आणि बंद पडत असलेलं वस्त्रहरण नाटक हाऊसफुलचा बोर्ड घेऊन पुन्हा नव्याने उभं राहिलं
मालवणी भाषेला सातासमुद्रापार घेऊन जाण्याचं श्रेय एका माणसाला द्यावं लागेल. तो माणूस म्हणजे मच्छिंद्र कांबळी. यांचं नाव घेताच, समस्त नाट्य प्रेमी रसिकांच्या मनात ‘वस्त्रहरण’ नाटक आलं असेल. हे नाटक आजही जरी लोकप्रिय असलं तरीही एक क्षण असा होता की लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने वस्त्रहरण बंद होणार होतं.
या नाटकाच्या निर्मितीमागची प्रक्रिया कशी होती, ते आजच्या लेखात जाणून घेऊ…
गंगाराम गवाणकर वस्त्रहरण नाटकाचे लेखक. १९६२ साली ते जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये शिकत होते.
तेव्हा आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये जे.जे. ची नाटकं विशेष गाजत होती. ‘कॉलेजच्या चांगल्या कलाकारांमध्ये अभिनय करण्याची संधी मिळेल कोणास ठाऊक ? त्यापेक्षा एखादी नाटुकली लिहावी’, असा विचार गंगाराम गवाणकर यांच्या मनात आला. कोकण – मालवण भागात जत्रेच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने होणारे दशावतार त्यांनी पाहिले होते.
याचाच आधार घेऊन गवाणकरांनी ‘आज काय नाटक होवचा नाय’ ही एकांकिका लिहून काढली.
या एकांकिकेत त्यांनी शिवाजी महाराज, तान्हाजी, बाजीप्रभू देशपांडे या ऐतिहासिक पुरुषांचे विडंबन केले. एकांकिका सर्वांना आवडली. परंतु ‘ऐतिहासिक पात्रांची अशी मस्करी प्रेक्षक सहन करणार नाहीत, त्यामुळे दुसरं कथानक निवडून त्यावर लिही’, असा सल्ला त्यांच्या शिक्षकांनी दिला. हे मत विचारात घेऊन त्यांनी दुसऱ्या कथानकासाठी महाभारताचा आधार घेतला.
महाभारतातील वस्त्रहरण प्रसंगावर त्यांनी एकांकिका लिहिली.
त्यावेळी ख्यातनाम नाट्य दिग्दर्शक दामू केंकरे हे गवाणकरांचे वर्गशिक्षक. आपल्या विद्यार्थ्याने लिहिलेली एकांकिका केंकरे यांनी वाचायला घेतली. त्यांना ही एकांकिका प्रचंड आवडली. काही दिवसांनी गवाणकर केंकरे सरांना भेटायला गेले असता एकांकीकेची प्रत हरवली होती. खूप शोधूनही सापडली नाही. त्यावेळी झेरॉक्सची सोय नव्हती.
मग काय! गवाणकरांनी आठवून आठवून पुन्हा हे सर्व नाटक लिहून काढलं.
‘आज काय नाटक होवचा नाय’ हे काहीसं नकारात्मक नाव त्यांनी बदलून ‘वस्त्रहरण’ हे नाव ठेवलं.
६ नोव्हेंबर १९७५ ला रवींद्र नाट्यमंदिरात वस्त्रहरण चे लागोपाठ दोन प्रयोग झाले. समोरून प्रेक्षक हसत होते. परंतु काहीतरी चुकत होतं आणि प्रयोग हळूहळू खाली पडत होता. वस्त्रहरण मध्ये नाटकातलं नाटक आणि पौराणिक पात्रांचं विडंबन हा प्रकार प्रेक्षकांच्या लक्षात येत नव्हता. त्यामुळे हळूहळू प्रेक्षकांकडून दाद येईनाशी झाली.
पुढे १९७७ – ७८ साली आंतर गिरणी नाट्यस्पर्धेत आणि कामगार कल्याण नाट्यस्पर्धेत वस्त्रहरण ला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेदरम्यान मच्छिंद्र कांबळी यांची गंगाराम गवाणकर यांच्याशी ओळख झाली.
या नाटकाचं व्यावसायिक रंगभूमीवर रूपांतर व्हावं अशी मच्छिंद्र कांबळी यांना खूप इच्छा होती.
हे दोघं ज्या निर्मात्यांना भेटायचे तेव्हा त्यांच्याकडून “कसला हा मालवणी रोंबाट” अशी कुजकी भाषा ऐकायला मिळायची. दरम्यान दूरदर्शन वर वस्त्रहरण नाटक दाखवण्यात आलं. चित्रपती व्ही. शांताराम आणि पु.ल.देशपांडे यांनी हे नाटक पाहिलं. असं असलं तरीही हे नाटक रंगभूमीवर आणायला कोणताही निर्माता तयार होत नव्हता.
सतत निर्मात्यांनी दिलेल्या नकारामुळे मच्छिंद्र कांबळी यांना प्रचंड वैताग आला होता. अखेर त्यांनी नाटकातली तात्या सरपंचाची भूमिका स्वतः करायची ठरवली. ज्या मातीचा आधार घेऊन हे नाटक निर्माण झालं होतं अशा कोकणात वस्त्रहरण नाटक कांबळी घेऊन गेले. परंतु कोकणी माणसांनी ‘दशावताराची टिंगल करत आहात’, असा गैरसमज करून वस्त्रहरण कडे सपशेल पाठ फिरवली.
इतका मोठा दौरा करून अपयश पदरी आलं तरीही मच्छिंद्र कांबळी खचले नाहीत.
राजा नाईक आणि मधू कडू यांच्या आग्रहाने राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सेक्रेटरी मनोहर नरे यांनी वस्त्रहरण पाहिले. मनोहर नरे सुद्धा कोकणातले. त्यामुळे त्यांना वस्त्रहरण आवडलं होतं. मोठ्या मुश्किलीने मनोहर नरे यांना नाटकाची निर्मिती करण्यासाठी पटवण्यात आले.
त्यांनी नाटकाच्या तालमी पहिल्या आणि स्वखुशीने नाटकाची निर्मिती करण्यासाठी त्यांनी पहिल्या १२ प्रयोगांसाठी आगाऊ रक्कम गवाणकरांच्या हातावर ठेवली. सर्व कलाकार खुश झाले. मच्छिंद्र कांबळी यांनी रिहर्सल करण्यासाठी जास्त जोर दिला.
१६ फेब्रुवारी १९८० रोजी वस्त्रहरण नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग दुपारी ४.३० वाजता शिवाजी मंदिर येथे आयोजित करण्यात आला.
मामा पेडणेकर नाटकाचे व्यवस्थापक होते. नाटकाचा प्रयोग अगदी दोन दिवसांवर आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की १६ तारखेला ग्रहांची दशा ठीक नाही. अशुभ मुहूर्त आहे. त्यामुळे त्यांनी नाटक १६ ऐवजी १५ तारखेला करण्याची तयारी सुरू केली. कोणाला काही अडचण नव्हती. पण मच्छिंद्र कांबळी निराश झाले. कारण १५ तारखेला त्यांचा पुण्यात एका वेगळ्या नाटकाचा प्रयोग होता.
मामा पेडणेकर निर्णयावर ठाम होते.
तेव्हा शुभारंभाच्या प्रयोगाला गवाणकरांनी तात्या सरपंच साकारावा असं सर्वानुमते ठरवण्यात आलं. अचानक अभिनय करण्याची वेळ आल्याने गवाणकर धास्तावले होते. १५ तारखेला रात्री ८.३० वाजता तिसरी घंटा झाली आणि वस्त्रहरण नाटकावरचा पडदा बाजूला झाला. प्रयोग झाल्यानंतर दिग्गज कलाकार सतीश दुभाषी यांनी सर्वांना शाबासकी दिली.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ फेब्रुवारीला मच्छिंद्र कांबळी यांनी नाटकात तात्या सरपंच रंगवला. नाटकाच्या इतिहासात असं पहिल्यांदा झालं असावं की शुभारंभाच्या प्रयोगाला मुख्य कलाकार हजर नाही.
मान्यवर मंडळी जरी कौतुक करत असले तरी प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद कमी होता. संस्था ६० हजारांच्या तोट्यात गेली होती. निर्माते मनोहर नरे यांनी नाटक बंद करण्याचा निर्णय घेतला. निर्मात्याचं इतकं नुकसान झाल्यावर त्यापुढे कोण काय बोलणार ! नाटक चांगल्या ठिकाणी बंद करू या हेतूने मामा पेडणेकरांनी पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात शेवटचा प्रयोग लावला.
हे ऐकताच मच्छिंद्र कांबळींनी कपाळावर हात मारला.
“शिरा पडांदे त्या कर्मावर. टिळक स्मारक मंदिरातील प्रेक्षकांना हसवचा म्हणजे मोठा धर्मसंकट.”
रात्री प्रयोग होता. प्रयोग सुरू व्हायला फार थोडा वेळ बाकी असल्यावर कळालं की पहिल्या रांगेत पु.ल.देशपांडे, सुनिताताई, वसंतराव देशपांडे अशी दिग्गज मंडळी बसली होती.
सर्वांना दडपण आलं होतं. प्रयोग उत्तरोत्तर रंगत होता. नाटक संपल्यावर पु.ल.देशपांडेंनी विंगेत येऊन गवाणकरांचं खूप कौतुक केलं. आणि चार दिवसांनी १९ ऑगस्ट रोजी पु.ल.देशपांडे यांनी गवाणकरांना पत्र पाठवलं. हे पत्र वस्त्रहरण च्या संपूर्ण टीमसाठी एक कलाटणी देणारं पत्र होतं. या पत्रातील दोन ओळी नाटकाच्या जाहिरातीत छापून आल्या.
आणि बंद पडत असलेलं वस्त्रहरण नाटक हाऊसफुलचा बोर्ड घेऊन पुन्हा नव्याने उभं राहिलं.
पुढे ६०० प्रयोग झाल्यावर मच्छिंद्र कांबळी कांबळी यांनी स्वतःची भद्रकाली संस्था स्थापन केली. कालांतराने त्यांनी भद्रकाली तर्फे वस्त्रहरण चे प्रयोग सादर करण्यास सुरुवात केली. हे नाटक आणि मालवणी भाषा लंडनला घेऊन जाण्याचा त्यांचा विचार होता. लंडनला जायच्या आधी वस्त्रहरण नाटकाचा एक विशेष प्रयोग सादर करण्यात आला.
डॉ काशिनाथ घाणेकर, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, नाना पाटेकर, विजू खोटे यांसारख्या महान कलाकारांच्या अभिनयाने हा प्रयोग सजला. लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या प्रयोगाला हजर होतं.
हा प्रयोग झाल्यावर वस्त्रहरण लंडनला गेलं. लंडनमध्ये मालवणी भाषेतील वस्त्रहरण नाटकाने तिथल्या प्रेक्षकांची मनं जिंकली.
लंडनवारी गाजवून नाटकाचे पुन्हा जोरदार प्रयोग सुरू झाले. मच्छिंद्र कांबळी यांच्या डोक्यात ५००० वा प्रयोग मुंबईत शिवाजी पार्कच्या मैदानावर भव्यदिव्य सादर व्हावा, आणि या प्रयोगात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने भूमिका कराव्या ही अचाट कल्पना होती. परंतु ४८०० प्रयोग झाल्यावर मच्छिंद्र कांबळी यांनी सर्वांमधून अचानक एक्झिट घेतली.
बाबांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांचा मुलगा प्रसाद कांबळीने पूर्ण केलं. ५००० वा प्रयोग मुंबईच्या षण्मुखानंद नाट्यगृहात संपन्न झाला.
या प्रयोगात संतोष मयेकर, प्रशांत दामले, भरत जाधव, संजय नार्वेकर, मकरंद अनासपुरे, जयवंत वाडकर, सिद्धार्थ जाधव या कलाकारांनी काम केले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांनी नाटकात काम केले नाही, परंतु सर्व राजकारणी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे, राज ठाकरे हे सर्व राजकीय नेते उपस्थित होते.
गेली ४० वर्ष वस्त्रहरण नाटक रंगभूमीवर सुरू आहे.
तर अशी होती वस्त्रहरण मागच्या निर्मितीची कहाणी. पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेल्या पत्रामुळे नाटक पुन्हा नव्याने उभारी घेऊ शकलं. नाटककार गंगाराम गवाणकर यांनी स्वतः लिहिलेल्या या कलाकृतीवर जीवापाड प्रेम केले. आणि शेवटी मच्छिंद्र कांबळी यांनी जिद्दीने आणि चिकाटीने अव्याहतपणे नाटकाचे प्रयोग सुरू ठेवले. आज मालवणी भाषेत जी नाटकं रंगभूमीवर प्रेक्षकांचं प्रेम मिळवतात, त्यामागे मच्छिंद्र कांबळी यांचं महत्वपूर्ण योगदान आहे.
हे ही वाच भिडू.
- नाटक कंपनीत भांडी घासणाऱ्या या माणसाने पुढे अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवली
- पत्रकार म्हणाला हे काहीतरी भयंकर नाटक आहे, नाटकातली महिला स्टेजवर साडी बदलते वैगरे
- अन् कानेटकरांना नाटकासाठी नाव सुचलं, रायगडाला जेव्हा जाग येते
- ५० वर्षांपूर्वी गणपती मंडळात प्रदर्शित झालेलं हे नाटक सीडीमुळे भावी पन्नास पिढ्यानांही हसवत राहील..