अखेरच्या क्षणी मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिलेले फडणवीस हे तिसरे, पहिल्या दोन वेळा…
अखेरच्या क्षणी मुख्यमंत्रीपद जावू शकतं का? हो जावू शकतं कालच पाहिलय.. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील असा अंदाज असताना अचानकपणे एकनाथ शिंदेच नाव समोर आलं. पण याहून अधिक मोठ्ठा ट्विस्ट होता देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होण्याचा.. फडणवीस मुख्यमंत्री होणार हा अंदाज होता पण अचानक वारे फिरले…
आत्ता हे झालं आत्ताच पण असे पद हुकलेले मुख्यंमंत्री महाराष्ट्रात आहेत का? आणि आहेत तर कोणते? हेच किस्से आपण पाहणार आहोत..
पहिला किस्सा आहे तो वसंतराव नाईक यांचा..
साल होतं १९६२ चं. यशवंतराव चव्हाणांना दिल्लीवरून बोलवणं आलं आणि देशाचे संरक्षणमंत्री म्हणून त्यांना जावं लागलं. पण नव्यानं निर्माण झालेल्या महाराष्ट्रापुढे प्रश्न उभा ठाकला… आत्ता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? चर्चा पसरायला वेळही नाही मिळाला आणि तात्काळ वसंतराव नाईक यांच नाव पक्कं करण्यात आलं.
वसंतराव दुसऱ्या दिवशी वर्षा बंगल्यावर पदाची शपथ घेणार होते. शपथविधीसाठी कोणता सुट घालायचा याची चर्चा चालू होती. चर्चेत जेष्ठ पत्रकार महेश भोसले देखील होते. त्यांनीच एका दिवाळी अंकात ही आठवण सांगितली आहे..
ते सांगतात वसंतराव नाईकांच्या बंगल्यावरून तोंड गोड करून मी रात्री नऊ- साडेनऊच्या सुमारास मारोतराव कन्नमवारजींच्या बंगल्यावर पोहचलो. बोलता बोलता कन्नमवार म्हणाले, मला मिळालेल्या आश्वासनाचा सर्वांनाच विसर पडला.
अगदी तुम्हाला पण..!
त्यांचा हा शब्द ऐकताच महेश भोसले यांनी तात्काळ लालबहाद्दुर शास्त्री यांना फोन लावला आणि म्हणाले “कन्नमवारजी को आपने आश्वस्त किया था की, चव्हाणजी के बाद आपको मुख्यमंत्री बनाऐंगे.” तिकडून शास्त्रीजी म्हणाले, “अच्छा हुआं आपने याद दिलाया. मैं दस मिनिट मे फोन करता हूं.” त्यानंतरच्या दहा मिनिटातच पुन्हा फोन वाजला. शास्त्रीजींनी कन्नमवारांना म्हणाले, “आप कल मुख्यमंत्रीपद की शपथ लेंगे.”
झालेलं अस की, उत्तरप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते गोविंद वल्लभ पंत यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी कन्नमवारांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. या शब्दाची आठवण कन्नमवार यांनी अगदी अखेरच्या क्षणी करून दिली आणि दिल्लीचं तेव्हाचं नेतृत्त्व देखील आपल्या शब्दाला अखेरच्या क्षणी जागलं.
वसंतराव नाईकांना देखील मनाचा मोठ्ठापणा जपतं मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडलं.. पण शपथविधीचा सुट शिवलेला असून देखील त्यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली हाच इतिहास आहे..
दुसरी घटना घडली होती ती सुधीर जोशींसोबत…
सालं होतं १९९५ चं. भाजप-सेनेच्या युतीचं सरकार स्थापन होत होतं पण यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका होती ती विक्रमी मतांनी निवडून आलेल्या अपक्ष आमदारांची. या अपक्ष आमदारांच्या बळावर सेना भाजप युती सत्तेत येणार होती.. मुख्यमंत्री सेनेचा होणार होता. बाळासाहेब आपल्या हातात रिमोट कंट्रोल ठेवणार हे नक्की असल्यानं मुख्यमंत्री कोण होणार याचीच चर्चा होती.
सुधीर जोशीं स्थानिक लोकाधिकार समितीमुळे चर्चेत होते. शिवसेनेच्या आंदोलनाला एक प्रॅक्टिकल स्वरूप देण्याचं काम सुधीर जोशींनी केलं होतं. त्यामुळे सुधीर जोशी हेच मुख्यमंत्री होतील याबाबत काहीच वाद नव्हता..
मातोश्रीच्या बाहेर गर्दी झाली होती. कोणत्याही क्षणी सुधीर जोशींचच नाव जाहीर होणार हे फिक्स होतं. बाळासाहेबांनीच या नावाला होकार दिला होता. पण अखेरच्या क्षणी बाळासाहेबांना आपल्या एका मित्राची आठवण झाली.
विधीमंडळाच्या राजकारणात मुरलेल्या आपल्या मित्राला अर्थात शरद पवारांना त्यांनी फोन लावला. सुधीर जोशींच नाव मुख्यमंत्रीपदी फिक्स केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा शरद पवार म्हणाले, आडनाव जोशीच असूद्या पण नाव बदला..!!!
कारण होतं अपक्षांच पाठबळ. अपक्षांच्या पाठबळावर सरकार चालवायचं असेल तर सरळ साधे असणारे सुधीर जोशी नाहीत तर मुरब्बी असणारे मनोहर जोशी परफेक्ट ठरणार होते. झालं अखेरच्या क्षणी नाव बदललं आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले…
हे दोन किस्से होते अखेरच्या क्षणी मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिल्याचे..
हे ही वाच भिडू