जे भल्याभल्यांना जमलं नाही, ते बारक्या हिमाचल प्रदेशच्या टीमनं करुन दाखवलंय

एक काळ होता जेव्हा स्टीव्ह वॉ, रिकी पॉन्टिंग यांच्या ऑस्ट्रेलियन टीमची खुंखार दहशत होती. त्यांची टीम इतकी डेंजर होती, की त्यांच्याशी मॅच आहे म्हणल्यावर आपण हरणार हे डोक्यात नक्की होऊन जायचं. तशीच दहशत भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये तमिळनाडू टीमची आहे. बरं रेड बॉल क्रिकेटमध्ये हे जरा तरी निवांत घेतील, पण व्हाईट बॉल क्रिकेट म्हणलं की तमिळनाडू म्हणजे ‘दादा टीम.’

आकडेवारी सांगायची झाली, तर २०१९-२० च्या सईद मुश्ताक अली स्पर्धेत तमिळनाडू फायनलपर्यंत गेली. तिथं हरल्याचा वचपा त्यांनी सलग दोन सईद मुश्ताक अली स्पर्धा जिंकून काढला. यंदाच्या स्पर्धेत तर फायनल पार शेवटच्या बॉलपर्यंत गेली, पण तमिळनाडूनं ट्रॉफीवर कब्जा केलाच. त्यांचा फॉर्म पाहता विजय हजारे ट्रॉफीमध्ये तेच कप घेऊन जाणार हे जवळपास नक्कीच मानलं जात होतं. 

त्यात फायनलमध्ये त्यांच्या समोर होती हिमाचल प्रदेशची टीम. आजपर्यंत हिमाचल प्रदेशच्या नावावर एकही डोमेस्टिक विजेतेपद नव्हतं. त्यांच्या टीममध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला फक्त एकच कार्यकर्ता होता, तो म्हणजे कॅप्टन रिषी धवन. त्यामुळं मॅचच्या आधी कुणी हिमाचल प्रदेश जिंकेल असा अंदाज बांधला असता, तर लोकांनी येड्यात काढलं असतं. पण येडी लोकंच इतिहास घडवतात.

सगळ्या स्पर्धेत जबरदस्त खेळणाऱ्या हिमाचल प्रदेशसाठी विजेतेपद फक्त एक पाऊल दूर होतं. त्यात फायनलच्या दिवशी टॉसचा कौलही त्यांच्याच बाजूनं लागला. तमिळनाडूचा आधारस्तंभ असणारा बाबा अपराजित पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला आणि हिमाचलच्या तंबूत उत्साह संचारला. नारायण जगदीशन, साई किशोर, मुरुगन अश्विन असे तीन गडीही एका मागोमाग एक करत आऊट झाले. सुपरपॉवर तमिळनाडूची अवस्था ४ आऊट ४० अशी झाली.

सगळ्यांना वाटलं, आजचा दिवस हिमाचल प्रदेशचा.

पण अशा प्रेशर सिच्युएशन्समधून बाहेर येण्याचा अनुभव तमिळनाडूकडे एकदम पद्धतशीरपणे आहे. त्यात क्रीझवर होता, अनुभवी दिनेश कार्तिक आणि त्याच्या जोडीला स्फोटक बाबा इंद्रजित. दिनेश कार्तिकच्या बॅटला तर रन्सचा झराच लागला. त्यानं ४८ बॉल्समध्ये निवांत फिफ्टी केली. पुढं त्यानं हिमाचलच्या बॉलर्सचा आणखी बाजार उठवला आणि दणक्यात सेंच्युरीही लावली, तेही फक्त ९६ बॉल्समध्ये. एका बाजूनं कार्तिक होता, तर दुसऱ्या बाजूनं इंद्रजित. त्यानंही फिफ्टी पूर्ण केली. या जोडीनं पाचव्या विकेटसाठी २०२ रन्सची पार्टनरशिप केली. मात्र ही जोडी लागोपाठच्या ओव्हरमध्ये आऊट झाली आणि हिमाचलनं सुटकेचा निश्वास सोडला.

हे कमी की काय म्हणत, फॉर्ममध्ये असलेल्या शाहरुख खाननं २१ बॉलमध्ये ३ सिक्स आणि ३ फोर चोपल्या आणि बोर्डावर लावले ४२ रन्स. नशिबानं तमिळनाडूची शेपूट फारशी वळवळली नाही आणि तरी त्यांनी ३१४ रन्स केलेच.

आव्हानाचा डोंगर चढायला गेलेल्या हिमाचल प्रदेशचा डाव सावरला, तो सलामीवीर शुभम अरोरामुळं. त्यानं खिंड लावून धरली, पण दुसऱ्या बाजूला विकेट पडत गेल्या. बोर्डावर ९६ रन्स लागलेले असताना त्यांच्या चार विकेट्स पडल्या. मॅच गेलीच असं वाटत असताना, अमित कुमारनं शुभमला साथ दिली. शुभमनं कडकडीत शतक मारलं आणि अमितनं हाफ सेंच्युरी. त्यांच्या १४८ रन्सच्या पार्टनरशिपमुळे हिमाचलनं २४४ रन्सपर्यंत मजल मारली.

क्रीझवर आलेल्या कॅप्टन रिषी धवननं आक्रमक सुरुवात केली आणि २३ बॉल्समध्येच नॉटआऊट ४२ रन्स मारले. स्कोअर पोचला २९९ वर. पुढच्या १५ बॉलमध्ये १६ रन्सचं आव्हान हिमाचलसमोर होतं. नेमकं खराब उजेडामुळं अम्पायर्सनी खेळ थांबवला. पण व्हीजेडी मेथडनुसार हिमाचल विजयी ठरलं आणि इतिहास घडला.

वरकरणी ही लय साधी मॅच वाटेल, पण या मॅचमधली भारी गोष्ट म्हणजे हिमाचलचा विजय. भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हिमाचलला अंडरडॉग्स म्हणून गणलं जायचं, त्यांची भीती वाटावी अशीही ती टीम नव्हती. मात्र तरीही त्यांनी डायरेक्ट कप मारला. सोबतच भल्याभल्यांना जमलं नाही पण तमिळनाडूसारख्या वस्ताद टीमला अस्मानही दाखवलं.

छोट्याश्या राज्याच्या टीमनं मोठा किस्सा घडवलाय, हे आता कायम लक्षात राहील हे नक्की.

हे ही वाच भिडू:

WebTitle : vijay hazare trophy 2021 himachal created history in vht beating domestic giant tamilnadu

Leave A Reply

Your email address will not be published.