महाराष्ट्राचा पाटील थेट काश्मीरमध्ये खासदारकी लढवण्यासाठी उतरला

आणिबाणी नंतर आलेल्या जनता पक्षाच्या लाटेत संपूर्ण काँग्रेस धूळदाण उडाली. १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकात खुद्द इंदिरा गांधी पडल्या. संजय गांधींना देखील आपली सीट वाचवता आली नाही. भले भले नेते आपटले. काँग्रेसचे जे काही मोजके खासदार निवडून आले होते त्यात एक नाव होतं,

विजयकुमार नवल पाटील

फक्त ३५ वर्षांच्या या तरुणाने धुळे लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी बाकांवर गेली होती. नव्याने पंतप्रधान बनलेल्या मोरारजी देसाई यांनी इंदिरा गांधी यांना आणीबाणीच्या काळात घडलेल्या अत्याचाराबद्दल प्रमुख आरोपी पकडलं.

नवीन सरकार हे इंदिरा गांधींच्या विरुद्ध हात धुवून मागे लागले होते. पण संसदेत या आरोपांना उत्तर देण्यासाठी इंदिरा गांधी किंवा संजय गांधी हजर नव्हत्या. अनेक काँग्रेसचे जेष्ठ नेते देखील मूग गिळून गप्प असायचे.

अशा वेळी हि जबाबदारी उचलली काँग्रेसच्या तरुण खासदारांनी. विरोधी बाकांवर बसून कोणत्याही प्रश्नांना आवेशात उत्तरे देणाऱ्या खासदारांना फायटिंग ब्रिगेड असं म्हटलं जायचं. यात विजय नवल पाटील देखील आघाडीवर होते.

पुढे इंदिरा गांधींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवावी याची काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मागणी सुरु झाली.

२४ अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात जेष्ठ कार्यकर्त्यांची मिटिंग झाली. तिथे सुरु असलेली भाषणे ऐकून इंदिरा गांधींना वाटले की हे कार्यकर्ते  देवकांत बरुआ यांच्याप्रमाणे आपली खुशमस्करी करत आहेत. त्यांनी तसे बोलून देखील दाखवले.

अचानक विजय नवल पाटील उठले आणि म्हणाले,

“मॅडम आमची तुलना देवकांत बारुआ यांच्या बरोबर करू नका. ते पंतप्रधान इंदिरा गांधींचे चाहते होते, आम्ही इंदिरा गांधी या व्यक्तीचे चाहते आहोत.”

तिथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

अखेर इंदिरा गांधींनी चिकमंगळूर येथून लोकसभा निवडणूक लढवण्यास संमती दिली. तिथून त्या निवडून देखील आल्या.

इंदिरा गांधी लोकसभेत परतल्यावर सत्ताधारी आणखी चवताळले, त्यांनी इंदिराजींच्या वरील कारवाई तीव्र केली. एकदा तर त्यांना तीस हजारी कोर्टात हजर राहणायची नोटीस देण्यात आली. तेव्हा विजय नवल पाटील व इतर खासदारांनी इंदिराजींना रोखून धरले. बाहेर कोर्टाच्या मार्गावर जनतेची प्रचंड गर्दी झाली होती.

इंदिराजींच्या अटकेच्या निषेधार्थ लोकसभेत विजयकुमार पाटील, वसंत साठे, सरोज खोपडे व इतर तेरा खासदारांनी उपोषण केले ज्याची प्रसिद्धी देशभरात झाली.

याकाळात विजय नवल पाटील हे इंदिरा गांधी व संजय गांधी यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जाऊ लागले.

१९७८ साली जेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या सह महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी इंदिरा गांधींची साथ सोडून अर्स काँग्रेसमध्ये प्रवेश करायचं ठरवलं तेव्हा विजय नवल पाटील यांच्यापुढे द्वंद्व निर्माण झाले. त्यांनी या दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला . पण यशवंतराव चव्हाण यांनी सांगितलं,

“विजय तू अजून लहान आहेस. दिल्लीतील राजकारण तुला कळत नाही.”

अखेर विजय नवल पाटील यांनी विचार केला. धुळ्याचे दुसरे खासदार सुरूपसिंग नाईक यांच्यासह त्यांनी आय काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशामुळे यशवंतराव चव्हाणांचे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते पद जाऊन आय काँग्रेसच्या सी.एम.स्टीफन यांना मिळाले.

या कृतीमुळे ते इंदिरा गांधींच्या खास वर्तुळात जाऊन पोहचले.

पुढे जेव्हा काँग्रेस पुन्हा सत्तेत आली इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या तेव्हा विजयकुमार नवल पाटलांना केंद्रात मंत्रीपद देखील देण्यात आले.

संपूर्ण देशाचे चित्र त्यानंतर बदलले. जनता पक्षाची लाट ओसरली. राज्यात देखील काँग्रेसचे सरकार परतले. काँग्रेस सोडून गेलेले मोठमोठे नेते पुन्हा पक्षात परतू लागले. पण संकट काळात जे नेते पक्षाच्या पाठीशी राहिले त्यांनाच पद द्यायचं असं इंदिरा गांधींचे धोरण होतं त्यानुसार ए.आर.अंतुले यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवण्यात आलं.

अंतुले यांच्या मागे लोकसंग्रह नव्हता. कित्येक आमदार देखील त्यांच्या पाठीशी नव्हते. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी मराठा माणूसच असावा असा आग्रह धरला. एकदा तर लोकनेते वसंतदादा पाटील विजय नवल पाटलांना म्हणाले,

“विजय तुझ्या इंदिरा गांधींना सांग हा पाटील मुख्यमंत्री झाला पाहिजे.”

विजय नवल पाटील जेव्हा दिल्लीला परतले तेव्हा त्यांनी संजय गांधी यांना हे सांगितलं. तेव्हा संजय गांधी म्हणाले,

“अगर पाटील को ही मुख्यमंत्री बनाना है तो हमारे पास विजय नवल पाटील यंग मराठा है.”

पुढे संजय गांधी यांचे अपघाती निधन झाले. त्याच्या पाठोपाठ काही वर्षात इंदिरा गांधी यांची हत्या झाली.

विजय पाटील सांगतात कि इंदिरा गांधींच्या मनात त्यांना मुख्यमंत्री करायचं होतं, त्यानुसार राज्याच्या राजकारणात लक्ष घालण्याबद्दल देखील त्यांनी पाटील यांना सांगितलं होत.

इंदिराजींच्या मृत्यू नंतर काँग्रेसची धुरा राजीव गांधींच्या कडे आली. संजय गांधी ब्रिगेड म्हणून ओळखले जाणारे नेते त्यांच्या देखील पाठीशी उभे राहिले. राजीव गांधी देखील विजय नवल पाटलांना आपल्या अत्यंत विश्वासाचे समजायचे.

साधारण १९८९ सालाच्या दरम्यान काश्मीर मधील परिस्थिती हळूहळू चिघळण्यास सुरवात झाली होती. तिथल्या फुटीरतावादी संघटनांनी डोके वर काढले होते. काश्मिरी पंडितांवर अत्याचार वाढले होते.

त्यावर्षीच्या काश्मीरमधल्या लोकसभा निवडणुका अत्यंत संवेदनशील समजल्या गेल्या. उमेदवारांना अतिरेक्यांकडून अपहरणाच्या धमक्या येऊ लागल्या होत्या.

काँग्रेसचे तिकीट कोणाला द्यावे यावरून अनेक वाद सुरु होते. अखेर राजीव गांधींनी महाराष्ट्राच्या विजयकुमार नवल पाटील यांना थेट दक्षिण काश्मीर येथून खासदारकी लढवण्याचे आदेश दिले.

विजयकुमार पाटलांनी देखील पक्षाच्या आदेशाचे पालन करत काश्मीर मधल्या स्फोटक परिस्थितीमध्ये ही निवडणूक लढवण्याचा शिवधनुष्य उचलले.

त्यांच्याविरुद्ध अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सतर्फे प्यारेलाल हांडू उभे होते. दोघांच्यात जोरदार टक्कर झाली. पण खूप प्रयत्न करूनही विजयकुमार पाटील यांना काश्मीर जिंकता आले नाही.

एक मराठी माणूस काश्मीरमध्ये निवडणूक लढवतो हीच त्याकाळची मोठी गोष्ट होती. पुढे विजयकुमार पाटील आपल्या एरंडोल मतदारसंघात परतले. आजही महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य करणारे म्हणून विजयकुमार पाटील यांना ओळखले जाते.

आज राजीव गांधी नाहीत, विजयकुमार नवल पाटील यांची पुढची पिढी देखील काँग्रेस मध्ये नाही. पण पक्षादेशावर आपला हक्काचा मतदारसंघ सोडून काश्मीर सारख्या धोकादायक ठिकाणी निवडणूक लढवणारा नेता म्हणून काँग्रेसमध्ये त्यांचं उदाहरण हमखास दिल जातं.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.