महाराष्ट्राचा असा मुख्यमंत्री ज्याचं नाव शेतकऱ्यांनी आपल्या बंधाऱ्यांना दिलं
महाराष्ट्राची ओळख दगडा धोंड्याचा प्रदेश अशी आहे. दुष्काळ इथे पाचवीला पुजलेला.
असेच एकदा पावसाळ्याचे दिवस होते. पण अजून पावसाला सुरुवात झाली नव्हती. मागील काही वर्षे दुष्काळात गेली होती. अख्खा महाराष्ट्र हवालदिल झाला होते. प्रत्येकाची नजर आभाळाकडे लागली होती.
आणि रुसलेला पाऊस अचानक अवतरला.
आभाळात काळे ढग गोळा झाले, विजांचा कडकडाट झाला, धो धो पाऊस सुरू झाला. मंत्रालयाच्या वरच्या मजल्यावर खिडकीतून पावसाकडे पाहणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी गडबडीत आपल्या शिपायाला १०० रुपयांची नोट दिली आणि पेढे आणायला पिटाळलं.
पाऊस पडला म्हणून अख्ख्या मंत्रालयात पेढे वाटणारा मुख्यमंत्री म्हणजे वसंतराव नाईक.
वसंतराव नाईकांचा जन्मच एका शेतकरी कुटुंबात झाला होता त्यामुळे पिढीजात शेतीचे संस्कार त्यांच्यावरही झाले होते म्हणूनच यशवंतराव चव्हाणांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषिमंत्रीपद दिले होते.
पुढे मुख्यमंत्री झाल्यावरही वसंतराव नाईकांनी आपले सर्व लक्ष शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काय करता येईल या कामी खर्ची घातले.
मी महाराष्ट्राला अन्नपाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं नाही तर मला फासावर लटकवा हे त्यांचं सुप्रसिद्ध विधान होतं.
ते फक्त बोलले नाहीत तर हरितक्रांती करून हे सिद्ध देखील करून दाखवलं.
ज्वारी एकाधिकार योजना, कापूस एकाधिकार योजना, रोजगार हमी अशा योजना आणल्या. शेतकरी समृद्ध झाला पाहिजे हे स्वप्न ते पूर्ण काळ जगले.
शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य लोकांनाही शेतीविषयक समस्यांची जाणीव करून दिली. जबाबदारी व कर्तव्य कसे पार पाडायचे याचे पाठ दिले. काही ठिकाणी नुसती भाषणे न करता शेतात उतरून प्रात्यक्षिके करून दाखवली.
राज्याचा दस्तुरखुद्द मुख्यमंत्रीच नांगर धरतो, पेरणी करतो म्हटल्यावर लोक अचंबित तर झालेच.
शेतकऱ्याला पाणी मिळालं तर तो चमत्कार करून दाखवतो हा त्यांचा आवडता सिद्धांत होता.
वसंतराव आपल्या भाषणात सांगायचे,
जमीन पावसाच्या पाण्याने भिजवा, ते जमत नसेल तर डोक्यावरून पाणी आणा, तेही जमत नसेल तर घामाने जमीन भिजवा पण जमीन ओली करा.
शेतकऱ्याला पाणी मिळावं म्हणून त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मोठी धरणे बांधली, कालवे काढले पण जिथे हे शक्य नाही तिथे खेडोपाड्यातील छोटे छोटे ओढे, नाले यांना बांध घालून पाणी वाया न घालवू देण्याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी प्रशासनाला दिली होती.
पाणी अडवा पाणी जिरवा या योजनेतूनच साकार झाले वसंत बंधारे.
खरे तर हे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे आहेत. हा बंधारा बांधताना त्यामध्ये पाणी अडविण्यासाठी दगडी अथवा काँक्रीटची भिंत बांधावयाच्या ऐवजी लोखंडी खांब घालून मग त्यांतील खाचांमध्ये एकावर एक लाकडी फळ्या दोन ओळींत रचतात.
या फळ्यांच्या दोन ओळींमध्ये चिकणमाती भरून त्यांचा जलाभेद्य भिंतीप्रमाणे उपयोग होतो. दर पावसाळ्यामध्ये ही भिंत काढून टाकून पाणी वाहण्यास मुभा देतात पण पावसाळ्याच्या शेवटी या फळ्या घालून भिंत तयार करून पाण्याचा साठा करतात.
अशा प्रकारच्या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यानंतर लहान प्रमाणावर शेतीसाठी अथवा इतर कामासाठी पाण्याचा साठा कमी खर्चात उपलब्ध करून देता येतो, हा या बंधाऱ्याचा विशेष आहे. वसंतराव नाईकांनी ही संकल्पना राज्यभर वापरायचं ठरवलं.
१९७२ सालचा दुष्काळ ही महाराष्ट्राने पाहिलेलं सर्वात मोठं संकट होतं.
याच्या दोन वर्षे आधी पासून दुष्काळ सुरू होता. ७२ साली याचा कडेलोट झाला. वसंतराव नाईकांनी या संकटाचादेखील खुबीने वापर करून घेतला.
संपूर्ण राज्य रोजगार हमीच्या योजनेवर काम करत होतं. या मनुष्यबळाचा वापर गावोगावी बंधारे बांधण्यासाठी करण्यात आला. परत दुष्काळासारखी परिस्थिती उदभवली तर त्याला सामना करण्यासाठी हे बंधारे उपयोगी पडणार होते.
ही योजना १००% यशस्वी ठरली.
रोजगार हमीच्या कामामुळे दुष्काळात एकही भूकबळी गेला नाही उलट गावोगावी रस्ते आणि बंधारे उभे राहिले. बंधारे व पाझर तलाव यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कमी पडल नाही.
वसंतरावांच्या प्रति कृतज्ञता म्हणून या बंधाऱ्याला वसंत बंधारा ही ओळख मिळाली.
संदर्भ- महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक
हे ही वाच भिडू.
- लाखों संकटात लोकांना जगवणारी ‘मनरेगा’ एस्टीच्या १५ पैशातून सुरू झाली.
- राज्याचा मुख्यमंत्री आणि एक शेतकरी एकत्र येवून शेतीत विक्रम रचत गेले
- सांगली जिल्ह्यास द्राक्षभूमी बनवणारा अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला..