त्यांचं डोकं कॉम्प्युटरपेक्षा जलद चालायचं, म्हणून लोक त्यांना ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणायचे !

दिग्दर्शक अनु कपूर आणि निर्माता रॉनी स्क्रूवाला यांचा नवीन पिक्चर येतोय. यात मुख्य भूमिकेत असणार आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री विद्या बालन. विद्या बालन आहे, म्हणजे पिक्चर जरा हटके असणार हे ओघानेच आलं.

तर पिक्चर असणार आहे शकुंतला देवी यांच्यावर. शकुंतला देवी ज्या ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जातात. तर जाणून घेऊयात कोण आहेत या शकुंतला देवी ज्यांनी विद्या बालनला आकर्षित केलंय.

कोण होत्या शकुंतला देवी…?

शकुंतला देवी या गणितातील आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेसाठी भारतातच नाही, तर जगभरात सुप्रसिद्ध होत्या. ४ नोव्हेंबर १९२९ रोजी बंगळूरू येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील सर्कशीत काम करत असत. घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने त्या आपलं शिक्षण देखील पूर्ण करू शकल्या नव्हत्या.

लहानपणापासूनच शकुंतला देवी गणितात अतिशय हुशार होत्या. त्यांची गणितातील बुद्धिमत्ता भल्या-भल्यांना थक्क करत असे. कितीही मोठं गणिती समीकरण असूद्यात शकुंतला देवी त्या चुटकीसरशी सोडवत असत. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी मैसूर विद्यापीठातील एका कार्यक्रमातून त्यांच्यातील ही प्रतिभा जगासमोर आली.

….आणि मग तो दिवस उजाडला जेव्हापासून त्या ‘ह्युमन कॉम्प्युटर’ म्हणून ओळखल्या जायला लागल्या..!

शकुंतला देवी गणिती समीकरणे सोडविण्यात कॉम्प्युटर पेक्षा देखील जलद होत्या. कॉम्प्युटरला ज्या गणिती क्रिया करायला १० सेकंदापेक्षा अधिक वेळ लागत असे, त्या क्रिया शकुंतला देवी त्यापेक्षा कमी वेळेत पार पाडत असत. १९७७ सालीच २०१ चा २३ व्या घाताची किंमत त्यांनी अवघ्या ५० सेकंदात काढली होती, जी काढायला त्या काळातील सर्वात जलद समजल्या जाणाऱ्या युनीव्हॅक कॉम्प्युटरला ६२ सेकंद लागले होते.

problems

त्यानंतर पुढे त्यांनी असाच एक कारनामा १९८० साली घडवला.

तारीख होती १८ जून १९८०. स्थळ- इम्पेरीअर कॉलेज, लंडन.  

शकुंतला देवी तोपर्यंत लंडनला आलेल्या होत्या आणि जगभरात त्यांच्या गणितातील बुद्धिमत्तेचा बोलबाला व्हायला लागला होता. १८ जून रोजी लंडनमधील इम्पेरीअर कॉलेजमध्ये त्यांनी दोन १३ अंकी संख्यांचा गुणाकार अवघ्या २८ सेकंदात केला. विशेष म्हणजे त्यासाठी त्यांनी कुठलाही कागद किंवा पेन वापरला नाही. त्यांच्या या कारनाम्याने जगभरातील लोक थक्क झाले.

शकुंतला देवी यांच्या या कारनाम्याची १९८२ साली ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने सुद्धा दखल घेतली होती.

शकुंतला देवींनी ‘फन विद नंबर्स’, ‘अॅस्ट्रोलॉजी फॉर यू’, ‘पजल टू पजल यू’, ‘मॅथाब्लिट’ यांसारखी पुस्तके देखील लिहिली. २१ एप्रिल २०१३ रोजी बंगळूरू येथे त्यांचं निधन झालं. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१४ साली, त्यांच्या ८४ व्या जयंतीचं औचित्य साधून गुगलने त्याचं डूडल बनवून त्यांना सन्मानित केलं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.