पुण्याच्या वेंकीजने इंग्लिश फुटबॉल टीम विकत घेतली म्हणून इंग्लंडवाल्यांच्या पोटात दुखतंय

काही दिवसांत आयपीएलचा धमाका सुरू होतोय. क्रिकेटच्या या महाजत्रेने भारताला भुरळ घातली आहे. क्रिकेट कळणारे न कळणारे अनेक वीर मुंबई भारी की चेन्नई भारी यावरून भांडत असतात

अगदी हाच प्रकार इंग्लिश फुटबॉलच्या लीगमध्ये पाहायला मिळतो. अत्यंत चुरशीने खेळले जाणारे हे सामने जगभरात भक्तीभावाने पाहिले जातात. इंग्लिश लीगच्या प्रत्येक टीम एखाद्या धर्माप्रमाणे आहेत, त्यांच्या भक्तांमध्ये तशीच मोठी भांडणे देखील होतात, दंगली होतात.

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की याच इंग्लिश फुटबॉल क्लबपैकी एक क्लब पुण्याच्या पोल्ट्री कंपनीच्या मालकीचा आहे.

क्लबच नाव आहे ब्लॅकबर्न रोव्हर्स आणि मालक आहेत वेंकीज चिकन.

आधी वेंकीजचा इतिहास जाणून घेऊ.

६ नोव्हेंबर १९३५ रोजी तेलंगणाच्या चंचलगुडा गावात बंडा वासुदेव राव हा मुलगा जन्मला. गावी काही शिक्षणाची सोय नव्हती त्यामुळे जे शिक्षण मिळालं ते व्यवहारातून मिळालं. अगदी लहान वयात गावातल्याच उत्तरादेवी या मुलीशी लग्न झालं.

हे दांपत्य खूप कष्टाळू होतं. घरची परिस्थिती काही उत्तम नव्हती यामुळे बंडा राव यांनी पडेल ती कामे करत संसार स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. कधी टेलिफोन ऑपरेटर तर कधी थर्ड ग्रेड रेल्वे कर्मचारी अशा नोकऱ्या केल्या.

या बिकट काळात उत्तरादेवींनी त्यांना साथ व आत्मविश्वास दिला.

या होतकरू तरुणाची हुशारी बघून तिथल्या एका लोकल नेत्याने त्यांना आपला पर्सनल असिस्टंट म्हणून नोकरी दिली. तो नेता पुढे जाऊन मंत्री झाला.

खरंतर बीव्ही राव यांचे कष्टाचे दिवस आता सरले होते.

कमाई चांगली होत होती, तीन मुले, बायको सुखी संसार सुरू होता. पण ते खुश नव्हते. त्यांना नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग सुरू करायचा होता, तो ही शेती विषयक क्षेत्रात.

यातून ध्येयाने पेटून उठून त्यांनी त्या वयात एका कृषी विद्यापीठमध्ये शॉर्ट टर्म कोर्स साठी ऍडमिशन घेतलं.

शिक्षणाची कमतरता आपल्या भविष्याच्या आड येऊ नये हे त्यांच्या डोक्यात पक्क बसलं होतं.

या विद्यापीठात डेअरी आणि पोल्ट्री फार्मिंगचा कोर्स पूर्ण केला आणि पोल्ट्री चिकन उद्योगात उडी घेतली. सुरवातीला अनुभवासाठी काही ठिकाणी नोकरी केली. अनुभव व आत्मविश्वास पक्का झाल्यावर स्वतःच पोल्ट्री बिजनेस सुरू केला.

याच नाव ठेवलं वेंकटेश्वरा हॅचरीज उर्फ वेंकीज

बीव्ही राव यांनी आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवून ७ एकर जमीन खरेदी केली व तिथे पोल्ट्री फार्म सुरू केला. ते वर्ष होत १९७१.

बीव्हीराव यांची स्वप्नं मोठी होती.

फक्त पोल्ट्री फार्म उघडून ते गप्प बसले नाहीत तर पुण्याला मोठी कंपनी सुरू केली. भारतातली पोल्ट्री उद्योगातली सर्वात मोठी कंपनी बनली. अंडी उत्पादन करणारी ही जगात पाचवा क्रमांक मिळवला. शेतकऱ्यांना पोल्ट्री उद्योगाबद्दल मार्गदर्शन करणे, पोल्ट्री फीड, पोल्ट्री वॅक्सिन बनवणे असे प्रत्येक गोष्टीत लक्ष घातलं, कुकुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार दिला.

देशभरात नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटीची स्थापना केली व पहिले चेअरमन बनले. त्यांना भारत सरकारतर्फे पद्मश्री सन्मान देण्यात आला.

बीव्हीराव यांच्या नंतर त्यांच्या तिन्ही मुलांनी म्हणजे अनुराधा देसाई व वेंकटेश राव, बालाजी राव या तिघांनी बिझनेस सातासमुद्रापार नेला. हजारो कोटींचा नफा कमावला.

इतकंच नाही तर वेंकीज एक्स्प्रेस या नावाने सुरू झालेले त्यांचे फास्ट फूड चेन रेस्टॉरंट आज मॅक्डोनाल्ड केफसी यांना फाईट देऊन देशातल्या कानाकोपऱ्यात उभे राहिले आहेत.

पण वेंकीज एवढ्या समाधानी नव्हते. त्यांनी २०१० साली इंग्लिश फुटबॉल लीगच्या ब्लॅकबर्न रोव्हर्स या टीमची खरेदी केली.

सगळं जग यामुळे आश्चर्यचकित झाले. ज्या भारतावर इंग्लंडने दीडशे वर्ष राज्य केले त्या गरीब देशातील एक चिकन कंपनी इंग्लिश फुटबॉल क्लब विकत घेते ही गोष्ट तिथल्या कर्मठ लोकांना पटली नाही.

साधारण १८७५ साली स्थापन झालेला हा ब्लॅकबर्न रोव्हर्स हा क्लब अतिशय ऐतिहासिक समजला जातो.

त्यानी तीन वेळा इंग्लिश चॅम्पियनशिप जिंकलेली. सध्या ही टीम इतकी चांगली कामगिरी करू शकलेली नाही त्यामुळे तिचा समावेश टू टियर संघात करण्यात आला आहे.

वेंकीजने २३ मिलियन पौंड एवढी घसघशीत किंमत खर्च करून ही टीम विकत घेतली.

मात्र सुरवातीपासून नाराज असलेल्या क्लबच्या लोकांनी त्यांना सहकार्य करण्याच्या ऐवजी त्यांच्या पायात अडथळे आणण्याचे काम केले. वेंकीजच्या ब्लॅकबर्न रोव्हर्सच्या मॅनेजमेंटवर आज ही इंग्लिश माध्यमातून सडकून टीका होते, टीमच्या खालावत चाललेल्या कामगिरीचे खापर वेंकीजवर फोडले जाते.

मध्यन्तरी वेंकीज भारतात परत जा अशी निदर्शने करत ब्लॅकबर्न रोव्हर्सच्या फॅन्सनी निदर्शने देखील केली.

मात्र मोठा तोटा सहन करून वेंकीज या क्लबमध्येचिकाटीने उभी आहे. टीम विकून परत येणे हा एकप्रकारे देशाचा अपमान आहे. म्हणून वेंकीजने जिद्दीने गड लढवण्याच काम सुरूच ठेवलं आहे.

एक ना एक दिवस ब्लॅकबर्न रोव्हर्सला त्याचे गतवैभव मिळवून देण्याचा विश्वास राव बंधूनी व्यक्त केला आहे.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.