वास्तवच्या चाळीवर खर्च केलेले पैसे वसूल व्हावेत म्हणून अजून एक सिनेमा बनवावा लागला.

आजही रस्त्यावर चालताना एखादी पावभाजी ची गाडी दिसली की वास्तव मधला राडा आठवतो. पावभाजीवाला संजू बाबा सारखा हाईट बॉडीने चांगला असेल तर त्याच्यासमोर वागताना जरा धडकीच भरते. रागाच्या भरात कधी पावभाजीचा तवा उचलुन डोक्यात टाकेल काय भरवसा ! अशा गाडीवर काम करणारा कोणी डेडफुट्या दिसतोय का, हे पाहण्यासाठी सुद्धा नजर आतुरलेली असते.

रघुभाईला पाहून गळ्यात छोटीशी सोन्याची चैन घातली तरी, ‘पचास तोला, पचास तोला’ असं म्हणत मिरवायची ईच्छा असायची. अतिशयोक्ती होण्याआधी थांबलेलं बरं..

हे सर्व सांगण्याचं कारण ‘वास्तव’ सिनेमाशी संबंधित एक वेगळा किस्सा..

मराठीचा झेंडा हिंदीमध्ये यशस्वीरीत्या रोवणारे दिग्दर्शक, अभिनेते म्हणजे महेश मांजरेकर. महेश मांजरेकरांनी हिंदीत आजवर जे काम केलं आहे, ते उल्लेखनीय आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी हिंदीत ‘वास्तव’ सिनेमा केला. मांजरेकरांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी हिंदीत दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सर्वोत्तम मानला जातो. या सिनेमाने बॉक्स ऑफिस वर व्यावसायिक यश सुद्धा मिळवलं.

‘वास्तव’ मुळे संजू बाबाच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वास्तव रिलीज व्हायच्या आधी संजू बाबा जेलची हवा खाऊन आला होता. आणि यानंतर पुन्हा संजू बाबाने जे सिनेमे केले‌ त्या सिनेमांना अपेक्षित यश मिळत नव्हतं. संजूच्या अपयशाची गाडी महेश मांजरेकरांनी ‘वास्तव’ च्या रूपातून रुळावर आणली.

इतकंच नव्हे तर वास्तव मुळे संजय दत्तला त्याच्या अभिनय कारकिर्दीत सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पहिल्यांदा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

महेश मांजरेकर यांचं कौतुक अशासाठी की त्यांनी वास्तव मध्ये जास्तीत जास्त मराठी कलाकार घेतले. मुख्य कलाकार वगळता तुम्ही सिनेमा नीट पाहिला असेल तर काही प्रसंगात तुम्हाला भरत जाधव, मकरंद अनासपुरे या कलाकारांची झलक बघायला मिळते. तेव्हा हे कलाकार अतिशय नवखे होते. परंतु तरीही महेश मांजरेकर यांनी या कलाकारांना हिंदी सिनेमात काम करण्याची संधी दिली. इतर भूमिकांमध्ये रीमा लागू, शिवाजी साटम आणि डेडफुट्याच्या भूमिकेत संजय नार्वेकर अशी या सिनेमाची जबरदस्त कास्टिंग होती.

सर्व मराठी कलाकार मराठी रंगभूमीशी जोडले असल्याने या प्रत्येकाचा ‘वास्तव’ मधला अभिनय आणखी सुंदर झाला.

या सिनेमाशी सबंधित अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील. आज तुम्हाला एक वेगळाच किस्सा सांगणार आहोत, जो तुम्हाला शक्यतो माहीत नसावा.

झालं असं की.. ‘वास्तव’ची पार्श्वभूमी चाळीत राहणारं मराठमोळं कुटुंब अशी होती. त्यामुळे कथेच्या गरजेनुसार महेश मांजरेकर यांना चाळ हवी होती. ते मुंबईत अनेक ठिकाणी फिरले पण मनासारखी चाळ त्यांना सापडली नाही. अखेर त्यांनी शोधमोहीम थांबवून मुंबईच्या कमालिस्तान स्टुडिओ मध्ये खूप पैसे खर्च करून चाळीचा भव्यदिव्य सेट उभा केला.

चाळीत जे सिन शूट होणार होते ते सिन शूट झाले. काम झाल्यावर चाळीचा सेट तोडण्याची तयारी सुरू झाली. सेट तोडताना महेश मांजरेकर यांना फार वाईट वाटलं. इतकी मेहनत करून बनवलेला हा सेट नाहीसा होणार याचं त्यांना दुःख झालं. त्यामुळे त्यांनी सेट तोडायला मनाई केली.

इतका मोठ्या सेटचा हवा तसा उपयोग झाला नाही, याची त्यांना खंत होती. म्हणून त्यांनी सेट तोडणाऱ्या माणसांना ‘मला काही दिवसाचा वेळ द्या. तोवर हा सेट तोडू नका’, असं सांगितलं. सेटचा वापर कसा करता येईल, याचा त्यांनी विचार केला. वास्तव चं चाळीतलं शूटींग तर झालं होतं.

विचार करत असतानाच महेश मांजरेकरांच्या डोक्यात याच सेटवर नवा सिनेमा बनवण्याची कल्पना सुचली.

१९९९ साली ‘वास्तव’ प्रदर्शित झाला. आणि लगेच त्यांनी एक नवा सिनेमा लिहायला घेतला. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनी संजय झा यांच्यावर सोपवली. सुश्मिता सेन, रविना टंडन, नम्रता शिरोडकर, सयाजी शिंदे, सचिन खेडेकर अशा कलाकरांची सिनेमासाठी निवड झाली. स्वतः महेश मांजरेकरांनी सिनेमात काम केले.

आणि वास्तव च्या सेटवर बनवला गेलेला सिनेमा म्हणजे ‘प्राण जाये पर शान ना जाये’. हा सिनेमा २००३ साली प्रदर्शित झाला.

खरंच जेव्हा एखादा सिनेमा घडत असतो, तेव्हा सिनेमासाठी अगदी छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा खूप महत्त्वाच्या असतात. सिनेमा बनवून पूर्ण होतो तेव्हा मेहनतीने घडवलेल्या अनेक गोष्टी नष्ट कराव्या लागतात. वास्तव साठी बनवलेला इतका मोठा सेट जेव्हा तोडायला सुरुवात झाली असेल, तेव्हा मांजरेकरांना निश्चित वाईट वाटलं असेल. परंतु याच सेटचा योग्य उपयोग त्यांनी पुढच्या सिनेमात केला. यावरून मांजरेकरांच्या व्यवहारीपणाच कौतुक करावं तितकं कमीच.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.