विदर्भात शिवसेना रुजली ती गवळी कुटुंबामुळेचं…!

वाशिम दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी दगडफेक केल्याची घटना आज सकाळी घडली. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.

या कारखान्याची पाहणी करण्यासाठी सोमय्या आज वाशिमच्या दौऱ्यावर होते. मात्र शिवसेनेकडून सोमय्या यांच्या दौऱ्याला विरोध होत होता. भावना गवळी यांच्या काही समर्थकांनी किरीट सोमय्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.  भावना गवळी यांच्या कारखान्यावर केलेल्या आरोपांवरुन हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतंय. किरीट सोमय्या यांच्यासोबत गाडीत भाजप आमदार राजेंद्र पाटणी देखील होते.

यानंतर खासदार भावना गवळी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. वाशिम लोकसभा मतदारसंघात सलग ५ वेळा निवडून येण्याची किमया साकार करणाऱ्या अशा या खासदार. आजही त्यांची लोकप्रियता कमी झालेली दिसत नाही. विदर्भात शिवसेनेचा एकहाती झेंडा मिरवणाऱ्या भावना गवळी यांच्या घराण्यालाच सेनेला विदर्भात रुजवण्याचं श्रेय दिलं जातं. 

शिवसेना स्थापन झाली, वाढली ती मुंबई आणि कोकण परिसरात. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरा नंतर मराठावाड्यात शिवसेना पोहचली. मात्र विदर्भात पोहोचण्यासाठी विशेष असा काही मुद्दा नव्हता. त्यात पूर्व विदर्भ म्हणजे नागपूर, गडचिरोली, भंडारा वर्धा भागात स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठींबा आहे. तर दुसरीकडे म्हणजेच पश्चिम विदर्भ अमरावती, अकोला, वाशिम संयुक्त विदर्भाच्या बाजूने आहे. त्याला वऱ्हाड असेही म्हटले जाते. त्यामुळे काही प्रमाणात शिवसेना वाढीसाठी याभागात स्कोप होता. 

वाशिम लोकसभा मतदारसंघाचा इतिहास मोठा आहे. हा मतदार संघ मुळात तयार झाला तो १९७७ साली. पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले ते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक. तेव्हापासून हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला. त्यानंतर गुलाम नबी आझाद यांच्या सारख्या बाहेरच्या उमेदवाराला आणून इथे काँग्रेसने निवडून दिलं. सुधाकरराव नाईक, अनंतराव देशमुख यांच्या सारखे  दिग्गज नेते वाशिम मतदारसंघातून निवडून आले होते.

दोन मुख्यमंत्री देणाऱ्या या मतदारसंघात शिवसेना रुजविणे सोपे काम नव्हते. मात्र पुंडलिकराव गवळी यांनी ही लिलया पेलून दाखविली.

विदर्भातील शिवसेनाला वाढायला स्कोप नसतांना भावना गवळी यांचे वडील पुंडलिकराव गवळी यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या वाशिम मतदारसंघात शिवसेनेची पाळेमुळे रोवली. ती अजूनही भक्कम असल्याचे पाहायला मिळते.

असं सांगण्यात येते की, विदर्भात शिवसेनेची विजयी एन्ट्री झाली ती पुंडलिकराव गवळी यांच्यामुळेच. पुंडलिकराव गवळी शिवसेनेकडून १९९६ मध्ये वाशिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढविणार म्हटल्यावर त्यावेळी सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. मात्र पुंडलिकराव गवळी निवडणूक लढविण्या बद्दल ठाम होते.

त्यांच्या विरोधात काँग्रेस तर्फे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना तिकीट देण्यात आलं होतं. थेट वसंतराव नाईकांच्यापासून हा भाग नाईक घराण्याचा गड मानला जायचा. इथल्या आदिवासी व शेतकऱ्यांसाठी हे घराणं देव मानलं जायचं. त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणे देखील सोपं काम नव्हतं.

शिवसेनेच्या तिकिटावर लढतांना पुंडलिकराव गवळी यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे एक अट घातली होती. ती म्हणजे त्यांनी वाशिम मध्ये येऊन  प्रचार सभा घेण्याची.  बाळासाहेब ठाकरे यांनी एक सभा घेतली आणि नाईक परिवाराचा अभेद्य किल्ला ढासळला.

पुंडलिकराव गवळीच्या नंतर विदर्भातील शिवसेनेच्या ताकदवान नेत्यांमध्ये खासदार भावना गवळी यांचा समावेश होतो. 

भावना गवळी यांचा जन्म २३ मे १९७४ रोजी वाशिम येथे झाला. माजी खासदार  पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडून मिळाले. त्या पुंडलिकराव गवळी यांच्या सर्वात लहान कन्या आहेत.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत भावना गवळी यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. वडिलांच्या निधनानंतरही भावना गवळी यांनी त्यांच्या राजकारणाचा वसा समर्थपणे पुढे नेला.

लहान वयातच राजकीय क्षेत्रात उतरलेल्या भावना गवळी यांनी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला. २००४,२००९, २०१४ आणि आता २०१९ असा सलग लोकसभा निवडणुकात विजय मिळवून त्यांनी उत्तरोत्तर राजकारणातील आपले स्थान भक्कम केले.

मध्यंतरी माजी मंत्री संजय राठोड यांनी भावना गवळी यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. २०१४ ला वाशिम मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी संजय राठोड इच्छुक होते मात्र त्यांना यश आले नाही.संजय राठोड यांना भावना गवळीचे पक्षांतर्गत विरोधी म्हणून ओळखले जाते.  

दांडगा जनसंपर्क आणि कोणत्याही आव्हानाला थेटपणे भिडण्याची धमक या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात. गेल्या २० ते २२ वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.