राज्यसभेत संजय राऊतांवरचा नेम हुकला, आजच्या विधानपरिषदेत खडसेंचा गेम होणार काय?

विधानपरिषदेच्या निवडणूकीचं मतदान सुरु झालेलं आहे..आजच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. राज्यसभेत झालेल्या फटक्यानंतर महाविकास आघाडीदेखील यावेळेस सावध राहूनच राजकारण करतेय.

पण तरीही कोण म्हणतंय कॉंग्रेसचा गेम होणार कोण म्हणतंय शिवसेनेचा गेम होणार. या चर्चेत तर  राष्ट्रवादीसुद्धा आहे..

कारण विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसेंच्या जागेवर खरी रंगत आहे. ज्याप्रमाणे राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला  पराभवाचा झटका दिला त्याच प्रमाणे आजच्या निवडणुकीतही झटका देण्याची तयारी भाजपने केंव्हाच सुरु केलीये आणि हा झटका डायरेक्ट खडसेंना बसू शकतो. 

कारण भाजपवर कायम टीका करणाऱ्या खडसेंना भाजपकडून विशेष टार्गेट केले जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

राजकीय घडामोडींना वेग आलाय… 

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी तर विधानपरिषदेतच ठिय्या मांडलाय.फडणवीस स्वतः भाजपाच्या सर्व आमदारांना मतदान करण्यापूर्वी पसंती क्रम कसा द्यायचा हे सांगत आहेत. तर दुसरीकडे अजित पवार देखील मतदान करण्यापूर्वी आपापल्या आमदारांची बैठक घेत आहेत.

तर कालच रात्री काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या बैठकीत ऐनवेळेस असं ठरविण्यात आलेलं कि, शिवसेनेकडे असलेली शिल्लक मतं काँग्रेसच्या उमेदवाराला देण्यात येतील.

शिवसेनेकडे अतिरिक्त मते असतानाही ती हस्तांतरीत करण्याचा विचार नसेल तर आमचा उमेदवार पडू शकेल अन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार त्यामुळे धोक्यात येईल असा इशाराच कॉंग्रेसने दिला होता. त्यामुळे रात्रभरात अनेक राजकीय घडामोडी पार पडल्या आणि आज मतदान होतंय त्यामुळे काय वळण मिळेल सांगता यायचं नाही.

आता वळूया मेन मुद्द्यावर…

खडसेंचा गेम होणार यात पहिलं कारण म्हणजे, आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीतच कुरघोडीचं राजकारण सुरु होतं. 

शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांना अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी फोन केल्याच्या बातम्याही आल्या होत्या, पण या सगळ्यात फटका कॉंग्रेला बसणार, कि सेनेला की मग राष्ट्रवादीला ? हे आज येणाऱ्या निकालानंतरच कळेल.

हे सगळं समिकरण पाहूया…

एकूण १० जागांवर भाजपचे ५, शिवसेनेचे-२, राष्ट्रवादीचे-२, काँग्रेसचे -२ असे उमेदवार मैदानात आहेत.  भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय असे ५ उमेदवार उभे आहेत.   शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांवर सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे २ उमेदवार उभे आहेत.तर राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे असे २ उमेदवार उभे आहेत.  कॉंग्रेस पक्षाने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे या २ उमेदवारांना उभं केलं आहे.

या सगळ्यात गेम असाय की,

संख्याबळानुसार भाजपचे ४, शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचा १ , कॉंग्रसेचा १ असे उमेदवार निवडून येऊ शकतात. 

तुम्ही म्हणाल राष्ट्रवादीचा एक कसा? तर जरा थांबा कारण दुसरी जागा निवडून आणायला राष्ट्रवादीला कसरत करायला लागणारे. तसंच काहीसं कॉंग्रेसचं दुसऱ्या जागेबाबत आणि भाजपचं ५ व्या जागेबाबत आहे. कारण सध्या तरी मतांचा कोटा २७ चा आहे. 

तर आजच्या काही बातम्यांनुसार हाच मतांचा कोटा २६ ठरवला गेल्याचं कळतंय..

मात्र राज्यसभेच्या अनुभवानंतर कोणताही पक्ष आपला मतांचा कोटा काठावर ठेवणार नाही हेच चित्र आहे. प्रत्येक पक्ष आपला उमेदवार सुरक्षित करण्यासाठी हा कोटा ३० पर्यन्त वाढवू शकतो असाही अंदाज राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.

आता संख्याबळ बघूया,

शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४, काँग्रेसचे ४४ आमदार असं महाविकासआघाडी स्थापन होताना संख्याबळ होतं. 

मात्र त्यात आता अपडेटेड आकडेवारी पाहिल्यास, सेनेच्या एका आमदारचं निधन झालं तर राष्ट्रवादीने पंढरपुरची एक जागा गमावली दुसरीकडे अनिल देशमुख आणि नवाब मलिक असे २ जण तुरूंगात आहेत.  त्यामुळे सध्या सेनेकडे ५५ आमदार,राष्ट्रवादीचे ५१ आमदार आणि काँग्रेसचे ४४ आमदार असं संख्याबळ आहे. 

जसा राज्यसभेच्या निवडणूकीतला नियम असा आहे की प्रत्येक आमदार मतदान करताना आपली मतपत्रिका पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवतो. त्यामुळे इथे समजा क्रॉसव्हिटिंग झालं तर ते पक्षाच्या प्रतिनिधीला कळतं. 

पण विधानपरिषदेचं तसं नाही. 

इथे संपूर्ण मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने होते. त्यामुळे क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अस क्रॉस व्होटिंग झालं तर नेमका कोण फुटलं ? हे त्या पक्षाच्यादेखील लक्षात येत नाही. त्यामुळेच फक्त अपक्ष किंवा छोटेमोठे पक्षच नाहीत तर आपआपल्याच आमदारांच टेन्शन इथे प्रत्येक पक्षाला येतं..

एकनाथ खडसेंचा गेम कसा होऊ शकतो ? 

त्यासाठी राज्यात सद्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते समजून घेऊया. खडसेंच्या गेम होण्यासाठी आघाडीतील अंतर्गत कुरघोडीही कारणीभूत ठरू शकते. विधान परिषद निवडणुकीसाठी मतांचं गणित जुळवण्यासाठी सगळे पक्ष कामाला लागलीत. 

भाजप जसं अपक्षांची मनधरणी करायला लागलं आहे तसाच प्रयत्न महाविकास आघाडीतून सुरु आहे. त्यातल्या त्यात आघाडीतलेच पक्ष एकमेकांच्या समर्थक आमदारांच्या भेटी घेतायेत. 

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती. बहुजन विकास आघाडीची ही तीन मतं मिळवण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न सुरू आहेत.तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या रामराजेंनीसुद्धा हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती..

या मतांच्या पळवा-पळवीमध्ये शिवसेना कारणीभूत ठरतेय, कारण….

राज्यसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सेफ होते मात्र शिवसेनेचा एक उमेदवार पडल्याने शिवसेना आता पुन्हा तीच चूक करणार नाही.

विधानपरिषेदेत सेना सेफ गेम खेळत आहे. शिवसेनेचं एकही मत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या उमेदवारांना मिळणार नाही, त्याचबरोबर शिवसेना समर्थक अपक्ष उमेदवारांची मतंही शिवसेनेच्याच उमेदवारांना देण्याच्या भूमिकेत शिवसेना असल्याचे समजतंय. सेनेनं हात वर केलेत त्यामुळे राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवार अडचणीत सापडले आहेत अस चित्र आहे.

त्यामुळेच शिवसेनेचे २ अधिकृत उमेदवार निवडून आणल्यावरही सेनेकडे समर्थक अपक्ष आमदारांची जी मतं शिल्लक राहतात, त्याच मतांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी डोळा ठेवून आहे.

आमदार गीता जैन, मंजुळा गावित अशा शिवसेनेला समर्थन देणाऱ्या अपक्ष आमदारांना रामराजे नाईक-निंबाळकर, एकनाथ खडसे, भाई जगताप यांनी फोन केल्याची माहिती मिळतेय आणि त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संतप्त झाल्याच्या बातम्या देखील आल्या.

भाजपला त्यांचे ४ उमेदवार निवडून आणायचं टेन्शन नाहिये मात्र पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांनाही आम्ही आरामात निवडून आणू असा कॉन्फिडन्स भाजपच्या नेत्यांनी दाखवलाय. 

त्यात भाजप सोडून राष्ट्रवादीत आलेल्या खडसेंवर भाजपचा पर्सनल राग असणार. 

त्यामुळे काहीही करुन भाजप एकनाथ खडसे यांच्या विरोधात मोठा सापळा रचणार आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा, खडसेंना मिळणारी मतं फोडण्याचा भाजपने प्रणच घेतलाय अशी चर्चा चालू आहे. 

राष्ट्रवादी पक्ष तर अगोदर रामराजे नाईक निंबाळकर यांनाच सेफ करू शकतो कारण निंबाळकर हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, विधानपरिषदेचे सभापती आहेत, सुरुवातीपासूनच त्यांचं पक्षात महत्वाचं स्थान राहिलेलं आहे. त्यामुळे पक्षाला त्यांना निवडून आणणं भाग आहे. म्हणून पक्षाने त्यांना पहिला उमेदवार म्हणून उतरवलं आणि सुरक्षित कोटाही देऊ केल्याच सांगण्यात येतय.

मात्र प्रश्न उरतो खडसेंचा.. खडसे दोन नंबरचे उमेदवार आहेत. खडसेंना निवडून येण्यासाठी तीन ते चार मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

निवडून येण्यासाठी २७ मतांचा कोटा आहे. राष्टवादीकडे ५१ आमदार आहेत..तर रामराजे नाईक निंबाळकर यांना समजा ३० चा सुरक्षित कोटा दिला तर उरतात २१ मतं म्हणजेच खडसेंना अपक्षांच्या ७-८ मतांची गरज लागणार आहे. आणि इथेच भाजप खडसेंवर वचपा काढू शकते. कारण खडसेंना लागणारे ७-८ मतं भाजप आपल्याकडे वळवू शकते. त्यामुळे खडसे निवडून येण्याची शक्यता कमी होऊ शकते.

आता दुसरी एक बाजू बघितली तर, 

बराच मोठा काळ भाजपमध्ये घालवलेल्या खडसेंना मानणारा एक मोठा गट भाजपमध्ये असल्याने भाजपमधूनही क्रॉस व्होटिंग होऊ शकते. त्याचंच एक उदाहरण म्हणजे, भाजपचे आमदार संजय सावकारे. खडसे हे भाजपात असतांना संजय सावकारे यांना आमदार करण्यात एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा आहे. तेव्हापासून सावकारे यांना खडसेंचे निकटवर्तीय म्हणून संबोधले जाते त्यामुळे त्यांचं मत खडसेंना जाऊ शकतं असं बोललं जातंय.

थोडक्यात काय तर सगळा गेम सध्या अपक्ष आमदारांच्या हातात आहे.

राज्यसभेलाही या अपक्ष आमदारांनीच सेनेच्या उमेदवाराला पाडलं अस संजय राऊत बोलले होते अगदी नावासकट. मग आता तर गुप्त मतदान पद्धती आहे त्यामुळे अपक्षांसोबतच आपल्या पक्षांची मतं फोडण्यापासून कशी वाचवायची हा मोठा प्रश्न सगळ्या पक्षांसमोर आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.