वास्तवचा फ्रॅक्चर बंड्या खरं तर इंडियन नेव्ही सोडून हिरो बनायला आला होता…
बॉलिवूड आणि मुंबई हे दोन महाजाल आहेत, यात अनेक वर्षांपासून लोकं स्ट्रगल करतात, काम मिळवून मुंबईत स्थिरावण्याचा प्रयत्न करतात. अशी अनेक उदाहरणं आहेत जी बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतात. पण आजचा किस्सा आहे जॅक गॉडचा. हे नाव आपल्याला माहिती असण्याची सुतरामही शक्यता नाही कारण नावापेक्षा जॅक गॉड यांचा चेहरा लोकांच्या खास लक्षात आहे.
वास्तवचा फ्रॅक्चर बंड्या असो किंवा करण अर्जुनमधला समशेर सिंह यावरून जॅक गॉड यांची बॉलिवूडमधली ओळख स्पष्ट होते.
८० च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि ९० च्या दशकात खुंखार व्हिलन म्हणून जॅक गॉड यांचा उल्लेख व्हायचा. धिप्पाड शरीर आणि मजबूत अंगकाठी असलेले जॅक गॉड सिनेमात आले होते हिरो बनायला मात्र त्यांची व्हिलनची प्रतिमा इतकी गाजली कि हिरो म्हणून परत सिनेमाचं ऑफर झाला नाही.
१९५८ साली जॅक गॉड यांचा जन्म राजस्थानमधल्या शिमला गावी झाला. लहानपणापासूनच जॅकला सिनेमा बघण्याची प्रचंड आवड होती, सिनेमाच्या आवडीमुळे त्यांनाही आपण सिनेमात हिरो व्हावं वाटायचं. पण घरात सगळं शैक्षणिक वातावरण होतं, आणि नातेवाईक मंडळी इंडियन नेव्हीमध्ये होती त्यामुळे नाईलाजाने जॅक गॉड यांना इंडियन नेव्हीमध्ये भरती व्हावं लागलं.
चांगला अभ्यास करून आणि सिनेमाचं वेड बाजूला ठेवून १९७७ साली इंडियन नेव्हीमध्ये जॅक गॉड यांना नोकरी लागली. इंडियन नेव्ही जॉईन केली खरी पण मनात सिनेमाचं वेड काही शांत बसत नव्हतं.
शेवटी ८० च्या दशकाच्या सुरवातीलाच जॅक गॉड यांनी इंडियन नेव्हीचा राजीनामा अधिकाऱ्याला सुपूर्द केला आणि मुंबईत हिरो बनण्यासाठी ते आले.
चांगली बॉडी असल्याने सिनेमात त्यांची सहज कास्टिंग व्हायची शक्यता जास्त होती. कारण कुठलाही फिल्ममेकर त्यांच्यावर लगेच इम्प्रेस व्हायचा. १९८४ साली इंसाफ कौन करेगा नावाच्या सिनेमामध्ये जॅक गॉड यांना काम मिळालं. याच सिनेमात धर्मेंद्र आणि रजनीकांत लीड हिरो होते. या सिनेमात प्राण यांच्या गुंडांच्या टोळीत जॅक गॉड यांना काम मिळालं.
१९८५ साली रामसे बंधूंच्या सामरी या सिनेमात जॅक गॉड यांना काम मिळालं. या सिनेमात त्यांना बरीच वाहवा मिळाली. या सिनेमात जॅक गॉड यांच्या लूकची बरीच चर्चा झाली आणि रामसे बंधूना जॅक गॉड यांच्या अभिनयाची क्षमता सुद्धा कळाली. पण हिरोचा रोल काय जॅक गॉड यांना मिळत नव्हता. बारीकसारीक व्हीलनचे रोल केल्याने त्यांची टाईप कास्ट रोल करतो अशी ओळख झाली होती.
१९९२ पर्यंत २२ सिनेमांमध्ये व्हिलनच काम जॅक गॉड यांनी केलं होतं आणि त्यांचं हिरो बनण्याचं स्वप्न धुळीस मिळालं होतं पण १९९२ साली दिग्दर्शक सुनील कुमार हे जंगल का बेटा नावाचा सिनेमा करत होते आणि त्यासाठी टारझन टाईप हिरोची गरज होती. सुनील कुमार यांना जॅक गॉड यांच्यामध्ये या सिनेमाचा हिरो दिसला. शेवटी जॅक गॉड यांचं हिरोच स्वप्न या सिनेमामुळे पूर्ण झालं. हा ऍज ए हिरो म्हणून जॅक गॉड यांचा शेवटचा सिनेमा ठरला.
जॅक गॉड यांनी पुढे बऱ्याच सिनेमांमधी खलनायकी भूमिका साकारल्या त्यापैकी काही विशेष सिनेमे होते तेज़ाब, तूफान, शहज़ादे, क्रोध, बंद दरवाज़ा, धरम संकट, तहलका, प्रतिकार, अपराधी, फूल और अंगार, युगांधर, सुहाग, हम दोनों, वीरगति, साजन चले ससुराल, कोयला, मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी, चांडाल, लाल बादशाह, कारतूस, गंगा की कसम, जुड़वा, वास्तव, सुल्तान, और जस्टिस चौधरी.
जॅक गॉड यांच्या कारकिर्दीतला दोन व्हिलन लोकांच्या कायमचे लक्षात राहिले ते म्हणजे वास्तवमधला फ्रॅक्चर बंड्या आणि करण अर्जुनमधील समशेर सिंह. बराच काळ बॉलिवूडमध्ये त्यांच्या अभिनयाची चर्चा होत राहिली. पण
८ जून २००० रोजी अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने जॅक गॉड यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलीवूडला आणि सिनेमा प्रेमींना मोठा धक्का बसला होता.
जॅक गॉड यांच्या करिअरमध्ये नेव्ही ऑफिसर ते फ्रॅक्चर बंड्या हा प्रवास कायमचा लक्षात राहणारा आहे.
हे हि वाच भिडू :
- वास्तवचा तो सिन ज्याने बॉलीवूडला दुसरी मदर इंडिया दिली.
- रजनीकांत जसा कंडक्टर पासून सुपरस्टार झाला तसेच मोहन जोशी ट्रक-ड्रायव्हर पासून स्टार झाले
- तेरा वर्षाची असताना श्रीदेवीला सुपरस्टार रजनीकांतच्या आईचा रोल करायला लागला होता.
- क्युट चॉकलेट बॉय शाहीद कपूर ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक करणार म्हटल्यावर अनेकांनी खुळ्यात काढलेलं.