2023 मध्ये विधानपरिषदेच्या २६ जागांवर खरा राजकीय आखाडा रंगणार…

२०१३ च्या सालात राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ,तेलंगणा, त्रिपुरा,मेघालय,नागालँड आणि मिझोराम अशा ९ राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत पण खरी रंगत महाराष्ट्रातही रंगेल कारण यंदा राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकांचा धुराळा उठणार आहे.

येत्या ३० जानेवारीला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पार पडणार आहेत. 

भारत निवडणूक आयोगाने २९ डिसेंबरला महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक तर नाशिक तसेच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक घोषित केली आहे. निवडणुकीची अधिसूचना येत्या ५ जानेवारीला निघणार आहे. १२ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. यासाठी ३० जानेवारीला मतदान होणार असून २ फेब्रुवारीला निकाल जाहीर होईल.

गेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेनंतर राज्यात अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या, सत्तांतर झालं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन झालं. त्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असणार आहे.

विधान परिषदेतले पक्षीय संख्याबळ पाहता,  

भाजपचे २२ आमदार आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरें अशा या महाविकास आघाडीचे २८ आमदार आहेत. तुलनेत भाजपचे संख्याबळ कमी आहे. चित्र असं दिसतंय कि, विधान परिषदेत भाजपचं संख्याबळ कमी असल्या कारणाने भाजपने आतापर्यंत विधान परिषदेच्या सभापतिपदाची निवडणूक टाळली असल्याचं म्हणलं जातंय.

विधान परिषदेत रिक्त जागा किती ?

सद्या विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या जागा पाहता, यात पदवीधर मतदार संघाच्या ४ जागा,  राज्यपाल नामनियुक्त १२ जागा आणि स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या ९ जागा ज्यात सोलापूर, अहमदनगर, ठाणे, पुणे, सांगली-सातारा, नांदेड,यवतमाळ, जळगाव, भंडारा- गोंदिया या मतदारसंघाचा समावेश आहे. 

येत्या काळात विधानपरिषदेचा राडा कुठं आणि किती जागी रंगणार हे पाहुया,

विधानपरिषदेच्या २ पदवीधर (नाशिक आणि अमरावती) आणि ३ शिक्षक मतदारसंघ (औरंगाबाद, नागपूर, कोकण) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडल्या जाणारे ९ मतदारसंघ अशा एकूण जागी निवडणूक लागली आहे. 

त्यात कोकण शिक्षक मतदासंघातून अपक्ष आमदार बाळाराम पाटील, नागपूर शिक्षक मतदासंघातून अपक्ष आमदार नागो गाणार, अमरावती पदवीधर मतदासंघातून भाजप आमदार रणजीत पाटील,नाशिक पदवीधर मतदासंघातून काँग्रेस आमदार सुधीर तांबे,औरंगाबाद शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे या आमदारांचा कार्यकाळ ७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपत आहे. 

तर विधानपरिषदेवर स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडल्या जाणाऱ्या ९ आमदारांचा कार्यकाळ संपत आला आहे. ते सदस्य आणि त्यांचे मतदारसंघ पाहायचे झाले तर,

  • पुणे- अनिल भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • सांगली-सातारा-मोहन कदम (काँग्रेस)
  • नांदेड- अमरनाथ राजूरकर- (काँग्रेस)
  • यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी – (शिवसेना)
  • जळगाव- चंदुभाई पटेल (भाजप)
  • भंडारा-गोंदीया- परिणय फुके (भाजप)
  • ठाणे पालघर- रविंद्र फाटक (शिवसेना)
  • अहमदनगर- अरुण जगताप (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • सोलापूर- प्रशांत परिचारक (भाजप)

पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत प्रहार ५ ही जागी आपले मतदार उभे करणार आहे.

५ विभागीय पदवीधर-शिक्षक मतदारसंघात निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेकडून मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघात डॉ. संजय तायडे, अमरावतीमधून किरण चौधरी, नरेशशंकर कौंडा हे कोकणातून, अतुल रायकर हे नागपूर तर वकील सुभाष झगडे हे नाशिक विभागातून निवडणूक लढणार आहेत. मेस्टा आणि प्रहार संघटना मिळून या निवडणुका लढवणार आहे. 

काँग्रेसने अमरावती आणि नाशिक पदवीधर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.

अमरावती मधून माजी अर्थराज्यमंत्री तसंच जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाचे मंत्रिपद भूषवलेले नेते सुनील देशमुख यांचं नाव चर्चेत आहे. सोबतच सुधीर ढोणे, अनिरुद्ध देशमुख यांचीही नाव आहेत शिवाय नाशिक पदवीधरमधून बाळासाहेब थोरात यांचे मेव्हणे म्हणजेच सत्यजित तांबे यांचे वडील   डॉ. सुनील तांबे यांचं नाव चर्चेत आहे.  

तर भाजपही तयारीला लागलंय….

भाजपला शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने संख्याबळ वाढविण्याची संधी आहे. त्यामुळे भाजपने आपली शक्ती पणाला लावली आहे. भाजपने मतदारसंघनिहाय निवडणूक प्रमुख नेमले आहेत. या प्रमुखांवर पक्षाची निवडणूक यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने राबवून उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.

  • औरंगाबाद  विभाग शिक्षक :  आमदार राणा जगजितसिंह पाटील
  • कोकण विभाग शिक्षक : सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण
  • नागपूर विभाग शिक्षक : आमदार मोहन मते
  • नाशिक पदवीधर : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
  • अमरावती पदवीधर : आमदार डॉ. संजय कुटे

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण आणि मंत्री उदय सामंत यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन तिघांची नावे जाहीर केली, कोकण विधान परिषदेकरीता ज्ञानेश्वर म्हात्रे, पश्चिम विदर्भातून रणजीत पाटील आणि मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघासाठी किरण पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर नाशिक विधानपरिषद संदर्भात ११ जानेवारीपर्यंत निर्णय होईल, असं बावनकुळे यांनी सांगितलं.

आता राहतो प्रश्न राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा…?

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नवे तत्कालीन महाविकासआघाडी सरकारने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही. आता सरकार बदललं असल्याने राज्यपाल या १२ जागांवर काय निर्णय घेतात हे कळेलच. 

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. विधानसभेत एकूण २८८ आमदार आहेत. विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या ही त्या घटक राज्यातील विधानसभेच्या सदस्यसंख्येवरून ठरवली जाते. 

देशातील सर्वच राज्यांमध्ये विधानपरिषद आहे असं नाही. आजच्या दिवसाला एकूण २८ राज्यांपैकी फक्त ६ राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश,कर्नाटक, तेलंगणा, बिहार आणि उत्तर प्रदेशात विधानपरिषद आहे तर लवकरच आसाम, ओडिशा या राज्यांमध्ये विधानपरिषद अस्तित्वात येण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

 विधानपरिषदेत कोणकोणत्या घटकांचं प्रतिनिधित्व असतं ? 

  • विधान परिषदेतील ७८ पैकी ३१ सदस्य विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेले असतात.
  • १२ सदस्य राज्यपाल नियुक्त असतात.
  • २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात.
  • शिक्षक व पदवीधरमधून प्रत्येकी ७-७ सदस्य निवडून दिले जातात.
  • दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि त्या रिक्त जागी विधानपरिषदेची निवडणूक लागत असते.

आता यंदाच्या निवडणुकीत कोण जिंकतं आणि त्यांनंतर काय राजकीय गणितं बदलतात हे लवकरच कळेल.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.