परत वेणू माधव यांच्या निधनाच्या अफवा पसरू लागल्या. दुर्दैवाने यावेळी ही बातमी खरी होती.

आर्या सिनेमा कोणाला आठवतोय? एके काळी या तेलगु सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलेलं. आर्या झालेला अल्लू अर्जुन, त्याचा आ अंटे वरचा डान्स, त्याचा तो ‘फिल माय लव्ह’ वाला महान डायलॉग सगळं सगळं फेमस झालं होतं. अल्लू अर्जुनच्या करिष्म्यापुढे बाकीचे सगळे अॅक्टर्स झाकोळून गेले होते पण आपल्याला त्या गर्दीत एक चेहरा लक्षात राहिलेला. सिनेमाच्या व्हिलनचा मित्र झालेला वेणू माधव.

खर तर आर्या मध्ये त्याच्या कॅरेक्टरला नावच नाही. कॉमेडी करण्यासाठी ठेवलेला व्हिलनचा म्हणजेच अजयचा राईट हँड एवढच त्याच सिनेमातलं महत्व. वयाने तिशीपार केलेला, दिसताना चाळीशीचा वाटणारा हा माणूस आर्याच्या कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून कसा असतो हे न उमजलेल कोडं.

अजय आणि आर्या अमोरासमोर आल्यावर आर्याच्या चाप्टर उत्तरांना उलट बोलून अजयला आणखीन गोत्यात आणणारा हा मित्र. त्याच्या त्या अतिआत्मविश्वासवाल्या निरागस हरकती मधून जोक तर व्हायचे.

तेलगु सिनेमात हिरोच्या हिरोगिरीची पहिली शिकार हे वेंधळे दिसणारे कॉमेडी अॅक्टर्स व्हायचे. सदासर्वदा घंटा असल्याप्रमाणे कोणीही येऊन बडवून जायचं. पिक्चरमध्ये नटी मिळायची नाही, मिळाली तरी तीही सारखं दात खाऊन आरडाओरड करणारी कजाग बायको असायची. हिंदीत जॉनी लिव्हर तमिळ मध्ये ब्रम्हानन्दम जे काम करायचा ती जबाबदारी तेलगु मध्ये वेणू माधववर आली होती.

आंध्रप्रदेशच्या नलगोंडा जिल्ह्यातील कोदाद येथे त्यांचा जन्म झाला. सगळे कॉमेडी कलाकार येतात त्याच प्रमाणे मिमिक्रीचे प्रोग्राम करून सिनेमावाल्यांच्या नजरेत भरला. चार्ली चप्लीनसारख्या दिसणाऱ्या तसेच भावविभ्रम करणाऱ्या वेणू माधवना संप्रदायम नावाच्या सिनेमातून पहिली एंट्री मिळाली. अक्शन आणि रोमान्सनी भरलेल्या साउथ इंडियन सिनेमामध्ये कॉमेडीचा रिलीफ पाहिजे असतोच. वेणू माधवला छोटे छोटे रोल मिळू लागले.पुढे मेगा स्टार चिरंजीवी आणि त्याचा भाऊ पवन कल्याण यांच्या सिनेमाचा तो अविभाज्य घटक होता.

कॉमेडीयनच्या रोल्सना एक लिमिटेशन असते. सिनेमाइंडस्ट्रीमध्ये ही बऱ्याचदा कोणी त्यांना सिरीयस घेत नाही. पैशांची मारामार तर असतेच. म्हणूनच म्हातारपण येऊनही भविष्याची सोय झालेली नसते.

तेलगु आणि तमिळ मिळून  दोनशेच्या वर सिनेमात काम केलेल्या वेणू माधव यांची अवस्था सुद्धा अशीच होती. मध्यंतरीची कित्येक वर्षे कॉमेडीच्या नावाखाली दिग्दर्शक जे काही करायला लावेल ते त्यांनी केलं मात्र एका क्षणी ठरवलं की बास आता आपण हे करायचं नाही. त्यांनी जाहीर केलं की डबल मिनिंग असणारे जोक्स मी करणार नाही.

वेणू माधव डबल मिनिंग जोक करायला तयार नसेल तर दुसरे हजार कॉमेडी कलाकार उभे करतो असा माज निर्मात्यांनी केला. आणि खरोखर वेणू माधव यांच्या कडे येणारा सिनेमाचा ओघ आटला. यातच त्यांनी एक सिनेमा बनवला प्रेमाभिषेशेकम. त्यात ते स्वतः हिरो होते.  वेणू माधव यांनी आयुष्यभराची पुंजी या सिनेमासाठी लावली होती.  पण हा सिनेमा सुपरफ्लॉप झाला.

वेणू माधवच्या आयुष्यातला सर्वात मोठा डाव फसला. पुढे त्यांनी राजकारणात उडी घेतली. तिथेही कोणी त्यांची डाळ शिजू दिली नाही. तेलगु देसम पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश घेतला होता. मागच्या वर्षी झालेल्या तेलंगणा विधानसभा निवडणुकीत त्यांनी घरच्या कोडद मतदारसंघातून फॉर्मदेखील भरला होता पण कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे त्यांना निवडणुक लढवता आली नाही.

काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीच्या तकारी सुरु झाल्या होत्या. पब्लिकली ते जास्त दिसत ही नव्हते.  अशातच गेल्या वर्षी त्यांच्या मृत्यूची बातमी आली. सगळ्यांनी श्रद्धांजली वगैरे वाहली पण नंतर कळाल की जे वारले ते तेलगु सिनेअभिनेता वेणू माधव हे वेगळेच. तब्येत खराब असूनही वेणू माधव यांनी पुढे येऊन आपण जिवंत असल्याचं स्पष्टीकरण दिलं.

आज सकाळी परत त्यांच्या निधनाच्या बातम्या पसरू लागल्या.

यावेळी देखील ती अफवा असावी असंच राहून राहून वाटत होतं. काही दिवसांपूर्वी किडनीमध्ये दोष झालाय म्हणून त्यांना अडमिट करावे लागले आहे हे ठाऊक होतं. नेटवर बघितल्यावर कन्फर्म बातमी मिळत नव्हती तरी अनेकांनी मागच्या वेळ प्रमाणे गडबडीत श्रद्धांजली देणे सुरुच केलं. अखेर आज दुपारी १२.३० वाजता डॉक्टरांनी ही वाईट बातमी दिली. सगळ्यांना हसवण्यात आयुष्य काढलेल्या वेणू माधव यांनी चटका लावणारी एक्झिट घेतली होती.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.