आणीबाणीदरम्यान अटक केलेल्या आयपीएस अधिकाऱ्याने कुलदीप नायर यांचे पाय धरले होते !

कुलदीप नायर हे देशाच्या  घडण्या-बिघडण्याच्या मोठ्या काळाचे साक्षीदार होते. पत्रकार म्हणून देशाच्या इतिहासातील अनेक  महत्वाच्या घटना आणि घडामोडी त्यांनी कव्हर केल्या होत्या.

आणीबाणीच्या काळात जेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला त्यावेळी त्याविरोधात आपला आवाज बुलंद करणाऱ्या आघाडीच्या पत्रकारांमध्ये कुलदीप नायर यांचा समावेश होता.

आणीबाणीतील वृत्तपत्रांच्या गळचेपीविरोधात एक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचं नेतृत्व कुलदीप नायर करत होते. त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळी दिल्लीतील तुघलक रोड पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात आलं त्यावेळी तेथील आयपीएस अधिकाऱ्याने नायर यांचे पायच धरले.

नायर यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. नेमकं काय चाललंय हे त्यांनाही कळत नव्हतं. त्यावेळी तो अधिकारी स्वतःच म्हणाला, “सर, आपण माझे गुरु आहात. नुकतंच मी आपलं ‘डीस्टंट नेबर’ हे पुस्तक वाचून काढलंय. मला ते खूप आवडलंय. सध्या मी माझं कर्तव्य बजावतोय”

इंदिरा गांधींच्या आणीबाणीविरोधात मोर्चा काढून जेलमध्ये जाणाऱ्या नायर यांचे इंदिरा गांधी यांच्यासोबत वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले संबंध होते. इंदिरा गांधींसोबतचा एक किस्सा नायर यांनीच सांगितला.

सुरुवातीच्या काळात  इंदिरा गांधींचे केस मोठे होते. त्यानंतर ज्यावेळी इंदिरा गांधींनी आपली हेअरस्टाईल बदलून केस कमी केले त्यावेळी त्यांनी नायर यांना विचारलं की, “मी कशी दिसतेय…?”

इंदिरा गांधींच्या प्रश्नावर उत्तर देताना नायर म्हणाले,

“तुम्ही आधीपासूनच चांगल्या दिसत होत्या, आता अधिक सुंदर दिसताहात”

‘इंडियन एक्स्प्रेस’ आणि ‘द स्टेट्समन’ सारख्या प्रतिष्ठीत वृत्तपत्रांचे संपादक राहिलेल्या नायर यांचे १४ वेगवेगळ्या भाषांमधून निघणाऱ्या जवळपास ८० वृत्तपत्र  आणि मासिकांमधून कॉलम प्रकाशित होत होते. आपल्या कारकिर्दीतील जवळपास २५ वर्षे त्यांनी ‘द टाईम्स लंडन’चे रीपोर्टर म्हणून काम केलं होतं.

स्वातंत्र्यानंतरच्या अनेक महत्वाच्या राजकीय घडामोडींवर त्यांनी विपुल लिखाण केलं होतं. देशाचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे कुलदीप नायर हे निकटवर्तीय मानले जात असत.

शास्त्रीजींचा ज्यावेळी ताश्कंदमध्ये मृत्यू झाला त्यावेळी नायर त्यांच्यासोबतच होते. शास्त्रीजींचे माध्यम समन्वयक म्हणून या दौऱ्यावर ते शास्त्रीजीसोबत होते. १९९७ साली त्यांची राज्यसभेचे खासदार म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली होती.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.