अण्णा भाऊंच्या आणि वाटेगावच्या जंगले गुरुजींच्या मैत्रीची गोष्ट!
दीनदुबळ्या समाजातील लढणाऱ्या माणसांना आपल्या साहित्यात स्थान देणाऱ्या आणि त्यांना नायकत्व बहाल करणाऱ्या लोकसाहित्यिक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांचे वाटेगाव (ता. वाळवा) हे जन्मगाव! या गावात अण्णा भाऊंचे जवळचे मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही मोजक्या माणसांपैकी एक होते ते म्हणजे भूपाल जंगले गुरूजी!
१९६३ साली जेव्हा अण्णाभाऊंच्या लोकप्रिय ‘फकिरा’ कादंबरीवर चित्रपट निघाला, तेव्हा अण्णाभाऊंनी आपल्या या लाडक्या मित्राला ‘फकिरा’च्या प्रिमियर शोसाठी मुंबईला येण्याचा आग्रह करणारे पत्र लिहिले होते. मुख्य म्हणजे त्याकाळी वाटेगावातून ‘फकिरा’च्या प्रिमियर शोला उपस्थित राहणारे अण्णा भाऊंच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त जंगले गुरुजी एकमेव होते.
वाटेगाव येथे जैन समाजात जन्माला आलेले भूपाल जंगले यांची अण्णा भाऊंशी लहानपणापासून मैत्री. जेव्हा जेव्हा अण्णा भाऊ वाटेगावला यायचे तेव्हा ते विविध विषयांवर जंगले गुरुजींशी तासन्तास गप्पा मारायचे. किंबहुना अण्णा भाऊंच्या साहित्याचे ते पहिले वाचक असायचे. अण्णा भाऊंना स्फुरलेल्या अनेक कथांचे ते पहिले श्रोते होते.
समाजात आजसुद्धा जातीय उतरडींचे मनोरे अबाधित असताना, त्या काळात जैन समाजातील जंगले गुरुजींनी अण्णा भाऊंसमवेत जपलेले मैत्र हे शेवटपर्यंत टिकले. कारण माणूस, माणूसकी आणि मानवतावाद हीच शिकवण त्यांनी अखंडपणे जपली होती.
स्वातंत्रसैनिक असणाऱ्या जंगले गुरुजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. किंबहुना स्वातंत्र्यानंतरही स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते आग्रही राहिलेले होते.
अण्णाभाऊंशी असलेल्या या मैत्रीची साक्ष देणारे एक पत्र जंगले कुटुंबीयांच्या संग्रही आहे. सन १९६३ साली अण्णा भाऊंच्या गाजलेल्या फकिरा कादंबरीवर अण्णा भाऊंचेच सहकारी शाहीर द. ना. गव्हाणकर यांनी चित्रपट निर्मिती केली. या चित्रपटाच्या संकलनाचे काम सुरू झाल्यावर, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी म्हणजेच ४ मार्च १९६३ साली अण्णाभाऊंनी त्यांचे मित्र जंगले गुरुजींना एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी स्वत:ची ख्यालीखुशाली कळविली. तसेच जंगले गुरुजींच्या घरच्यांना नमस्कार सांगून, फकिराचे संकलन सुरू असल्याचे सांगितले.
तसेच ‘प्रिमियरची तार मिळताच यावे’, असा आग्रहही केला होता.
पुढे तार आल्यानंतर जंगले गुरुजी ‘फकिरा’च्या प्रिमियर शोला मुंबईत उपस्थित राहिले होते, अशी माहिती जंगले गुरूजींचे नातू रसिक जंगले यांनी दिली. मुख्य म्हणजे त्याकाळी वाटेगावातून ‘फकिरा’च्या प्रिमियर शोला उपस्थित राहणारे अण्णा भाऊंच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त जंगले गुरुजी एकमेव होते.
पुढे ‘फकिरा’ ही कादंबरी शिवाजी विद्यापीठात अभ्यासक्रमात लावण्यासाठी जंगले गुरुजींनी विशेष परिश्रम घेतले.
जंगले गुरुजी म्हणजे अण्णा भाऊंविषयीचे चालते बोलते विद्यापीठच होते. अण्णा भाऊंच्या निधनानंतर त्यांच्या विचार तत्वज्ञानाच्या प्रचार-प्रसारासाठी त्यांनी हजारो व्याख्याने दिली. २६ फेब्रुवारी २०१३ साली जंगले गुरुजींचे वार्धक्याने निधन झाले. पण आजही अण्णा भाऊंनी गुरुजींना पाठविलेल्या त्या पत्रामुळे त्यांचे मैत्र आजही तितकेच ताजेतवाणे वाटते.
- अतुल मुळीक, वाटेगाव