मोरूची मावशीपासून ते जत्रातले कान्होळे, विजूमामांची कॉमेडी प्रत्येक पिढयांना हसवत राहिली

कधीकधी त्याच त्याच अतिरंजीत वेबसिरीज पाहून, तेच तेच सिनेमे बघून कंटाळा येतो. सध्या लाॅकडाऊनमध्ये माहोलच असा झालाय, की नकळत कधीकधी उदास व्हायला होतं. किंवा एरवीही कधी काही बिनसलेलं असताना काहीतरी विनोदी पाहण्याची खुप इच्छा असते. निराश झालेल्या मनामध्ये पुन्हा उत्साह आणायचा असतो. तेव्हा कित्येकदा युट्युबवर ‘श्रीमंत दामोदरपंत’ हे नाटक चालु करतो. या नाटकामध्ये भरत जाधव-विजय चव्हाण या जोडीने जी कमाल केलीय, त्याला तोड नाही.

या नाटकातला निखळ विनोद इतका अफलातुन आहे, की आपण प्रत्येक वाक्याला खळखळुन हसतो.

या नाटकात प्रमुख भुमिका भरत जाधवची असली तरीही सर्वात जास्त मजा आणलीय ती, विजय चव्हाण यांनी. सिनेमा, नाटक, मालिका अशा तिनही माध्यमातुन प्रेक्षकांना हसवणा-या विजय चव्हाण यांची आज पुण्यतिथी.

विजय चव्हाण हे नाव उच्चारताच, पहिल्यांदा डोळ्यासमोर येतं त्यांचं प्रचंड गाजलेलं ‘मोरुची मावशी’ हे नाटक. हे नाटक विजय चव्हाण यांना कसं मिळालं, याचाही एक किस्सा आहे.

सर्वप्रथम मुंबईतील ज्या गिरणगावात विजय चव्हाण यांच्या करियरच्या पाया रचला गेला, त्या प्रवासाकडे एक नजर वळवु..

विजय चव्हाण यांचा जन्म १९५५ सालचा. त्यांचं बालपण करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. गिरणगाव भागातुन पुढे केदार शिंदे, भरत जाधव, अंकुश चौधरी यांसारख्या माणसांची एक फळी मराठी इंडस्ट्रीला मिळाली. विजय चव्हाण यांनी पुढे रुपारेल महाविद्यालयातुन बी.ए. केलं. एकदा काॅलेजमधील नाटकात काम करणारा एक कलाकार आजारी पडला. त्या कलाकाराच्या जागी रिप्लेसमेंट म्हणुन विजय चव्हाण यांना नाटकात काम मिळाले.

काॅलेजमधुन त्यांनी काम केलेल्या पहिल्याच नाटकाची सर्वत्र चर्चा झाली. विजय चव्हाण यांच्या कामाचंही खुप कौतुक झालं. परंतु तरीही पूर्णवेळ अभिनयक्षेत्र निवडावं, असा त्यांनी विचार केला नव्हता. मध्यमवर्गीय कुटूंबाची पार्श्वभुमी असल्याने नोकरी करुन चार पैसे गाठीला बांधणं, हीच त्यांचीही इच्छा होती.

काॅलेज संपल्यावर त्यांनी मफतलाल मिलमध्ये नोकरी केली. नोकरी करुन स्वतःच्या कुटूंबाला आर्थिक आधार ते देत होते.

त्यावेळेस मिलतर्फे कामगार रंगभुमीवर नाटकांच्या स्पर्धा होत असत. काॅलेजच्या काळात नाटकांशी संबंध आल्याने त्यांनी कामगार रंगभुमीवर होणा-या या स्पर्धांमध्ये सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली. एकदा विजय चव्हाण आणि इतर मंडळींनी स्पर्धेसाठी ‘मोरुची मावशी’ हे नाटक बसवायचं ठरवलं. मावशीची भुमिका विजय चव्हाण साकारली.

विजय चव्हाण यांनी साकारलेल्या मावशीचं कामगार रंगभुमीसारख्या प्रायोगिक व्यासपीठावर प्रचंड कौतुक झालं.

विजय कदम आणि विजय चव्हाण हे एकमेकांचे क्लासमेट्स. दोघांनी मिळुन ‘रंगतरंग’ हि नाट्यसंस्था सुरु केली. ‘सायलेन्स खटला चालु आहे’ यांसारख्या विविध विषयांवरच्या एकांकिका नाट्यसंस्थेतर्फे बसवल्या गेल्या. यादरम्यान विजय चव्हाण यांची मराठीतल्या एका सुपरस्टारशी ओळख झाली.

हा सुपरस्टार म्हणजे आपल्या सर्वांचा लाडका लक्ष्या.. अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे.

पुरुषोत्तम बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मोठे भाऊ. पुरुषोत्तम बेर्डे यांनी ‘टूरटूर’ नाटकातील कलाकारांची जेव्हा मोट बांधायला सुरुवात केली, तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंनी पुरुषोत्तमला विजय चव्हाण हे नाव सुचवले. अशाप्रकारे ‘टूरटूर’ नाटकाच्या माध्यमातुन विजय चव्हाण यांचा व्यावसायिक रंगभुमीवर प्रवेश झाला.

याच दरम्यान १९८५ सालच्या ‘वहिनीची माया’ या सिनेमातुन विजय चव्हाण यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. दादा कोंडकेंपासुन, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, प्रशांत दामले, दिलीप प्रभावळकर, भरत जाधव यांसारख्या अनेक कलाकारांसोबत विजय चव्हाण यांची जोडी जमली.

विजय चव्हाण यांच्या अभिनय कारकीर्दीत सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे ‘मोरुची मावशी’.

आचार्य अत्रे लिखित हे नाटक सर्वप्रथम १ मे १९६३ रोजी मुंबईतील बिर्ला सभागृहात सादर झाले होते. बापुराव माने हे अभिनेते यात मावशी साकारायचे. काही वर्षांनी ‘सुयोग’ नाट्यसंस्थेने ‘मोरुची मावशी’ नव्याने रंगभुमीवर आणण्याची योजना केली.

मावशीची भुमिका लक्ष्मीकांत बेर्डे यांनी करावी, अशी ‘सुयोग’चे सुधीर भट यांची इच्छा होती. त्यामुळे नाटकासंदर्भात बोलणी करण्यासाठी सुधीर भट लक्ष्मीकांत बेर्डेंना भेटायला गेले. कामगार रंगभुमीवर जेव्हा विजय चव्हाण ‘मोरुची मावशी’ करायचे, तेव्हा लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांचं काम पाहिलं होतं. म्हणुन लक्ष्याने, सुधीर भटांना विजय चव्हाण यांचं नाव सुचवलं.

विजय चव्हाण यांचं ‘हयवदन’ नाटकातील काम सुधीर भटांना आवडलं होतं. पुढे ‘मोरुची मावशी’ साठी विजय चव्हाण यांचं नाव पक्क करण्यात आलं.

विजय चव्हाण यांनी रंगवलेली मोरुची मावशी रंगभुमीवर प्रचंड गाजली. मावशीच्या भुमिकेत साडी नेसुन विजय चव्हाण यांनी ‘टांग टिंग टिंगा’ या गाण्यावर केलेला डान्स तर प्रेक्षक विसरुच शकत नाहीत. आजही रसिकप्रेक्षकांकडून हे नाटक युट्यूबवर पुन्हा पुन्हा पाहिलं जातं.

विजय चव्हाण यांनी मराठी सिनेमांमध्ये सुद्धा स्वतःची छाप पाडली. जत्रा मधला शहरी घरमालक ‘कान्होळे’ आणि गावातला ‘कान्होळे’, हा डबल रोल विजय चव्हाण यांनी उत्कृष्ट रंगवलाय. ‘पछाडलेला’ सिनेमात एक डोळा बारीक करुन ‘मालक, मालक’ म्हणुन इनामदारची पाठ न सोडणारा किरकिरे, हि सुद्धा विजय चव्हाण यांच्या कारकीर्दीतली एक वेगळी भुमिका.

विजय चव्हाण यांनी शेवटपर्यंत कधी फोन वापरला नाही.

अनेक निर्माते सिनेमा, नाटकांच्या संबंधी चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरीच फोन करायचे. असं असलं तरी, वर्षाचे ३६५ दिवस विजय चव्हाण शूटींगमध्ये व्यस्त असायचे. जवळपास ४०० सिनेमांमध्ये त्यांनी भुमिका केल्या आहेत. ‘सिनेमांमुळे नाटकांकडे दुर्लक्ष झालं’ ही खंत त्यांनी व्यक्त केली होती.

फुफ्फुसांच्या आजारामुळे २०१८ साली विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड गेले. कुठलाही अंगविक्षेप न करता उत्कृष्ट टायमिंगने विनोदनिर्मिती करणारे विजू मामा, सदैव रसिकप्रेक्षकांच्या मनात त्यांच्या भुमिकांमुळे अजरामर राहतील.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.