राज्यसभेचा ड्रामा किरकोळ होता, खरी मज्जा तर विधानपरिषदेची येणाराय ती या कारणाने

पहाटेची शपथविधी, त्यानंतर महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेचा ड्रामा आपण पाहिला. त्यानंतर रात्रभर चाललेल्या राज्यसभेच्या निवडणूकीचा ड्रामा पहायला मिळाला. दुसऱ्या दिवशी संजय राऊत यांनी फुटलेल्या मतांची नावे देखील वाचून दाखवली.

हा सर्व ड्रामा ताजा आहे..

आत्ता राज्यसभेच्या निवडणूकीतला नियम असा की प्रत्येक आमदार मतदान करताना आपली मतपत्रिका पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवतो. त्यामुळे इथे समजा क्रॉसव्हिटिंग झालं तर ते पक्षाच्या प्रतिनिधीला कळतं. अशा वेळी ऑब्जेक्शन घेवून ते मत बाद देखील ठरवलं जातं किंवा संबंधित आमदारावर पक्षीय कारवाई देखील करता येते.

पण विधानपरिषदेचं तस नाही. इथे संपूर्ण मतदान प्रक्रिया गुप्त पद्धतीने होते. त्यामुळे कोण फुटला हे त्या पक्षाच्या देखील लक्षात येत नाही. त्यामुळेच फक्त अपक्ष किंवा छोटेमोठे पक्षच नाहीत तर आपल्याचं आमदारांच टेन्शन इथे प्रत्येक पक्षाला येत.

विधानपरिषदेची निवडणूक २० तारखेला होणार आहे..

यासाठी भाजपने ६, शिवसेना-२, राष्ट्रवादी-२, काँग्रेस-२ असे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे ही निवडणूक होणार हे तर पक्क झालय.. 

त्यासाठी या प्रश्नांची उत्तरं बघूया…

 • विधानपरिषद म्हणजे काय ? 
 • विधानपरिषदेची निवडणूक प्रक्रिया कशी असते? 
 • विधानपरिषदेवर निवडून जाण्यासाठीच्या आवश्यक मतांचा कोटा कसा ठरतो? 
 • विधानपरिषदेचे समीकरण कसे असणार आहे ?..

भारतातील घटक राज्यांमधील कायदेमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाला विधान परिषद म्हणतात. महाराष्ट्राच्या विधानपरीषदेत एकूण ७८ सदस्य आहेत. विधानसभेत एकूण २८८ आमदार आहेत. विधानपरिषदेच्या सदस्यांची संख्या ही त्या घटक राज्यातील विधानसभेच्या सदस्यसंख्येवरून ठरवली जाते.

 विधानपरिषदेत कोणकोणत्या घटकांचं प्रतिनिधित्व असतं ? 

 • विधान परिषदेतील ७८ पैकी ३१ सदस्य विधानसभेच्या आमदारांनी निवडून दिलेले असतात.
 • १२ सदस्य राज्यपाल नियुक्त असतात.
 • २१ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवडले जातात.
 • शिक्षक व पदवीधरमधून प्रत्येकी ७-७ सदस्य निवडून दिले जातात.

दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि त्या रिक्त जागी विधानपरिषदेची निवडणूक लागत असते.

यावेळी विधान परिषदेच्या एकूण १० जागा रिक्त आहेत. त्यासाठी २० जून ला मतदान होणार आहे, त्या १० जागांच्या निवडणुकीसाठी १२ उमेदवार उभे आहेत. म्हणजेच दोन अतिरिक्त उमेदवार मैदानात आहेत. भाजपने -६, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने प्रत्येकी २ उमेदवार उतरवले आहेत. 

दहाव्या जागेसाठी निवडणूक निश्चित समजली जात आहे. या जागेसाठी भाजपने ५ वे उमेदवार म्हणून प्रसाद लाड यांना तर काँग्रेसने भाई जगताप यांना उतरवलं आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढाई होणार आहे.

कोणकोणते उमेदवार मैदानात आहेत ? 

 • भाजप – प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे…तर यात पाचवे उमेदवार प्रसाद लाड आणि सहावे उमेदवार अपक्ष ज्यांना भाजपने पाठिंबा दिलाय ते म्हणजे सदाभाऊ खोत आहेत. 
 • राष्ट्रवादी – रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे.
 • शिवसेना -सचिन अहिर,आमश्या पाडवी.
 • काँग्रेस -भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे.

पक्षीय संख्याबळ बघूया…

विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला सध्या पहिल्या पसंतीक्रमांकाची २७ मतं आवश्यक आहेत. 

पक्षीय संख्याबळ पाहायचं झाल्यास, भाजपकडे स्वतःचे आणि मित्रपक्षांचे मिळून ११३ आमदारांचे संख्याबळ आहे. तर महाविकास आघाडीकडे एकूण १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यापैकी शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादीकडे ५४ आणि काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.

या संख्याबळानुसार भाजपचे ४, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे २ उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात मात्र काँग्रेसने २ उमेदवार उतरवले असले तरी त्यांचा १ च उमेदवार निवडून येऊ शकतो. मतांची आकडेवारी पाहता काँग्रेसकडे ४४ आमदार आहेत.

पक्षाच्या पहिल्या उमेदवाराला २७ मतं आरामात मिळतील मात्र काँग्रेसचा जो दुसरा उमेदवार आहे तो १० व्या जागेवर उभा केला गेलाय. पहिल्या उमेदवाराला २७ मतं देऊन १७ मतं शिल्लक राहतात, त्यामुळे काँग्रेसला आणखी १० मतांची गरज लागणार आहे. त्यासाठी पक्ष काय तयारी करतो ते दिसेलच

विधानपरिषदेच्या निवडणूकीतील मतदान प्रक्रिया कशी असते ?

विधानसभेतील आमदार हे थेट जनतेतून निवडले जातात मात्र विधान परिषदेतील आमदार निवडून देण्यासाठी विधानसभेतले आमदार मतदान करत असतात. 

सर्वात महत्वाचं म्हणजे राज्यसभेत मतदान प्रक्रियेत व्हीप जारी केला जातो, पक्षाच्या एजंटला मत दाखवावं लागतं मात्र विधानपरिषदेच्या मतदानात असं नसतं.

इथे व्हीप जारी केला जात नाही कारण येथील मतदान गुप्त पद्धतीने होत असते. 

यात मतदानासाठी पसंतीक्रमाची पद्धत वापरली जाते. निवडणुकीसाठी जेवढे उमेदवार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपल्या पसंतीक्रमानुसार मतदान करत असतात. सर्वात जास्त पसंती असणाऱ्यांना पहिला क्रम, दुसरी पसंती असणाऱ्याला दुसरा क्रम, तिसरी पसंती असणाऱ्याला तिसरा क्रम अशा पद्धतीने सर्व उमेदवारांना मतं दिली जातात.

 सर्वात महत्वाचं म्हणजे मतांचा कोटा कसा ठरतो ?

अनेक राजकीय जाणकार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा फॉर्म्युला (विधानपरिषदेतील एकूण जागा गुणिले १०० भागिले रिक्त जागा  + १ = जो भागाकार येईल त्याला अधिक १) असा आहे.

या प्रोसेस मध्ये पक्षाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार पक्ष स्वतः मतांचा एक कोटा निश्चित करतो निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसऱ्या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो.

निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही. आणि दोन उमेदवारांच्या सरळ लढतीत पहिल्या पसंतीच्या मतात जो पहिल्या क्रमांकावर राहतो त्याचा विजय जवळपास नक्की असतो. 

मतांचा कोटा पूर्ण नाही झाला तर दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. तरी कोटा पूर्ण नाही झाला तर पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते

आणखी एक म्हणजे, 

एखाद्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मतं ठरवलेल्या कोट्यापेक्षाही जास्त मिळाली तर त्याला सरप्लस मतं म्हणतात. ही सरप्लस मतं दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या उमेदवाराकडे हस्तांतरित करतात. मात्र दुसऱ्या पसंती क्रमांकाच्या उमेदवाराला देखील सरप्लस मतं मिळाली तर ती जे निवडून आलेले नाहीत त्या उमेदवारांकडे हस्तांतरित होतात तर ही होती विधानपरिषद निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया…

त्यामुळे विधानपरिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज १३ जूनला काय घडतय हे पाहणं महत्वाच असेल..

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.