लोकं हेलिकॉप्टरची वाट बघत होती आणि इकडे मुख्यमंत्री तोंडात पाईप धरून स्कुटरवर आले

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला संपूर्ण देशात मानाचं स्थान असते. कित्येकजण या पदावर बसण्यासाठी तळमळत असतात. मात्र या खुर्चीवर तब्बल १२ वर्षे बसण्याचा विक्रम केला वसंतराव नाईक यांनीच. इतका प्रदीर्घ काळ त्या आधी तर सोडाच, परंतु त्यानंतर कोणाही मुख्यमंत्र्याला लाभला नाही.

एका मागासलेल्या भागात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या नेत्याने आपला पिढीजात सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही. बुशशर्ट आणि पँट वापरणारे ते पहिले मुख्यमंत्री असतील. आकर्षक व ऐटदार पोषाखाला जोड मिळायची त्यांच्या हातात असणाऱ्या किंवा तोंडात शिलगावलेल्या ऐटदार पाइपची!

त्यांना पाहता क्षणीच मुख्यमंत्रीपदाचा आब जाणवायचा.

१९७२ सालच्या निवडणुका होत्या. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्यभर प्रचाराचं रान उठवलं होतं. दुष्काळात केलेली कामं, हरितक्रांती, रोजगार हमी योजना यावर त्यांचा मुख्य भर होता. या ऐटदार मुख्यमंत्र्याची फक्त एक झलक पाहता यावी म्हणून लोक प्रचाराला गर्दी करत असत.

लातूर मध्ये सभा होती, काँग्रेसकडून तरुण उमेदवार शिवराज पाटील यांना तिकीट मिळालं होतं. त्यांच्या प्रचारासाठी वसंतराव नाईक हेलिकॉप्टरने येणार होते. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता होती. शिवाय मुख्यमंत्री नाईक प्रथमच लातूरमध्ये येत होते.

हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर केली होती.

त्याकाळी हेलिकॉप्टर उतरवण्याची खूण म्हणून धूर केला जायचा. मुख्यमंत्री लातूर जवळ पोहचले आणि योगायोग असा की नेमकं तेव्हाच लातूर- बार्शी मीटरगेज रेल्वेलाइनवर कोळशाच्या इंजिनावर धावणारी गाडी जाण्याची वेळ झाली. 

या रेल्वेच्या इंजिनचा धूर पाहून पायलटला वाटले हेलिकॉप्टर इथेच उतरवायचे आहे. त्या धुराच्या गैरसमजुतीतून नाईक यांचे हेलिकाॅप्टर चुकीच्या ठिकाणी म्हणजे शाळेच्या मैदानावर उतरले. त्या वेळी शाळा सुरू होती, मात्र मैदान रिकामे होते. शाळेत देखील गडबड उडाली.

नेमकं काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाहेर आले. पाहतात समोर तर मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून खाली उतरत होते. त्यांना धक्का बसला. विचित्र परिस्थिती होती. ते तसेच नाईक साहेबांना सामोरे गेले.

थोडंसं चाचरत मुख्याध्यापकांनी मुख्यमंत्र्याना सांगितलं,

‘तुमचे हेलिकॉप्टर उतरवण्याची जागा इथे नाही तर दयानंद महाविद्यालयात आहे,’ 

वसंतरावांना देखील काही तर गोंधळ झाला आहे हे लक्षात आले होते. त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांनाच ‘आता काय करायचे..’ असा प्रश्न केला. सभेची वेळ होत होती. तेव्हा मोबाईल वगैरे काही प्रकार नव्हता.

अखेर मुख्याध्यापकांनी स्वतःची स्कूटर बाहेर काढली. त्यावर बसून वसंतराव नाईक निघाले.

ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. तोंडात पाईप धरलेले ऐटबाज मुख्यमंत्री एका शाळेच्या हेडमास्तरच्या स्कुटरवर बसून सभेला निघाले आहेत हे दृश्य लातूरकरांना पहिल्यांदाच पाहायला मिळत होतं.

इकडे प्रचारसभेत मोठी गर्दी गोळा झाली होती. सगळे वसंतरावांच्या हेलिकॉप्टरची वाट बघत होते आणि अचानक घोषणा झाली,

“साहेब सभास्थळी स्कूटरवर पोहोचलेत.”

उमेदवार शिवराज पाटील, पंचायत समितीचे उपसभापती विलासराव देशमुख यांच्यासह सगळे पदाधिकारी सभास्थळी धावले. पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली. तेव्हा मुख्यमंत्री म्हणाले,

“दिलगिरी कशाला ! बऱ्याच वर्षांनी स्कूटरवर बसायला मिळाले.”

वसंतराव नाईकांचा रुबाबदार पोशाख, त्यांचा निटनिटकेपणा, टापटीप पाहून अनेकांना ते शिष्ट असतील असं वाटायचं मात्र  राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पोहचुनही शेतकऱ्याच्या बांधावरील माती न विसरणारा हा नेता होता. त्या एकासाध्याशा प्रसंगाने त्यांनी लातूरकरांचे मन जिंकले होते.

माजी मुख्यमंत्री कै.विलासराव देशमुख यांनी वसंतराव नाईक यांच्या ‘महानायक’ या गौरवग्रंथात ही आठवण सांगितलेली आहे.

हे ही वाच भिडू.

  

Leave A Reply

Your email address will not be published.