अलार्म काका साधे नव्हते. त्यांनी संजीव कुमार, सायराबानो यांना ॲक्टिंग शिकवली होती ..

उठा उठा पहाट झाली. मोती स्नानाची वेळ झाली.

गेल्या काही दिवाळीपासून हि जाहिरात आपण बघत आलोय, त्याच्यावर बनलेल्या मिमवर हसलोय, कधी कधी नकळत इमोशनल देखील झालोय. एका पिढी कडून पुढच्या पिढीकडे आपल्या परंपराचा वारसा सोपवला जातो याच खास उदाहरण म्हणजे हि जाहिरात.

आज या जाहिरातीचे फोटो इंटरनेटवर फिरत होते. मिम मुळे नाही तर एका दुःखद बातमीमुळे. यातले ते उठा उठा पहाट झालीची हाळी घालणारे गोड आजोबा म्हणजेच विद्याधर करमरकर आज गेले. 

सगळ्या महाराष्ट्रात अलार्म काका म्हणून फेमस असलेल्या विद्याधर करमरकर यांचं वय तब्बल ९६ वर्षांचं होतं.

फक्त हीच जाहिरात नाही तर पारले, टाटा एस, स्टार टीव्ही, सोनी टीव्ही अशा अनेक जाहिरातीत ते झळकले होते.  कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘गेम विथ अनुपम खेर’, ‘दोस्ती यारीयां मनमर्जिया’ , ‘सास बहू और सेन्सेक्स’, ‘लंच बॉक्स’, ‘एक थी डायन’, ‘एक व्हिलन अशा सिनेमांमधून देखील त्यांचा चेहरा ओळखीचा झाला होता.

पण आपल्या पैकी अनेकांना त्यांची संपूर्ण माहिती नाही.

विद्याधर करमरकर उर्फ आबा मूळचे मुंबईमधल्या पार्ल्याचे. तिथल्या पार्लेश्वर सोसायटीत त्यांनी हयात घालवली. अभिनयाची त्यांना लहानपणापासून आवड होती. बालपणी बालगंधर्वांची नाटके पाहून त्यांनी नाटकाकडे मोर्चा वळवला.

चाळीसच्या दशकात भावबंधन, पुण्य प्रभाव, खडाष्टक, जग काय म्हणेल, साष्टांग नमस्कार या नाटकात प्रमुख त्यांनी केल्या.

१९५५ तो १९६० साली जुहु आर्ट थिएटर या हिन्दी नाट्यसंस्थेत विद्याधर करमरकर यांनी दिवंगत अभिनेते बलराज सहानीबरोबर नाटकातून कामे केली व त्यांच्याच प्रेरणेमुळे कठपुतळी कला विद्याधर करमरकर यांनी जोपासली व वृध्दींगत केली.

जुन्या काळातील कठपूतळी या हिंदी चित्रपटातील प्रसिध्द गाणे “बोल रे कठ पुतळी बोले पिया संग नाचे” साठी नाचविलेल्या कठपुतळ्या विद्याधर करमकर यांनीच आपल्या हातांनी नाचवल्या तसेच स्वर्गिय राजकपूर व नर्गिस यांच्या प्रसिध्द “चोरी चोरी” चित्रपटातसुध्दा “जहाँ मै जाती हूँ वही चले आते हो” या गाण्यातील कठपुतळ्यांची कमाल सुध्दा विद्याधर करमकर यांचीच होती.

दिवंगत बलराज सहानी, राजकपूर, नर्गिस यांच्याशी आबांचे घरोब्याचे संबंध होते, ते सांगायचे मुंबईतील पहिलं “ॲक्टींग स्कूल” फिल्मालय स्टुडीओचे मालक कै. शशधर मुखर्जी यांच्या मालकीचे होते, तेथे आबांनी दिवंगत अभिनेते संजीवकुमार, सायराबानो यांना अभिनयाचे काही धडे दिले होते.

फक्त अभिनयच नाही तर विद्याधर करमरकर यांनी अनेक कादंबऱ्या देखील लिहिल्या.
हुतात्मा राजगुरू यांचे चरित्र असलेलं “समर्पण”, हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचे चरित्र असलेलं “क्रांतिरत्न”, “जाणता अजाणता”, “मन शुध्द तुझं” “मीलन” “पानिपत विश्वासाचे” अशी अनेक पुस्तके त्यांनी त्यांनी हातावेगळी केली.शिवाय विविध वर्तमानपत्रे, मासिके यांसाठी देखील ते नेहमी लिहायचे.

“सॅल्युट टू हुतात्मा राजगुरु” या मराठी चित्रपटासाठी आबांनी गीत लेखनदेखील केले होते.

कित्येक नाटके, टीव्ही मालिकांसाठी देखील त्यांनी लिखाण केलं. व्यावसायिक व हौशी नामवंत संस्थाची अनेक नाटके दिग्दर्शित केली. १९७५ ते १९८० “अजुनि चालतोचि वाट” या लेखक रंगनाथ कुलकर्णी लिखित नाटकाचे एकपात्री प्रयोग दिल्ली ते कन्याकुमारी पर्यंत केले. तसेच “दास बहू और सेन्सेक्स नावाची फारूख शेख, किरण
खेर व तनुश्री दत्ता या कलाकारांसोबत काम केले.

याशिवाय विद्याधर करमरकर आबांनी पन्नास जाहिरात पटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

विशेष म्हणजे हे सगळं त्यांनी आपली सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसमधली नोकरी सांभाळून केलं. दररोज तीन तास झोपून आपले छंद जोपासले. देशभरात  “इंडियन पपेट
थिएटर” च्या माध्यमातून भारतीय प्राचीन कलेच्या उत्क्रांती कार्यचं कार्य केलं. म्हणून त्यांना महाराष्ट्रात कठपुतळी कलेचे जनक म्हणून ओळखले जायचे.

कामाप्रती निष्ठा आणि धडपड त्यांची अखेरपर्यंत टिकून होती. वयाच्या नव्वदीतही अगदी तरुणांच्या उत्साहात ते काम करायचे. आज त्यांच्या निधनानंतर सगळे मोती साबणाची जाहिरात करत असले तरी आबांची या सत्तर ऐंशी वर्षांची धडपड आजवर अनेकांना ठाऊक नसते.

संदर्भ- meetkalakar.com इथे प्रसिद्ध झालेली विद्याधर करमरकर यांची मुलाखत

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.