कोणतीही ऑफर न स्विकारता वसंतराव नाईक मानाने मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले.

माजी सनदी अधिकारी भालचंद्र देशमुख हे बी. जी. देशमुख या लोकप्रिय नावाने ओळखले जातात. 1951 साली ते मुंबई इलाख्यातून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन आय. ए. एस बनले. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये त्यामुळे विविध पदांवर कामे केली. त्यानंतर राजीव गांधी यांनी त्यांना 1986 मध्ये दिल्लीला बोलावून घेतले आणि कॅबिनेट सेक्रेटरी म्हणून प्रशासनातील सर्वोच्च पदावर नेमणूक केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते खास सेक्रेटरी होते.

मुख्यमंत्र्यांचे सेक्रेटरी असल्यामुळे त्यांनी , वसंतराव यांच्याशी संबंधीत घडवलेल्या घटना ह्या जवळून अनुभवल्या होत्या. त्यातीलच एक घटना अशी होती कि, 1974 च्या काळात बी. जी देशमुखांच्या हळूहळू लक्षात यायला लागले कि, इंदिरा गांधीं या वसंतरावांना आपल्यापासून दूर ठेवीत चालल्या आहेत. वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही 1963 मध्ये यशवंतराव चव्हाण यांचे अनुयायी व सर्वात जवळचे म्हणून झालेली होती. एक प्रकारे यशवंतरावांचे राजकीय छत्र त्यांनी वसंतरावांवरती धरले होते.

परंतू ही फक्त सुरुवातीची गोष्ट होती. त्यांनी अफाट मेहनत प्रशासकीय कौशल्य राजकीय चाणाक्षपणा दाखवून केवळ स्वकर्तुत्वावर नेतेपद मिळवले होते.

धान्य उत्पादनात महाराष्ट्राला स्वयंपूर्ण बनवण्याचे वसंतरावांचे प्रयत्न हे तर सर्वमान्य झाले आहेत. 1972-73 मध्ये राज्यांची दुष्काळा समान अभूतपूर्व अशी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी 50 लाख लोकांना टंचाई निवारणाच्या केंद्रावरती काम दिले होते. या कल्पक योजनेमुळे ते देशभर प्रसिद्ध पावले. त्यांची रोजगार हमी योजना ही तर भारतातील ग्रामीण भागाच्या उत्कर्षाची वाटचाल करणारी ठरली होती.

1974 मध्ये त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची विक्रमी दहा वर्ष पुरी झाली होती. या विक्रमाचा कोणालाही हेवा वाटावा असा तो होता.

1967 नंतर इंदिरा गांधींनी त्यांना हाताशी धरले होते ते यशवंतरावांचे महाराष्ट्रातील वजन कमी करण्यासाठी. आपले ‘खास मर्जीतले’ अशी त्यांनी वसंतरावांना वागणूक दिली होती. दिल्लीतील अनेक बैठकांमध्ये अधिवेशनामध्ये हे त्यांच्या जवळच्या लोकांनी अनुभवले होते. त्यामुळे ते केव्हाही इंदिरा गांधींची सहज संपर्क साधू शकायचे.

पण 1974 पासून वसंतरावांचे महत्व कमी करण्याची मोहीम चालू केली गेली. त्यासाठी त्यांच्यावरती मुंबईमध्ये ‘शिवसेनावादी’, ‘शिवसेनेकडे कल असणारे’ असे आरोप केले गेले.

कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी वसंतरावांची दोस्ती होती. ही दोस्ती एवढी घनिष्ठ व खाजगी पातळीवरती होती कि, पंतप्रधानांच्या कार्यालयातील काही लोक चर्चा करत असायचे कि,

“हे तीन राज्ये एकत्र येऊन त्या आधारे काही साध्य करू पाहणार आहेत कि काय?”

त्यावेळी देविकांत बरूआ हे पेट्रोलियम मंत्री होते. तेही वसंतरावांचे चांगले मित्र होते. ते जेंव्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले तेंव्हा त्यांनीही इंदिरा गांधींप्रमाणे वसंतरावांशी राजकीय डावपेच सुरु करून वागायला सुरुवात केली. आपण जेंव्हा मुंबईला काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून आलो तेंव्हा आपल्याला हवी तशी आदरणीय वागणूक वसंतरावांनी दिली नाही असा कांगावा त्यांनी उगाचच सुरु केला होता.

केंद्रातील काँग्रेस चे नेतृत्व हे आता गटबाजी निर्माण करण्याचा खेळ सुरु करू पाहत होते. मराठवाड्यातील नेतृत्वामध्ये वसंतरावांना कोणताही कोणीही प्रतिस्पर्धी नव्हता आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्येही आपला चांगला जम बसवला होता. तेंव्हा महाराष्ट्रात अशा स्पर्धक नसलेल्या नेत्याला काबूत कसा ठेवायचा? म्हणूनही त्यांच्या विरुद्ध असे राजकारण सुरु झाले असावे. मराठवाड्याच्या हिताकडे व विकासाकडे त्यांनी आपल्या परीने आटोकाट प्रयत्न केले होते.

परंतु केंद्रीय नेतृत्वाने मराठवाड्यातील अन्य पुढाऱ्यांना वसंतरावंविरुद्ध चिथावणी देऊन त्यांच्याविरुद्ध एक फळी निर्माण करण्याचे सातत्याने व उघडउघड प्रयत्न चालवले होते.

बी.जी.देशमुख सांगतात, त्यावेळच्या मुंबईतील अनेक बैठका मला आठवतात असे, या बैठकांमध्ये मराठवाड्यातील अनेक पुढाऱ्यांनी वसंतरावावरती तीव्र, कडक व खोट्यानाट्या वैयक्तिक आरोपांची शिवराळ उडवावयास कमी केले नाही.

फेब्रुवारी 1975 मध्ये दिल्लीमध्ये त्यांच्याबरोबरच्या भेटीचा शेवटचा अधिकृत सहवास देशमुख यांना घडला होता. दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये त्यांच्याबरोबर देशमुख आत शिरल्यानंतर त्यांच्या एकदम लक्षात आले की वसंतराव आता खिन्नमनस्क झाले आहेत. त्यांच्याशी बोलताना वसंतराव नाईक उदासपणे म्हणाले की,

“तुम्ही आता काय करणार?

बी.जी.देशमुख सांगतात, त्यांच्या प्रश्नाने मी बावचळून गेलो. मग आम्ही सोबतच 1, सफदरजंग रोडवरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेलो.

इंदिरा गांधी यांना भेटायला वसंतरावनाईक आतमध्ये गेले आणि बी. जी. देशमुख हे बाहेर आर.के धवन यांच्यासमवेत त्यांची वाट पाहत थांबले होते. जेव्हा ते बाहेर आले तेव्हा देशमुख यांना त्यांच्याकडून कळले की त्यांना बिहारचे राज्यपालपद देऊ केले आहे. याचा अर्थ आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावरून त्यांना पायउतार होण्यास सांगितले आहे.

यावरती देशमुख यांना वसंतराव नाईकांनी विचारलं कि तुम्ही काय सल्ला देणार?

देशमुख म्हणाले की त्यांनी राज्यपाल पद स्वीकारून सध्या पंतप्रधानांना दुखवू नये. यामुळे ते काही त्यांचे राजकीय जीवन संपत नव्हते. देवीकान्त बरुवा नाही का सक्रिय राजकारणात परतले होते?

वसंतरावांनी त्यावरती सांगितले की,

“त्यांना सध्या राजकारण संन्यास घ्यायचा नसून सर्व पर्याय खुले ठेवायचा मार्ग ते पहात आहेत.”

मग ते परत आत गेले आणि थोड्या वेळात बाहेर आले. देशमुख यांना समजले की ते आता सत्ता सोडत आहेत व बिहारचे राज्यपालपद त्यांनी धुडकारले आहे. आणि अशाप्रकारे अशाप्रकारे 21 फेब्रुवारी 1975 त्यांनी आपला राजीनामा दिला.

त्यानंतरही देशमुख अधून मधून त्यांना भेटत राहिले. पण वसंतरावांच्या बोलण्यात कुठेही कडवटपणा नव्हता.

त्यांचा दृष्टिकोन हा एक तत्त्वचिंतकाचा होता. सत्येत नसतानाही त्यांनी मोठया रुबाबात आपले जीवन व्यतीत केले. 1977 च्या सुरुवातीला जेव्हा सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या तेंव्हा त्यांनी अत्यंत उत्साहात काँग्रेसच्या निवडणुक प्रचारात भाग घेतला होता. त्यानंतर इंदिरा गांधीं पुन्हा त्यांचे राजकीय सल्ले घेऊ लागल्या आणि इथेच वसंतरावांनी राजकीय बाजी जिंकल्याची ती एक खूण होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.