वसंतराव नाईक विरुद्ध जाबुवंतराव धोटे. 

वसंतराव नाईक आणि जांबुवंतराव धोटे. दोघेही विदर्भाचे. एक सत्तेत तर दूसरे विरोधात. एक स्वतंत्र महाराष्ट्राचे पुरस्कर्ते. तर दूसरे विदर्भवादी. धोटेंना विर्दर्भसिंह म्हणून ओळखले जाते. प्रचंड चिड आणि तितकाच प्रचंड विरोधक असणारा हा नेता. तर दूसरीकडे प्रचंड हूशार पण संयमाच राजकारण करणारे वसंतराव नाईक.

सिंहासन सिनेमात एक सिन आहे ज्यामध्ये बेळगाव कारवार सहित संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून जेष्ठ स्वातंत्रसैनिक उपोषणाला बसलेले असतात. मुख्यमंत्री स्वत: बाहेर येतात आणि त्यांना घरी घेवून जातात. त्यांना जेवू घालतात. हा सिन खऱ्या आयुष्यात वसंतराव नाईक आणि सेनापती बापट यांच्या दरम्यान झाला होता. इतके हूशार व्यक्तिमत्व म्हणजे वसंतराव नाईक. पण काही गोष्टी विरोधक आणि राजकारणापलीकडच्या असतात.

तेच सांगणारा हा किस्सा बोलभिडूच्या वाचकांसाठी. 

किस्सा असा कि जांबुवंतराव धोटे यांच्या मातोश्री आजारी होत्या. तेव्हा आपल्या आंदोलनामुळे जांबुवंतराव धोटे यांना सरकारने अटक केली होती. त्यांना येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. याच वेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर वसंतराव नाईक होते. 

वसंतराव नाईकांना माहिती मिळाली की धोटेंच्या मातोश्री आजारी आहेत. त्यांनी तात्काळ नागपुरच्या मेयो रुग्णालयाशी संपर्क साधला. धोटे यांच्या मातोश्रींनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 

इकडे प्रशासनाला सांगून जांबुवंतराव धोटे यांना पेरोलवर सोडण्यासंबधित हालचाली सुरू करण्यात आल्या. जांबुवंतराव धोटे यांना येरवडा कारागृहातून सोडण्यात आलं तेव्हा कारागृहाबाहेर एक गाडी उभा होती. मुख्यमंत्र्यांनी स्वखर्चाने ती गाडी धोटे यांना पुण्यातून मुंबईत सोडण्यासाठी पाठवली होती. धोटे त्या गाडीने मुंबईच्या विमानतळावर घेवून जाण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी धोटे यांच नागपूरच्या प्रवासाच तिकीट काढून ठेवलं होतं. जांबुवंतराव धोटे त्या विमानाने नागपुरला उतरले. तिथून रुग्णालयात जाण्याची सोय देखील मुख्यमंत्र्यांनीच केली होती. 

copyright@bolbhidu.com

कट्टर विरोधकाने दाखवलेलं मित्रत्त्व पाहून धोटे गहिरवरले होते. पुढे त्यांच्या मातोश्रींना भेटण्यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक मेयो रुग्णालयात आले. तेव्हा जांबुवंतराव वसंतरावांना पाहून गहिवरले. 

पण किस्सा इतक्यावरच संपत नाही. 

१९८० चा काळ होता. जांबुवंतराव धोटे यांच्या मातोश्री पुन्हा आजारी पडल्या होत्या. त्यांना पुन्हा त्याच मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जांबुवंतराव धोटे मातोश्रींची सुश्रुषा करण्यासाठी हॉस्पीटलमध्येच असायचे. काही कार्यकर्ते तेव्हा त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा धोटे रडताना त्यांना दिसले. सिंह म्हणून ओळखला जाणारा हा माणूस रडतोय म्हणल्यानंतर मातोश्रींबद्दल वाईट बातमी असल्याची शंका कार्यकर्त्यांना आली. जवळ जावून कार्यकर्त्यांनी विचारलं तेव्हा जांबुवंतराव धोटे म्हणाले, 

आई ठिक आहे पण, मागच्या वेळी आईला रुग्णालयात दाखल करणाारा गेला.

वसंतराव नाईक यांच तीव्र ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं होतं. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून धोटे लहान मुलाप्रमाणे रडत होते. 

copyright@bolbhidu.com

हे हि वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.