ताई तेलीणीने पेशव्यांना हाणला सोटा : किल्ले वासोट्याची कहाणी

सातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या कुशीत लपलेला एक अजिंक्य किल्ला म्हणजे वासोटा. कोयना नदीच्या खोऱ्यात निबिड जंगलात असलेला हा किल्ला इतका दुर्गम आहे की शिवकाळात याचा वापर कैद्यांना ठेवायचा तुरुंग म्हणून केला जाई.

पूर्वेला घनदाट अरण्य आणि पश्चिमेला कोकणात कोसळणारे बेलाग कडे यामुळे वासोट्याची दुर्गमता खूप वाढली आहे.

वासोटा ज्या डोंगरावर आहे तेथे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता, म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले, अशी आख्यायिका आहे. ’वसिष्ठ’चे पुढे वासोटा झाल असावेे, अशी कल्पना आहे. शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला. या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसर्‍या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो.

शिवरायांनी जावळी जिंकल्यावर आसपासचे किल्ले घेतले पण वासोटा दूर असल्यामुळे जिंकता आला नाही. पुढे पन्हाळा मोहिमेवेळी वासोटा मराठ्यांनी जिंकून घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच नाव व्याघ्रगड केलं होतं अस सांगितल जात.

राजापूरला पकडलेले इंग्रज कैदी या गडावर ठेवण्यात आले होते.

पुढे पेशवाईत हा किल्ला पंतप्रतिनिधी यांच्याकडे आला. पंतप्रतिनिधी म्हणजे सातारच्या छत्रपतींच्या दरबारातील एक नामंकित सरदार घराणे. शाहू महाराजांच्या काळात त्यांच्याकडे कारभारीपण होत. पेशवेपदावर त्यांनी हक्क सांगितला होता पण ते बाळाजी विश्वनाथ भटाकडे गेले व पुढे पिढ्यानपिढ्या त्यांच्याकडेच राहिले.

तेव्हा पासूनच पंतप्रतिनिधी व पेशवे यांच्यात अलिखित चुरस कायम चालत आलेली होती.

गोष्ट आहे साधारण १८०५ सालची. दुसरा बाजीराव पेशवेपदावर आला होता. त्याने इंग्रजांशी करार केल्यामुळे सरदारांमध्ये नाराजी होती. त्याच्या बेलगाम राज्यकारभार, चैनीखोर वृत्ती व अनेक कारणांनी जनता देखील वैतागलेली होती. सर्वत्र अराजकतेच वातावरण होतं.

अशातच औंधच्या परशुराम पंतप्रतिनिधी यांनी बंड उभारलं. 

परशुराम पंतप्रतिनिधी पराक्रमी होता. पण तो सुद्धा व्यसनी होता. कायम भांगेच्या नशेत गवई तमासगीर यांच्या संगतीत असायचा.  त्याने चाकरीला रामोशी होते. त्याच सैन्य बऱ्याचदा लोकांची लुटमार करायचं.

ताई तेलीण ही त्यांच्या दरबारातील एक स्त्री होती. परशुरामपंत तिच्या सांगण्याप्रमाणे कारभार करत होता. यावरून त्याचे त्याच्या आईशी भांडणे होत. बायकोला देखील त्याने टाकून दिले होते.

परशुराम पंतप्रतिनिधी यांचा बंदोबस्त करण्यासाठी दुसऱ्या बाजीरावाने मोठ सैन्य देऊन बापूराव गोखले यांना पाठवून दिल.

गोखल्यांनी औंधच्या छोट्याशा सैन्याचा सहज पराभव केला. पंतप्रतिनिधीला मसूर येथे कैदेत ठेवले व ते पुण्याला परत आले. पण ताई तेलीण खमकी होती. तिने आसपासच्या गावातून सैन्य उभारलं व मसूरच्या गढीवर हल्ला केला. परशुरामपंत याला सोडवल. ताई तेलीणीने परशुरामपंत याला बंडासाठी उद्युक्त केले.

“आपण छत्रपतींचे नोकर. बाजीरावाची आज्ञा आपण का मानावी? खुद्द छत्रपतींना देखील पेशवे सन्मानाने वागणूक देत नाहीत.”

ताई तेलीण धाडसी व पराक्रमी होती.

वारणा व नीरा नदीच्या दरम्यानच्या मुलखात पंतप्रतिनिधीच्या सैन्याने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली. त्याकाळी अनेक सरदार पेशव्यांच्या विरोधात जपते मात्र परशुराम पंताची प्रतिमा देखील चांगली नसल्यामुळे त्याच्या बंडात जास्त कोणी सामील झाले नाहीत.

खवळलेल्या दुसऱ्या बाजीरावाने बापू गोखले यांना पुन्हा पंतप्रतिनिधी याच्यावर चालून जाण्यास सांगितले. यावेळी पुरता निकाल लावायचा या उद्देशाने पेशव्यांचे सैन्य चालून आले.

२७ मार्च १८०६ रोजी वसंतगडाच्या खाली घनघोर लढाई झाली. पंतप्रतिनिधींचा पुन्हा पराभव झाला. 

खुद्द परशुरामपंत युद्धात जखमी झाला. त्याचा उजवा हात गोखल्यांनी तोडला. त्याला हत्तीच्या अंबारीत बांधून पुण्याला आणण्यात आले. तिथे राघोपंत गोडबोलेंच्या वाड्यात त्याला बंदी करून ठेवले गेले. त्याचा सगळा सरंजाम जप्त केला.

हात तुटलेला परशुराम पंत पुढे आयुष्यभर थोटोपंत म्हणून ओळखला गेला.

पण पेशव्याना वाटत होत तस परशुरामपंताना पकडून बंड शमल नाही. ताई तेलीण वसंतगडाच्या संग्रामात वाचली होती. तिने तिथु पळून वासोट्याला आश्रय घेतला होता. तिने नव्याने सैन्य उभारलं व वासोट्यावरून पेशव्यांना आव्हान दिल.

तिरमिरीत येऊन बापू गोखले पन्नास हजारांच सैन्य घेऊन पुण्याहून निघाले. वासोट्यावर हल्ला केला. पंतप्रतिनिधीच्या फौजेची सगळी सूत्र ताई तेलीणीकडे होती. अतिशय धाडसाने आणि कल्पकतेने तिने पेशव्यांच्या सैन्याचा सामना केला.

बापू गोखल्यांना ताई तेलीणीच्या छोट्याशा फौजेकडून पराभव पत्करावा लागला. 

अत्यंत बिकट वाट असणारा वासोटा पराक्रमी बापू गोखलेंना आठ महिने वेढा घालूनही ताब्यात येत नव्हता. काही काळाने त्याला एक कल्पना सुचली. वासोट्याच्या आसपासच्या उंच टेकड्यांवर तोफा चढवल्या व तिथून ताई तेलीणीवर मारा सुरु केला.

या तोफ गोळ्यांच्या आगीमुळे वासोट्यावरील धान्यभंडार जळून गेले व निरुपायाने ताई तेलीणीने किल्ला बापू गोखले यांच्या हवाली केला.  

पंतप्रतिनिधी यांचं बंड अखेर शमलं. परंतु एका स्त्रीने पेशव्यांच्या सैन्याचा पराभव करून त्यांचं नाक कापलं होतं. आजही या पराक्रमाच्या आठवणी कवितेच्याच्या रुपात वासोटा किल्ल्यावर सांगितल्या जातात,

“श्रीमंत पंत प्रतिनिधी यांचा अजिंक्य वासोटा;

 ताई तेलिण मारी सोटा,

बापू गोखल्या सांभाळ कासोटा.”

रियासतकार गोविंद सरदेसाई म्हणतात जर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी परशुरामपंताच्या पराक्रमाला उत्तेजन देऊन राष्ट्रीय कामाला लावले असते तर मराठी राज्य वाचवण्याच्या कामी पंताच्या शौर्याचा व धाडसाचा चांगला उपयोग करता आला असता. पण तसे घडले नाही.

संदर्भ- मराठा रियासत खंड ८

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.