मूर्तिजापूरच्या सुपुत्राने अमेरिकेच्या नाकावर टिच्चून भारताचा पहिला सुपर कंप्युटर बनवला.

११ ऑक्टोबर १९४६. विदर्भातील अकोला जिल्हा. मुर्तीजापूर तालुक्यातील मुरंबा नावाच अवघ ३०० लोकसंख्या असणारं गाव. गांधीजीनी खेड्याकडे चला हा दिलेला आदेश शिरसंवाद्य मानून गावात राहायला आलेल्या भटकर दांपत्याला मुलगा झाला. पेशाने दोघेही शिक्षक. इंग्रजांनी देश सोडून जाण्याची प्रक्रिया सुरु केली होती. या आनंदात मुलाचं नाव ठेवण्यात आलं,

“विजयानंद”

हाच मुलगा पुढ जाऊन जगभरात भारताचा विजयाचा झेंडा रोवणार होता.

विजय भटकरांच प्राथमिक शिक्षण गाडगेबाबांनी सुरु केलेल्या शाळेत झालं. रोज सकाळी आपल्या हाताने शाळा स्वच्छ करणाऱ्या गाडगेबाबांच्या विचारांचे संस्कार त्यांच्यावर झाले. आईवडील दोघेही शिक्षक होते पण सगळी हयात स्वातंत्र्यलढ्यात घालवल्यामुळे गडगंज संपत्ती कमवली नव्हती. पण मुलांना पुस्तकं रूपातल धन जरूर दिल. विशेषतः त्यांच्या आज्जीने विजय भटकर यांना अवांतर वाचनाची आवड लावली.

शाळेत हुशार असल्यामुळे अधले मधले वर्ग गाळून मोठ्या भावासोबतच शिक्षण पूर्ण केलं.

गणित आणि भौतिकशास्त्राची आवड होती म्हणून नागपूरच्या व्हीआयटीमध्ये इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगला प्रवेश घेतला. कॉलेजमध्ये असताना एकदा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना रेडियो ट्रांझिस्टरचे काही स्पेअरपार्टस दाखवले. पण रेडियो तयार करण्याची टेक्नोलॉजी तिथे कोणाला ठाऊक नव्हती. विजय भटकरनी आपल्या भावाच्या सोबत फक्त एका सोल्ड्रिग गनच्या जोरावर  ट्रांझिस्टर बनवून दाखवला.

पुढे घडणाऱ्या अनेक चमत्काराची ही नांदी होती.

चीन युद्धामुळे कॉलेजने ४ वर्षाचा कोर्स ३ वर्षात संपवायचा निर्णय घेतला. अवघ्या अठराव्या वर्षी विजय भटकर इंजिनियर झाले देखील. पुढच्या शिक्षणासाठी दिल्ली आयआयटीला आले. तिथेच त्यांनी आयुष्यातला पहिला संगणक पाहिला. सगळ्या अभियांत्रिकी शाखांना जोडणाऱ्या या संगणकाचाच अभ्यास करायचा हे त्यांनी त्याचदिवशी ठरवलं. पीएचडीसाठी तोच विषय निवडला.

ते जेव्हा पास आउटझाले तेव्हा त्यांच्या प्राध्यापकांनी त्यांना बोलावून घेतल. नोकरी साठी त्यांच्याकडे दोन पर्याय होते. एक त्याकाळच्या पद्धतीप्रमाणे आयआयटी पासआउट मुलांसाठी हात जोडून उभी असलेली अमेरिकेतील गलेलठ्ठ पगाराची नोकरी. याशिवाय भारत सरकारने नव्याने स्थापन केलेल्या इलेक्ट्रोनिक्स आयोगात त्यांची निवड झाली होती.

इलेक्ट्रोनिक्स आयोग हे होमी भाभांनी पाहिलेलं स्वप्न त्यांचे उत्तराधिकारी विक्रम साराभाई यांनी पूर्ण केलं होतं. त्यांना या आयोगासाठी भारतातले सर्वोत्तम संशोधक हवे होते आणि यासाठीच त्यांनी दिल्ली आयआयटीच्या शिक्षकांना विजय भटकर यांची मागणी केली. अखेर विजयनी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला.

भारतातील टेलिव्हिजन व इलेक्ट्रोनिक्स क्षेत्र अजून धुळाक्षरे गिरवत होते. लायसन्सराज असल्यामुळे परदेशातून कोणतेही उपकरण मागवायचे झाले तर शेकडो परवानग्या घ्याव्या लागत होत्या. भटकर यांनी यावर एक उपाय करायचा ठरवलं. जे लागतील ते उपकरण स्वतःच तयार करायचं. यातूनच त्यांना बरच काय शिकायला मिळालं. त्रिवेन्द्रममधल्या प्रयोगशाळेची जबाबदारी विजय भटकर यांच्याकडे देण्यात आली.

याच काळात त्यांची भेट डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी झाली.

त्रिवेन्द्रमच्या प्रयोगशाळेत लष्कराला लागणारे उपकरण, भारतीय बनावटीचे ब्लॅक अँड व्हाईट टेलिव्हिजन सेट अशा अनेक गोष्टींची निर्मिती केली.

दिल्लीत होणारे १९८२ सालचे आशियाड गेम्स म्हणजे भारतात होणारी एक क्रांतिकारी घटना होती. पंतप्रधानाचे सुपुत्र राजीव गांधी याच व्यवस्थापन पाहत होते. जगाने तोंडात बोटे घालावी असं नियोजन करायचं त्यांचा माणस होता. भारतातल्या कानाकोपऱ्यात हा खेळाचा उरूस त्याच्या उद्घाटनाचा रंगेबेरंगी कार्यक्रम दिसावा ही इंदिरा गांधीची इच्छा होती.

विजय भटकर यांनी प्रयत्नातून त्रिवेन्द्रम मध्ये भारतीय बनावटीचा पहिला कलर टीव्ही बनवला. एकविसाव्या शतकाच्या दिशेने हे भारताच पहिलं पाऊल मानलं गेल. वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्या हा चमत्कार पाहण्यासाठी त्रिवेन्द्रमला येऊन गेल्या, याच टीव्हीच्या निमित्ताने राजीव गांधी यांच्याशी भटकर यांची पहिली ओळख झाली.

पुढे इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. त्यावेळी पंतप्रधान कार्यालयाचे व त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षाप्रणाली अत्याधुनिक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला, ही जबाबदारी विजय भटकरांच्या कडे देण्यात आली. याच काळात त्यांची आणि राजीव गांधी यांची ओळख वाढत गेली होती.

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या नव्या पंतप्रधानाना तंत्रज्ञानाची आवड होती.

ते स्वतः संगणक वापरायचे. संगणक हेच भारताच आणि जगाच भविष्य आहे यावर त्यांचा विश्वास होता.

ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी रोनाल्ड रेगन यांच्या सरकारकडे  भारताच्या हवामानखात्यासाठी सुपरकंप्युटर विकत देण्याची मागणी केली. रोनाल्ड रेगन यांनी ही मागणी मान्य केली.

मात्र जेव्हा राजीवजी भारतात परत आले तेव्हा अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी आपला शब्द पाळला नाही.

त्यांच्या संरक्षण सल्लागाराने माहिती दिली होती की भारत अणुबॉम्बच्या वापराकरता हा महासंगणक वापरू शकतो. याच कारणामुळे हा करार रद्द करण्यात आला. भारताच्या पंतप्रधानानी हा वैयक्तिक अपमान समजला. त्याचक्षणी आपल्या देशात महासंगणक बनवायचा निर्णय त्यांनी घेतला.

विजय भटकर यांना याचसंदर्भात राजीव गांधीनी भेटायला बोलवले.

भटकर यांनी यापूर्वी महासंगणक कसा दिसतो हे पाहिलंही नव्हत. राजीवनां त्यांनी मोकळेपणाने सांगूनही टाकलं. पण असा संगणक भारतात बनवता येईल हेही सांगून टाकलं. पंतप्रधानानी यासाठी खर्च आणि लागणारा वेळ विचारला. भटकर म्हणाले,

“जेव्हढा वेळ आणि खर्च अमेरिकेतून महासंगणक भारतात आणण्यासाठी लागणार होता त्यापेक्षा निश्चितच कमी लागेल.”

राजीव गांधीना हा आत्मविश्वास आवडला. भटकर यांना पुण्यात सी.डॅक या संस्थेच्या स्थापना करून त्याचा अध्यक्ष बनवण्यात आलं. तीस कोटीचा निधी सोपवण्यात आला.

विजय भटकर यांच्या सोबत शेकडो इंजिनियर्स पुण्यात रात्रंदिवस राबत होते. मध्यंतरी सरकारे बदलली गेली. राजीव गांधी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून त्याला गुंडाळून टाकण्याचेही प्रयत्न झाले पण अनेक अडथळे पार करून तीन वर्षांनी हा सुपर कंप्युटर तयार झाला होता. त्याला नाव देण्यात आलं, परम-८०००.

फक्त भारतच नाही तर विकसनशील देशातला हा पहिला महासंगणक होता. अमेरिकेतल्या वर्तमानपत्रांनी या क्रांतिकारी घटनेची बातमी लावली होती. त्याचा मथळा होता,

“Denied supercomputer, Angry India does it!”

तोपर्यंत जगभरात भारताची इमेज रस्त्यावर फिरणारे हत्ती, गारुडी साप भिकारी अशीच होती. परम महासंगणकाने या इमेजला तडा दिला. विशेष म्हणजे निम्म्या खर्चात सर्वात विक्रमी वेळेत हा त्याकाळचा सर्वात अत्याधुनिक महासंगणक तयार झाला होता.

तरीही अनेक देशांना या यशाबद्दल खात्री नव्हती. तेव्हा विजय भटकर यांनी झुरीच मधल्या एका परिषदेमध्ये या सुपरकंप्युटरच प्रदर्शन करायचं ठरवलं. पण तिकडे न्यायचं कस हा प्रश्न होता. अखेर आपल्या सहकाऱ्यांच्या सुटकेसमध्ये स्पेअरपार्ट भरून हा महासंगणक स्वित्झर्लंडमध्ये नेण्यात आला आणि अमेरिकेच्या नाकावर टिच्चून त्याच प्रदर्शन करण्यात आलं. दुर्दैवाने हे पाहायला राजीव गांधी हयात नव्हते.

शंभर करोड भारतीयांचं स्वप्न साकारणारे आजही आपल्या योगदानाने देशाची सेवा करणारे विजय भटकर यांचा काहीच वर्षापूर्वी पद्मभूषण देऊन गौरव करण्यात आला.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.