ख्रिस्ती धर्म पसरवायला भारतात आला अन् गांधींच्या प्रभावामुळे सगळं सोडून हिंदू बनला

वेरियर एल्विन  हे नाव आज बर्‍याच लोकांना अपरिचित असेल. पण छत्तीसगढ ओडिसा आंध्रप्रदेशच्या जंगलांमधून फिरताना अनेक आदिवासी लोक हे नाव सहजी घेतात. अरुणाचल प्रदेश मध्ये या नावाला एक वेगळेच वलय आहे.

ह्या माणसाच्या आठवणी आदिवासी लोकांनी अजून जपून ठेवल्या आहेत.

सन १९६१ मध्ये या माणसाला पद्म भूषण या भारताच्या नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले होते. पण हा माणूस जन्माने भारतीय नव्हता.

यूनाइटेड किंगडम  देशातून आलेला हा माणूस आदिवासी लोकांमध्ये जातो, आपल्या आयुष्याची महत्त्वाची वर्षे तेथेच घालवतो, तिथल्याच एका स्त्रीशी विवाह करतो, त्यांचा अभ्यास करतो आणि त्यांच्या या कामाची दखल घेऊन सरकार आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांची मदत घेते. एखाद्या चित्रपटाची कथा वाटेल पण हा जीवन प्रवास आहे वेरियर एल्विन यांचा.

त्यांचे पूर्ण नाव होते हॅरी वेरियर होलमन एल्विन. 29 ऑगस्ट 1902 साली एलबीन परिवारात त्यांचा जन्म झाला.

त्यांचे वडील एडमंड हेॅन्ड्री हे सियेरा लिओन या भागांमध्ये चर्चचे धर्मगुरू होते. त्यामुळे त्याच्या मनावर लहानपणापासूनच ख्रिश्चन धर्माचे संस्कार झाले. ते लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचे होते. ऑक्सफर्ड मधील प्रसिद्ध अशा मेरिटन कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. इंग्रजी भाषेमध्ये बीए फर्स्ट क्लास आणि एम ए पदवी त्यांनी मिळवली होती. ऑक्सफर्डच्या विद्यापीठांमध्ये लहान-मोठी अशी खूप सारी कॉलेजेस आहेत. या सर्व कॉलेजची मिळून एकच अशी विद्यार्थी संघटना असते.

या संघटनेला तिकडे प्रचंड बहुमान दिला जातो. वेरियर एल्विन अगदी कमी वयातच या संघटनेचे अध्यक्ष बनले होते . त्यांच्या समोर इंग्लंडमध्ये मोठ्या पैशाची नोकरी आणि हवे तसे करियर उपलब्ध होते.

पण त्यांचा स्वभाव एखाद्या संन्यासी माणसाचा होता. त्यांनी भारता विषयी काही गोष्टी ऐकल्या होत्या.

भारतामध्ये ख्रिश्चन धर्माच्या प्रसारासाठी त्याकाळी अनेक लोक काम करत होते. त्यामध्ये पुण्यातील अग्रगण्य संस्था ख्रिश्चन सेवा संघ या नावाने कार्यरत होती. हे लोक भारतीय परिस्थितीशी मिळते-जुळते व हिंदू धर्माची जुळेल अशा प्रकारचा ख्रिस्ती धर्म लोकांना सांगत असत.

वेरियर एल्विन यांनी या संघटनेचे काम हाती घेण्याचा निर्णय घेतला. आपले सर्व शिक्षण आणि समोरील पुढच्या बाजूला सारून ते भारतात आले. पुण्यात येऊन त्यांनी ख्रिस्ती सेवा संघाची धर्मप्रसाराची मोहीम राबवण्यासाठी सुरुवात केली.

या संघातील लोक जवळपास एखाद्या साधू प्रमाणे जीवन जगत. भगवी कपडे घालून ते गावोगाव ख्रिस्ताचा प्रेमाचा संदेश सांगत फिरत असत. याच काळामध्ये पुण्यामध्ये महात्मा गांधी यांचा मुक्काम होता. ते त्यावेळी पुण्यामध्ये स्थायिक होते. वेरीयर एलविन यांना महात्मा गांधी यांना भेटण्याचे सौभाग्य मिळाले. गांधीजींशी भेटून ते प्रचंड प्रमाणात प्रभावित झाले. त्यांच्या धर्माच्या संकल्पना बदलल्या.

धर्मप्रसार हे कार्य महत्त्वाचे नसून भारतातील गरीब पीडित जनतेला समजून घेणे व त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होणे हे आजचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे हे त्यांना मनोमन पटले.

बॅरियर १९२७ साली चर्च ऑफ इंग्लंडमधून विशेष अनुमती मिळवून भारतात आले होते पण गांधीजींचा त्यांच्यावरील प्रभाव यापेक्षा मोठा ठरला.

त्यांनी ख्रिस्ती सेवा संघाचे काम थांबवले, काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गांधीजी आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रभावात येऊन त्यांनी देशभर काँग्रेसचे कार्य पसरवण्यासाठी सुरुवात केली. ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध बोलणाऱ्या काही निवडक इंग्रज लोकांमध्ये वेरियर एल्विन यांचा समावेश होता पण राजकारण हा त्यांचा प्रांत नव्हताच.

त्यांची मूळ ओढ ही दुःखी पिडीत जनतेमध्ये राहून त्यांची सेवा करण्याकडे होती. स्वतः गांधीजी याच उद्देशाने वर्धा येथे आश्रम बनवून राहत होते. नवीन यांनी त्यापेक्षा खडतर जीवन स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

भारतामध्ये दंडकारण्य म्हणून ओळखला जाणारा भाग हा आजही मुख्य मानवी वस्तीपासून दूर आहे.

जवळपास बांगलादेश पेक्षा मोठे क्षेत्रफळ असणारा हा भाग घनदाट जंगलाच्या सान्निध्यात आहे. हजारो वर्षांपासून येथे गुंड आदिवासी राहत आहेत. वेरियर एल्विन यांनी या लोकांमध्ये जाऊन त्यांची जीवनशैली समजून घेण्याचा ध्यास घेतला, धर्म प्रचारक म्हणून त्यांची ओळख मागे पडली. आदिवासींमध्ये राहून त्यांचे जीवन समजून घ्यायला त्यांनी सुरुवात केली.

भारतात आज आपल्याला गोंड मोरया आदिवासींविषयी माहिती आहे ती केवळ वेरियर एल्विन यांच्या प्रचंड संशोधनाचे फळ आहे. 

त्या काळात या भागाकडे कुणी ढुंकूनही पाहत नव्हते, वेरियर एल्विन यांनी वर्धा चंद्रपूर गडचिरोली तसेच मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ओडिशा मधील आदिवासी जंगल भाग यांमधून प्रचंड प्रवास केला. त्यांच्यासोबत त्यांचे पुण्यातील सहकारी शामराव हिवळे हे नेहमी असत, या दोघांनी कोणतीही मदत न घेता आदिवासी लोकांची आपली ओळख जोडली व त्यांच्यात राहून काम करायला सुरुवात केली.

हिवळे यांच्यासोबत वेरियर एल्विन हे जवळपास वीस वर्षे मध्ये भारतामध्ये मुक्काम ठोकून होते.

या काळामध्ये त्यांनी केलेले काम म्हणजे आदिवासी जीवनाची लिखित स्वरूपात नोंद करणे. इतके वर्ष आदिवासी भागात राहून त्यांनी आदिवासी जीवनामध्ये कोणतीही ढवळाढवळ केली नाही.

उलट ते स्वतः आदिवासीं सारखा पोशाख करून त्यांची जीवनपद्धती आपलीशी करून तेथे राहिले. सरकारने त्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नये. शहरातील लोकांनी केवळ एखादे संग्रहालय म्हणून आदिवासींकडे येऊ नये.

त्यांना आपले जीवन व्यवस्थित जगू द्यावे आपल्या मोठेपणाच्या व सुसंस्कृतपणाचा कल्पना त्यांच्यावर लादू नये असे विचार त्यांनी आपल्या लेखांमधून मांडले.

शहरी जीवन हा जीवनाचा मुख्य प्रवाह नसून आदिवासीं सारखे आनंदी जीवन हाच जगण्याचा मुख्य प्रवाह आहे असे त्यांचे मत होते.

यांच्या नावाची ख्याती देशभर होती. आदिवासी समाजाचा तेवढा समग्र अभ्यास आतापर्यंत कोणीच केला नव्हता. त्यांना आजपर्यंत रानटी म्हणून हिणवण्यात येत होते.

वेरियर एल्विन हा पहिला माणूस होता ज्याने त्यांच्या संस्कृतीचा आदर केला त्यांना बदलवण्याचा प्रयत्न न करता स्वतः बदलला.

त्यांनी आदिवासी जीवनाचे दैनंदिन वर्णन आपल्या लेखनात केले आदिवासींना समजून घेतले त्याची गाणी त्यांच्या कथा, त्यांच्या देवता, त्यांची भाषा व त्यांची संस्कृती समजून घेतली . या गोष्टीमुळे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा आदिवासी समाजाच्या विकासाची जबाबदारी सरकारवर येऊन पडली होती . आदिवासी समाज हा मुख्य भारतीय भूमीपासून नेहमीच वेगळा राहिला असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज होती.

गोंडी ही भाषा कोट्यावधी लोक बोलत असूनही या भाषेसाठी सरकारकडे कोणतीही लेखी लिपी किंवा या लोकांपर्यंत पोचण्यासाठी कोणतेही माध्यम नव्हते. यावेळी वेरियर एल्विन यांचा सरकारला उपयोग झाला. भारत सरकारच्या मानववंशशास्त्र विभागाचे उपअधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिल. 1945 पासूनच त्यांनी आदिवासींसाठी सरकारी कामे करण्यासाठी सुरुवात केली होती .

1947 नंतर भारतातील सर्व इंग्रज आपल्या मायदेशी निघून गेले. पण वेरियर एल्विन ते परत गेले नाहीत. त्यांचा आत्मा भारताशी जोडलेला होता . म्हणून 1947 नंतर त्यांनी भारत देशाचे नागरिकत्व स्वीकारले.

आपल्या मातृभूमीला कायमचा रामराम ठोकला आणि ते इथेच स्थायिक झाले.

जानेवारी 1954 मध्ये भारताने त्यांना पूर्ण नागरिकत्व दिले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात बाहेरून येऊन हा बहुमान मिळवणारे वेरियर एल्विन हे जगातले पहिलेच नागरिक होते. त्यानंतर हा कित्ता अनेक लोकांनी गिरवला.

अरुणाचल प्रदेश म्हणून आज ओळखला जाणारा भाग तेव्हा नेफा या नावाने ओळखला जात असे. या डोंगराळ भागांमध्ये शेकडो आदिवासी जमाती राहत होत्या. त्यांची भाषा आणि संस्कृती मुख्य भारतासाठी पूर्णपणे नवीन होती.

हा विभाग पहिल्यांदाच भारताच्या मुख्य भूमीचा नीटपणे जोडला गेला होता. काही भागांमध्ये भारत विरोधी चळवळी सुरू झाल्या होत्या. अशावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना हा भाग समजून घेण्यासाठी व तेथील लोकांमध्ये भारताविषयी आपुलकी तयार करण्यासाठी एका विश्वासू माणसाची गरज होती.

हे काम वेरियर एल्विन यांनी पूर्ण केले. नेहरू मंत्रिमंडळामध्ये त्यांनी ईशान्येकडील राज्यांसाठी सल्लागार म्हणून काम पाहिले. ईशान्यकडील राज्यांमध्ये कोणतीही कामे करण्याआधी वेरियर एल्विन यांचा सल्ला घेतला जात असे.

आदिवासी लोकांना कसे समजून घ्यावे त्यांच्या संस्कृतीत कशा पद्धतीने समरस व्हावे, तेथे लोकशाही आणि प्रतिनिधित्वाच्या कल्पना कशा द्याव्यात यासंबंधी त्यांनी विपुल काम केले. आपले हे काम ते वेळोवेळी लेखनाच्या स्वरूपात नोंदवत आले. त्यांनी गांधीजींची अनेक चित्रे काढली त्याचप्रमाणे आदिवासी समाजाची गाणीही लिहिली. आदिवासी महिलांच्या गीतांचे संकलन त्यांनी केले त्याच पद्धतीने ईशान्येकडील राज्यांमध्ये हिंसाचार कसा आटोक्यात आणता येईल याविषयी ते बोलले.

भारतावर आणि मुख्य करून भारताचे मूळ रहिवासी असणाऱ्या आदिवासी लोकांवर इतके प्रेम करणारा दुसरा माणूस कोणी नव्हता आदिवासी लोक त्यांच्यावर विश्वास ठेवायचे.

म्हणूनच त्यांची पुस्तके आणि कार्यपद्धती आजही मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे.

‘वेरियर एल्विन यांचे आदिवासी जग’ या त्यांच्या आत्मचरित्राची जगभरात प्रशंसा झाली. भारत सरकारच्या साहित्य अकादमीने या पुस्तकाला पुरस्कार दिला .

1965 साली भारतात प्रसिद्ध झालेले सर्वोत्कृष्ट इंग्रजी पुस्तक म्हणून या पुस्तकाला ओळखले जाते. नंतरच्या काळात वेरियर एल्विन यांचे कार्य तितक्याच जोमाने पुढे नेणारा दुसरा माणूस क्वचितच पाहायला मिळतो.

आदिवासींचे त्यांनी जपून ठेवलेले दस्तऐवज व त्यांच्या मौखिक म्हणजे तोंडी परंपरेला लिहून काढून त्याचे केलेले जतन भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील मौल्यवान ठरले आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.