतः मुख्यमंत्री बाहेर गेटपाशी आले आणि त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली. आजुबाजूचे सुटाबुटातील अधिकारी चकित होऊन पहात होते. पोशाखातील अंतर गळून गेल होतं.

ते मुख्यमंत्री होते शेतीवर व काळ्यामातीवर प्रेम करणारे वसंतराव नाईक.

विदर्भ मराठवाड्याच्या सिमेवर असणाऱ्या पुसद जवळील गहुली हे त्यांचं मुळगाव. एका बंजारा पाड्यावर लहानाचा मोठा झालेला हा मुलगा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत जाऊन पोहचला त्याच कारण म्हणजे मातीशी त्यांची नाळ कधी तुटली नव्हती.

याच एक उदाहरण म्हणजे पुसदचे लक्ष्मणराव जाधव.

लक्ष्मणराव जाधव हे जुन्या पिढीतील नाईकसाहेबांचे स्थानिक राजकारणातील कार्यकर्ते. ते पहिलवान होते. त्यांच्या रागीट स्वभावाचा दरारा पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मात्र ते जेव्हा नाईकसाहेबांच्या सहवासात आले तिथून त्यांचं आयुष्य बदलून गेलं..

त्यांच्या प्रचंड मोठ्या शारीरिक ताकदीला शेतीत जिरवायचा निर्णय वसंतराव नाईकानी घेतला.

रागीट स्वभाव व पहेलवानी वृत्तीच्या लक्ष्मणरावात निसर्गच सानिध्य, शेतीतील कष्ट आणि नाईकसाहेबांचे विचार यामुळे खूप चांगले आणि उपयोगी बदल झाले. त्यांची शक्ती शेतीच्या कामी आली होती. यातून फक्त शेतीचाच नाही तर त्यांच्या आयुष्याच्या कायापालट झाला.

मुख्यमंत्री झाल्यावरही नाईकसाहेबांच लक्ष आकाशी उडणाऱ्या घारी प्रमाणे पुसदच्या शेती आणि शेतकरी यांच्यावर असायचं.

त्यांचा आधुनिक शेती करण्याकडे कल होता. यातूनच त्यांनी लक्ष्मणरावांना हायब्रीड ज्वारी पेरायला सांगितली. लक्ष्मणरावांनी हायब्रीड ज्वारी पेरल्यावर मुख्यमंत्री स्वतः त्यांच्या शेतात पिकाची पाहणी करायला आले होते.

हायब्रीड हे संकरीत बियाणे असल्याने, हे वातावरण त्यांना मानवेल का? अशी त्यांना चिंता होती. खरतर आज हायब्रीड पीक सर्वत्र घेतलं जातं. त्याबद्दल कदाचित आपल्याला आश्चर्य वाटणार नाही. त्याकाळी जेव्हा हा प्रयोग यशस्वी झाला तेव्हा त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. 

लक्ष्मणराव यांनी सांगितलेल्या काही आठवणी वसंतरावांच शेती आणि शेतकरी यांच्यावरील निस्वार्थ प्रेम सांगतात. 

आधुनिक शेतीचाच अजून एक प्रयोग म्हणून १९७० ला लक्ष्मणराव यांच्या शेतात बसराई-अर्धापुरी जातीच्या केळीची बेणे आणि त्यांच्या लागवडीची माहिती दिली.

पुढ लक्ष्मणराव केळीच विक्रमी उत्पन्न घेऊ लागले. त्यांनी एकावेळी केळीची २५-२६ ची रास काढली होती.

त्यानंतर त्यांनी हिवरा(महागाव) येथून ‘हनुमान’ जातीच्या केळीचे बेणे आणले. नाईकसाहेबांनी सांगितलेल्या पद्धतीने शेती करून त्यांनी ‘हनुमान’ केळीचा ७०-७२ किलोचा एकेक घड काढला. आणि पुढेही काढणे चालूच होते.

नंतर लक्ष्मणरावांनी मिरचीची लागवड केली. मिरच्या त्या वेळी खूप कमी भावात विकल्या जायच्या. तरीही त्यांनी एकरी दीड लाखाच उत्पन्न घेतल होत. नाईकसाहेबांनी त्यांच्या विश्वासू कृषीतज्ञ मुकुंदराव गायकवाड यांना शेतात पाठवून दखल घेतली.

या विक्रमाची दखल राज्यातील वृत्तपत्रांनी आणि दूरदर्शन वाहिन्यांनी घेतल्याने ही माहिती सर्वदूर पसरली होती.

परिणामस्वरूप पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक किर्लोस्कर यांनी लक्ष्मणरावांच मत जाणून घेतलं. सोबत विको-वज्रदंतीचे श्री.पेंढारकर हे खर माहित करून घेण्यासाठी पेपरमधील कात्रण घेऊन थेट लक्ष्मणराव जाधव यांच्या पुसदच्या शेतात आले होते.

लक्ष्मणराव यांच्या मळलेल्या कपड्यांवरील केळीचे डाग ही वेशभूषा पाहून त्यांना विश्वास बसला नाही. त्यांनी विको-वज्रदंतीचा मालक असल्याच सांगून सुटाबुटाची परवा न करता केळीच्या बागेची पाहणी केली.

जाताना त्यांनी लक्ष्मणरावांना यशाच कारण विचारल्यावर लक्ष्मण यांनी सर्व श्रेय नाईकसाहेबाना दिल.

काही दिवसांनी विको वज्रदंतीचे मालक पेंढारकर यांनी पुसदला येऊन लक्ष्मणराव यांना गाडीतून नागपूरला घेऊन गेले.

तिथे त्यांच्या शेतीत केळीची लागवड केली होती. केळीची काळजी घेण्यासाठी त्यांनी जळगाव येथील केळीतज्ञाना बोलावलं होत. त्यांच्यासमोर लक्ष्मणराव यांनी नाईकसाहेबांनी सांगितलेली माहिती सर्वाना सांगितली.

यानंतर लक्ष्मणरावांना पुणे, जळगाव, सांगली, परभणी, अकोला आणि नाशिक राज्यभरातील केळी उत्पादकांनी त्यांच्याकडे आपल्या यशाच सिक्रेट जाणण्यासाठी घेऊन गेले.

वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते मात्र राजकारणापेक्षा जास्त ते शेतकऱ्यांचा विकास कसा होईल याच विचारात मग्न असायचे. दुष्काळापासून राज्याला कस वाचवता येईल ही चिंता त्यांना सतवायची.

जेव्हा-जेव्हा नाईकसाहेब पुसदला जायचे तेव्हा लक्ष्मणरावांना भेटायला त्यांच्या शेताच्या बांधावर हमखास जात. तिथल्या चंद्रमौळी झोपडीत येऊन पोत्यावर बसत. त्यांच्या वडिलांशी गप्पा मारत. मात्र या गप्पा शेतीविषयीच्याच असत.

याच शेतीवरील प्रेमामुळे सर्वात जास्त काळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असलेल्या वसंतरावानी लक्ष्मणराव यांना शेवटपर्यंत अंतर दिले नाही. 

आजकाल कार्यकर्त्यांच्या नावाखाली गुंडांची फौज बाळगणारे नेते पहिले तर आपल्या कार्यकर्त्याला प्रगतीशील शेतकरी बनवणारा, शेतीशी नाळ जोडला गेलेल्या वसंतराव नाईकांचं महाराष्ट्रावरील उपकार आपल्या लक्षात येईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.