रोमान्स आणि रहस्याचा मिश्र तडका देणारी व्हिक्टोरिया बग्गी मुंबईकर कधीच विसरू शकत नाहीत

सायंकाळच्यावेळी व्हिक्टोरियामधून सैरसापाटा म्हणजे मुंबईकरांसाठी स्वर्गसुख असायचं

 

जर तुम्ही सिनेरसिक असाल तर बदलतं सिनेमा विश्व नजरेतून दूर होईल, हे अशक्यच. प्रत्येक सिनेमा दशकानं मागे सरताना काही ठराविक वस्तूंच्या माध्यमातून आपली आठवण जागी ठेवलीये. जसं काळी छत्री बघितली की लगेच ‘प्यार हुआ इकरार हुआ’ गाणं आठवतं आणि आपण अपोआपच राज कपूरच्या दशकात जातो. त्याचप्रमाणे दिलीप कुमार, शमी कपूर, आणि अमिताभ बच्चन यांचा विषय निघाला की त्यावेळच्या रोमॅन्टीक गाण्यांना तडका लावणारी ‘घोडागाडी’ हमखास डोळ्यांसमोर येते. जर अलीकडचं उदाहरण घेतलं तर भाईजानचा ‘वीर’ चित्रपट आठवा. मग आम्ही नेमकं कोणत्या घोडागाडीबद्दल बोलतोय हे चटकन लक्षात येईल. या घोडागाड्यांना ‘व्हिक्टोरिया घोडागाडी’ म्हणून ओळखलं जातं. आता या घोडागाड्यांची आठवण होण्याचं कारणही तसंच आहे.

मुंबई दर्शन म्हटल्यावर सर्रास व्हिक्टोरियाची निवड पर्यटक करायचे.

मात्र २०१५ मध्ये उच्च न्यायालयाने तिच्यावर बंदी आणली होती. कारण होतं ते  या गाड्यांमुळे घोड्यांवर होणारा अत्याचार. पण आता जुन्या मुंबईची आठवण करुन देणारी व्हिक्टोरिया घोडागाडी पुन्हा एकदा दक्षिण मुंबईत धावताना दिसतीये.

 

या व्हिक्टोरिया घोडागाडीचा इतिहासही तेवढाच रोमांचक आहे. हा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला इंग्रजांच्या काळात जावं लागेल. इंग्रजांची फक्त भारतावरच नाही तर जगातील अनेक देशांत तेव्हा सत्ता होती. याच दरम्यान व्हिक्टोरिया सगळ्यात पहिले अवतरली ती फ्रान्समध्ये. तिथेही इंग्रजांची सत्ता असल्याने १८४४ च्या सुमारास इंग्लंडची महाराणी व्हिक्टोरियाच्या नावावर या घोडागाडीला नाव देण्यात आलं. असं असलं तरी इंग्लंडमध्ये ही गाडी १८६९ मध्ये इंग्लंडचे प्रिन्स ऑफ वेल्स यांनी आणली. सुरुवातीच्या काळात फक्त राजघराण्यातील लोकांची सवारी म्हणून व्हिक्टोरियाला मान होता.  कलांतराने समाजातील प्रतिष्ठित लोकांना व्हिक्टोरियाच्या सावरीचा हक्क मिळाला. समाजातील अमीर-उमराव मोठ्या थाटात व्हिक्टोरिया मिरवत असत.

अशी ही व्हिक्टोरिया भारतात यायला फार काळ लागला नाही. भरतावर इंग्रजांचं राज्य असल्याने मोठ्या अधिकाऱ्यांनी, व्हिक्टोरियाचे शौकीन राजे-महाराजांनी ही घोडागाडी भारतात आणली. तशी ही व्हिक्टोरिया बग्गी अगदी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापर्यंत सर्वसामान्यांना कधी परवडलीच नाही. त्यावेळी भारतात व्हिक्टोरिया बग्गी म्हणजे संपत्ती दर्शनाचं प्रतिक समजली जायची.

१९४७ ला भारतला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यासोबतच उच्च-नीच असे भेद जाणून व्हिक्टोरिया सर्वसामान्य माणसांच्या हाती आली. आता लोकांना हवा तो व्यवसाय ते करू शकत होते. मुंबईसुद्धा बरीच बदलली होती. अशात व्हिक्टोरिया घोडागाडीला अनेकांनी आपल्या उपजीविकेचं साधन बनवलं. मुंबई दर्शनासाठी गेलं की व्हिक्टोरिया त्यांचा प्रवास अगदी सुखकर आणि आनंददायी करू लागली. त्यातंच व्हिक्टोरियाला रोमॅन्सचं सिम्बॉल बनवलं ते बॉलीवूड चित्रपटांनी. दिलीप कुमारांचा नाय दौर, शमी कपूरचा तुमसा नाही देखा, बिग बिंचा शोले, मर्द,  ते आमीर खानच्या अंदाज अपना अपनापर्यंत व्हिक्टोरिया चित्रपटांत झळकत राहिली. १९७३ साली आलेला व्हिक्टोरिया नं. २०३ या चित्रपटाची कथा तर पूर्णपणे व्हिक्टोरिया बग्गीच्या आसपासच घुटमळते. तेव्हा ही व्हिक्टोरिया नेमकी कशी दिसते हे बघायचं असेल तर हा चित्रपट नक्कीच मदत करेल.

जर तुम्हाला वाचनाची आवड असेल आणि त्यातही जुन्या काळातील रहस्यमयी कथा तुम्ही वाचत असाल तर व्हिक्टोरियाशी संबंध आलाच असेल. शेरलोक होल्म्स सारख्या गुप्तहेराचं जिवंत पात्र रेखाटणारे इंग्लंडचे लेखक सर आर्थर कॅनाॅन डायल यांच्या कथांमध्ये व्हिक्टोरियाला विशेष स्थान देण्यात आलं आहे. कथा लिहिताना रहस्य वाढवण्यासाठी व्हिक्टोरिया बग्गीचा खूपच सुरेखपणे  वापर करण्यात आला आहे. शिवाय 1920 सारख्या हाॅरर चित्रपटांतही व्हिक्टोरियाचं दर्शन घडतं. रात्रीच्या अंधारात, किर्रर शांततेत व्हिक्टोरियाला बांधलेल्या घोड्यांच्या टापांचा आणि पानांच्या सळसळीचा आवाज अजूनच भीतीचं वातावरण तयार करण्यासाठी वापरलेलं याच दिसतं.

 

याहून पुढे सांगायचं झालं तर मुंबई फिरायला गेलेल्या आपल्या आई-वडिलाच्या जुने फोटो चाळा. या फोटोंमध्ये व्हिक्टोरिया घोडागाडी बघायला मिळेलच. रोमॅन्सपासून ते रहस्यापर्यंत नेणारी अशी ही व्हिक्टोरिया सफर आता मुंबईकरांना आणि मुंबई दर्शनाला गेलेल्या लोकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. फक्त स्वरूप थोडंस बदललेलं आहे. आता घोड्यांच्या जागी बॅटरीवर ही गाडी धावत आहे आणि पर्यटक मनसोक्तपणे याचा आस्वादही घेत आहेत.  तुमच्याही अशा काही आठवणी व्हिक्टोरिया घोडागाडीशी जुळलेल्या असेल तर परत ते क्षण जगता येणार आहेत. तेव्हा सिनेप्रेमी असाल तर ही व्हिक्टोरिया बाग्गीची राईड तुम्ही नक्कीच मीस करणार नाही!

Leave A Reply

Your email address will not be published.