मराठी माणसाने किराणा दुकानातून सुरु केलेला विको ब्रँड आज घडीला ४५ देशांमध्ये पोहचला आहे.

१९८० च्या काळात जाहिराती इतक्या विरळ होत्या कि एखादी हायलाईट होणारी जाहिरात अगदी लहान थोरांच्या लक्षात राहायची. आजच्या काळात तर इतक्या जाहिराती आहेत कि गाणं ऐकताना जरी जाहिरात आली तरी आपण तिला शिव्या घालतो. पण जुन्या काळात मोजक्याच जाहिराती होत्या त्यापैकी एक होती विको कंपनीची जाहिरात.

विको कंपनी सगळ्या देशाला माहिती आहे, म्हणजे लग्नाच्या हळदीपासून त्याची सुरवात होते ते विको वज्रदंती पर्यंत जाऊन थांबते. आजक जरा सविस्तरपणे विको कंपनी कशी सुरु झाली, ती उभी कोणी केली असं सगळं जाणून घेऊया आणि विशेष म्हणजे हि कंपनी, आता कंपनी म्हणण्यापेक्षा ब्रँड म्हणायला हवा. हा ब्रँड उभा केला तो एका मराठी माणसाने. 

विकोच्या जाहिरातीत म्हणजे १५ सेकेंडच्या जाहिरातिमध्ये ६ वेळा विको नाव यायचं कारण त्यावेळी जाहिरात करण्यासाठी एकमेव माध्यम म्हणजे टीव्ही होतं. त्याच्याही आधी जरा बघू.

१९५२ साली केशव पेंढारकर यांनी वयाच्या ५५ व्या वर्षी विको कंपनीची सुरवात केली. विको चा फुल फॉर्म आहे,

विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी [ VICCO ].

केशव पेंढारकर यांनी नागपूरमध्ये एक किराणा दुकान सुरु केलं होतं. पण मन न रमल्याने त्यांनी दुकान बंद करून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईला जाऊन त्यांना केमिकल फ्री मेकअप सामान तयार करण्याचं दुकान सुरु करायचं. एकूण त्यांना दहा मुलं होती त्यांना सांभाळण्यासाठी म्हणा किंवा त्यांची व्यवसाय करण्याची इच्छा म्हणा त्यांनी घरीच आपला व्यवसाय थाटला.

जी गोष्ट वापरात राहील आणि लवकर संपेल जेणेकरून तिचा खप वाढेल अशा उद्देशाने त्याणी आयुर्वेदिक गोष्टींचा अभ्यास सुरु केला. परळमध्ये एका छोट्याश्या गोडाऊनमध्ये त्यांचा उद्योग सुरु होता. केशव पेंढारकर यांचा एक नातेवाईक आयुर्वेदामध्ये पदवी घेऊन आला होता आणि त्याने या उद्योगात इंटरेस्ट दाखवला.

पुरेसा अभ्यास झाल्यावर केशव पेंढारकर यांनी दात स्वच्छ करण्यासाठी वापरली जाणारी पावडर तयार केली जी पुढे विको वज्रदंती म्हणून प्रसिद्ध झाली. मुलांसोबत घरोघरी जाऊन पेंढारकर या प्रोडक्टची विक्री करू लागले. हळूहळू त्यांचा हा ब्रँड लोकप्रिय होऊ लागला. त्यांचं सगळं कुटुंब विको ब्रँडची भरभराट व्हावी म्हणून काम करू लागलं. 

१९७१ साली केशव पेंढारकर यांचं निधन झालं. पुढे त्यांचे थोरले चिरंजीव गजानन पेंढारकर हे कंपनीचे मालक झाले. त्यांनी विकोमध्ये तयार झालेली टूथपेस्ट महाराष्ट्रभर पसरवली. गजानन पेंढारकर यांनी त्यावेळी नवीन आयडिया लढवली. मार्केटमध्ये त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या आणि त्वचेला हानिकारक असणाऱ्या क्रीम होत्या , त्यात पॉण्डस, निविया सामील होत्या.

गजानन पेंढारकरांनी पूर्णपणे आयुर्वेदिक आणि त्वचेची काळजी घेणारी क्रीम विकोमध्ये तयार केली जी विको टर्मरिक क्रीम म्हणून प्रसिद्ध झाली. टीव्हीवर हीच जाहिरात पाहून या जाहिरातीतील नटी, म्युझिक, गाणी सगळं पाठ झालं होतं. आणि विको फेमस होण्यात या क्रीमचा मोठा वाटा आहे. लग्नात हळद म्हणून हल्दी चंदनसुद्धा त्यांनी बाजारात आणलं.

संगीता बिजलानी या अभिनेत्रीला घेऊन त्यांनी विकोची जाहिरात केली.

त्वचा कि रक्षा करे आयुर्वेदिक क्रीम,

विको टर्मरिक आयुर्वेदिक क्रीम

हि १९८४ साली भयंकर गाजलेली जाहिरात होती.

१९८६ साली दहा एकरात विकोने आपली कंपनी विस्तारली.

आजही विको ब्रान्ड देशभरात प्रसिद्ध आहे. प्रत्येकाच्या घरात हा ब्रँड असू शकतो इतका तो लोकप्रिय आहे. विको ब्रँडच्या अंतर्गत ४० प्रोडक्ट तयार होतात. ठाणे, नागपूर आणि गोवामध्ये या ब्रँडच्या फॅक्ट्री आहेत. तब्बल ४५ देशांमध्ये विको ब्रॅन्ड विकला जातो. आयुर्वेदाच महत्व बाहेरील देशांनासुद्धा विकोने पटवून दिलं आहे.

आज घडीला ५०० कोटींची उलाढाल विको ब्रान्ड जगभरात करतो. गजानन पेंढारकर यांचं लक्ष्य २०२५ पर्यंत १००० करोड पार करण्याचं आहे. डाबर, पतंजली यांच्या तुलनेत विको हा ब्रान्ड जुना असल्याने आणि भारताचा सगळ्यात जास्त विश्वासाहार्य ब्रँड असल्याने मार्केटमध्ये विको कायम आघाडीवर असते. 

एका साध्या किराणा दुकानापासूनचा हा प्रवास जगभरात एका मराठी माणसाने पोहचवला हि बाब गौरवास्पद आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.