दुधक्रांतीमुळं नष्ट झालेल्या गायी आज ‘वेचूर अम्मा’मुळं आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतायेत
दूध उप्तादन करणाऱ्या देशात आपला भारत अख्ख्या जगात टॉपला आहे. म्हणजे २०२० च्या एका रिपोर्टनुसार तर एकट्या भारतातून १९८ मिलियन मेट्रिक टन एवढं दूध उत्पादन करण्यात आलं होत. आता भारत दूध उत्पादनात आघाडीवर येण्यामागचं कारण आपल्या सगळ्यांनाच माहितेय, ते म्हणजे १९७० ची दूध क्रांती. वर्गीस कुरीयन यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या या क्रांतीमुळे देशात दुधाच्या उत्पादनाला मोठी चालना मिळाली.
पण दूध क्रांतीच्या लाटेमुळे अनेक गायीचं क्रॉस ब्रीडिंग झालं आणि त्यामुळे अनेक गायींचे वंश नष्ट होण्याच्या मार्गावर आले. त्यातलाच गायींचा एक वंश म्हणजे वेचूर.
वेचूर हा गायींचा वंश मूळचा भारतातलाचं, जो केरळमध्येचं पाहायला मिळतो. असं म्हणतात केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातल्या वेचूर या गावात त्यांचा वंश सुरु झाला म्हणूनच त्यांना वेचूर असं म्हंटलं जात. या वंशाच्या गायी जगातल्या सगळ्यात बुटक्या असतात म्हणे, गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तशी नोंद सुद्धा आहे.
पण या गायीचं वैशिष्ट्य म्हणजे या गायी बाकीच्या गायींपेक्षा जास्त म्हणजे दिवसाला ३ लिटर दूध देतात आणि त्यांच्या दुधाचे अनेक आयुर्वेदिक फायदे सुद्धा आहेत. महत्वाचं म्हणजे या गायींच्या चाऱ्या-पाण्यासाठी येणारा खर्च सुद्धा बाकींच्यांपेक्षा कमी आहे. त्यांना दुभत्या गायी सुद्धा म्हणतात जातं.
पण जसं कि आधीच सांगितलं १९७० सालच्या दुष्ट क्रांतीसाठी पशुपालन धोरणात अनेक बदल करण्यात आले. यानंतर आपल्या भारतीय वंशाच्या गायींसोबत विदेशी जातीच्या गाईचं क्रॉस ब्रीडिंग करण्यात आलं. ज्यामुळे या वेचूर गायीचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर आला होता. हीच गोष्ट लक्षात ठेवून सोसम्मा इयपे यांनी या वेचूर गायीचं संवर्धन करायला सुरुवात केली.
सोसम्मा इयपे पेशानं पशु वैद्यकीय डॉक्टर आहेत. त्रिशूरच्या कॉलेज ऑफ व्हॅटर्निटी अँड ॲनिमल सायंन्सच्या त्या रिटायर्ड प्रोफेसर आहेत. क्रॉस ब्रीडींगमुळं या वेचूर गायींचा वंश नष्ट होत चाललंय हे समजल्यावर त्यांनी या गायींच्या संवर्धनासाठी पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली.
१९८९ सालापासून त्यांनी या वेचूर गायींचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नव्हत्या, एक ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचं, त्याचं वंशाच्या गायी शोधणं, शेतकऱ्यांशी बोलणं, या सगळ्या गोष्टी करताना त्यांना घरातूनचं विरोध होत होता.
पण सोसम्मा या शांत बसणाऱ्यातल्या नव्हत्या, बरेच वर्ष तर त्यांनी एकटीने हे काम केलं. मग नंतर आपल्या कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांना सोबत घेऊन त्यांनी सगळ्या राज्यांमध्ये या गायींचा शोध घ्यायला सुरुवात केली.
कोट्टायम आणि अलाप्पुझा या जिल्ह्याकडून हा शोध सुरु झाला. सोसम्मा आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्येक गाव फिरत होत्या. सूर्य उगवला कि शोध सुरु व्हायचा, तो पार मावळत नाही तोपर्यंत सुरूच असायचा. कित्येक गाव फिरल्या नंतर त्यांना पहिली गाय मिळाली होती. जी मनोहर नावाच्या एका शेतकऱ्याकडं होती. सोसम्मा यांनी त्या शेतकऱ्याला आपल्या कामाबद्दल सांगितलं, पण कितीही केलं तरी तो शेतकरी होता आपली गाय सहजासहजी द्यायला तयार नव्हता. शेवटी खूप समजवल्यानंतर तो शेतकरी गाय द्यायला तयार झाला.
विद्यापीठाकडून सोसम्मा यांना या कामासाठी त्यावेळी ६५ हजार रुपयांचा फंड देण्यात आला होता. जो गाय विकत घ्यायला आणि त्यांच्या देखभालीसाठी होता. याच प्रयत्नात हळू हळू गायी सापडत गेल्या आणि पहिल्याच वर्षात त्यांना २४ गायी सापडल्या. या सगळ्या गायींना मन्नूथीच्या कृषी विद्यापीठात ठेवण्यात आलं आणि तिचं त्यांची देखभाल करायला सुरुवात केली गेली.
सोसम्मा आणि त्यांच्या पूर्ण टीमचं पाहिलं टार्गेट होत कि, या वेचूर गायीचं संवर्धन करणं, जेणेकरून त्यांची कमी होत चालली संख्या वाढवता येईल. पण कामाला सुरुवात होत नाही तोवर वर्षभरानंतर काही गायींचा शेतात विष खाल्ल्यामुळं अचानक मृत्यू झाला. या घटनेमुळे सोसम्मा आणि त्यांचा टीमचा मोठा धक्का बसला.
पण त्यांच्या विरोधात असणाऱ्यांना मात्र ही एकप्रकारची संधी मिळाली होती. अनेकांनी तर सोसम्मा यांच्या कामावरचं बोट ठेवलं. या प्रकरणाची चौकशी सुद्धा केली गेली, पण शेतात विष कुठून आलं याचा तपास काही लागला नाही.
हे प्रकरण होत नाही तर पुढचं समोर उभचं होत. १९९८ साली एका पर्यावरणवादीनं दावा केला होता कि, वेचूर वंशाच्या डीएनएला स्कॉटलंडच्या रोसलीन इन्स्टिट्यूटकडून पेटंट घेतलं गेलंय. या दाव्यामुळे मोठा गोंधळ झालेला. या प्रकरणामुळे सोसम्मा यांच्या कार्याला सुद्धा मोठा विरोध व्हायला लागला. जवळपास २ वर्ष हा वादविवाद सुरूच होता, मात्र त्यांनतर तो दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं.
त्यानंतर, भारतीय कृषी संशोधन परिषदेने (ICR) वेचूर गायींना भारतीय वंशाच्या गायी म्हणून मान्यता दिली. या प्रकारांनंतर सोसम्मा यांनी शेतकरी आपले सहकारी आणि सामान्य लोकांना घेऊन १९९८ मध्ये ‘वेचूर संरक्षण ट्रस्ट’ या संस्थेची स्थापना केली. ज्यामुळे वेचूर गायीच्या संरक्षणात मोठी मदत झाली.
सोसम्मा आजही या गायींच्या संवर्धनासाठी काम करतायेत. त्यांच्यासोबत आज कित्येक लोक जोडले गेलेत. सोसम्मा यांनी एका मुलाखतीत सांगितलं कि, आज केरळ सोबतच कित्येक भागात ५ ते ६ हजार वेचूर गायी आहेत. आपल्या या कामामुळे त्यांना ‘वेचूर अम्मा’ म्हणून ओळखलं जात. ज्यासाठी त्यांना २०२२ चा सर्वोच्च असा पदमश्री पुरस्कार सुद्धा देण्यात आलाय. एवढंच नाही अन्न आणि कृषी संघटना (AFO) आणि युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम (UNDP) कडून सोसम्मा यांच्या कामाचं कौतुक सुरर्ध करण्यात आलंय.
हे ही वाच भिडू :
- अस काय आहे ‘गोकुळ’ मध्ये की, कोल्हापुरकरांना आमदारकी नको पण संचालक पद पाहीजे
- भावा, आपल्या घरी दूधवाला दूध घेऊन येतो त्यामागेही खमंग इतिहास आहे…
- भारतभरात दुध क्रांती आणली, पण अखेरपर्यंत दुधासारखे स्वच्छचं राहिले