भारतीय क्रिकेटमध्ये वशिलेबाजीच उदाहरण म्हणून त्यांचं नाव घेतलं जायचं..
अगदी गल्लीपासून दिल्ली पर्यंत क्रिकेटमध्ये वशिलेबाजीची चर्चा होत असते. फक्त भारतातच नाही तर जगभरात सिलेक्शन कमिटीच्या फेव्हरमधल्या खेळाडूंना चान्स मिळतो असे आरोप होत असतात. पण क्रिकेट हा परफॉर्मन्सचा खेळ असल्यामुळे बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल अशी स्थिती असते. तुम्ही चांगली कामगिरी केली नाही तर अगदी ब्रम्हदेवाचा असला तरी फार काळ संधी मिळत नाही. खुद्द सुनिल गावस्कर यांच्या मुलाला देखील टीम इंडियामध्ये फार वेळ चान्स मिळाला नव्हता.
पण एक माणूस याला अपवाद होता. त्याच नाव विजय मेहरा
१९५५ सालची गोष्ट. न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येणार होती. त्याकाळात क्रिकेट सामने फारच कमी प्रमाणात व्हायचे. अशा वेळी एखाद्या परदेशी टीमचा दौरा खूप महत्वाचा मानला जायचा. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं कमी खेळलं जात असल्यामुळे नवीन क्रिकेटर्सना संधी फारच कमी वेळा मिळायची. अनेक मोठमोठ्या खेळाडूंना त्यांच्या करियरच्या शेवटी शेवटी भारताच्या टीममध्ये जाता आलं होतं.
भारताचे माजी कप्तान लाला अमरनाथ निवृत्त झाल्यावर भारतीय टीमचे मॅनेजर झाले. त्यांनी हि परिस्थिती बदलायचं ठरवलं. अनेक तरुण खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यात उतरवलं. यातच एक होते विजय मेहरा.
क्रिकेट प्रेमींसाठी हे नाव नवीन होतं. अगदी फर्स्ट क्लास मध्ये देखील विजय मेहरा यांनी मोजकेच सामने खेळले होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विजय मेहरा यांचं वय फक्त १७ वर्षे इतकं होतं.
विजय लक्ष्मण मेहरा यांचा जन्म १२ मार्च १९३८ सालचा. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये लहानाचे मोठे झाले. विजय मेहरा यांना सुरवाती पासून क्रिकेटची आवड होती. खेळायचे देखील चांगले. अमृतसरमध्ये अगदी कमी वयात चांगलं नाव केलं. एकदा कॉमनवेल्थ टीम भारत दौऱ्यावर आली होती. त्यांनी अनेक छोट्या शहरांमध्ये जाऊन सामने खेळले होते. असाच एक सामना अमृतसरमध्ये देखील खेळण्यात आला होता.
१५ वर्षांच्या विजय मेहरा यांना या सामन्यात संधी मिळाली होती. पीटर लोडर फ्रॅंक वॉरेल सॅम लोक्स्टन अशी तगडी बॉलिंग होती. खालच्या फळीत खेळणाऱ्या विजय मेहरा यांनी पहिल्या डावात १४ आणि दुसऱ्या डावात १७ धाव काढल्या. हि कामगिरी देखील कौतुकास्पद होती असं बोललं गेल. त्याच्याच जीवावर त्यांना पंजाबच्या रणजी टीममध्ये घेतलं गेलं.
रणजीचा पहिला सिझन मेहरा यांच्यासाठी चांगला गेला. त्यांनी २३० धावा काढल्या यात दोन अर्ध शतके देखील होती. त्यांचं ऍव्हरेज होतं ५७.५०. या कामगिरी मुळे ते लाला अमरनाथ यांच्या नजरेत भरले. अमरनाथ यांनी युथ पॉलिसी अंतर्गत त्यांना थेट राष्ट्रीय टीममध्ये निवडलं.
यात फक्त विजय मेहरा नव्हते तर सदाशिव पाटील, नरी कॉन्ट्रॅक्टर, चंद्रकांत पाटणकर, बापू नाडकर्णी, जी सुंदरम असे कित्येक नवीन खेळाडू आले होते. पण त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बराच काळ चांगली कामगिरी केली होती. पण विजय मेहरा सारखा फक्त सोळा सतरा वर्षांचा मुलगा थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर उतरणार म्हणजे चमत्कारच होता.
लाला अमरनाथ सुद्धा पंजाबचे असल्यामुळे त्यांनी मेहरा यांना निवडलं आहे अशी चर्चा झाली. त्यांना अमरनाथ यांचा वंडरबॉय असं देखील चेष्टेने संबोधण्यात आलं.
न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची टीम मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळायला उतरली तेव्हा त्यात पॉली उम्रीगर, विजय मांजरेकर, पंकज रॉय, विनू मंकड असे अनेक दिग्गज खेळाडू होते. विनू मंकड यांच्या सोबत ओपनिंग करायला १७ वर्षे २६५ दिवस वय असणारे विजय मेहरा उतरले.
भारतातर्फे कसोटी खेळणारे सर्वात लहान वयाचे खेळाडू म्हणून त्यांनी विक्रम केला होता जो पुढे जाऊन सचिन तेंडुलकरने मोडला.
पण सचिन प्रमाणे विजय मेहरा यांना चमकदार कामगिरी करता आली नाही. विनू मंकड यांनी त्या दिवशी २३६ धावा काढल्या आणि मेहरा फक्त १० धावांवर आउट झाले. न्यूझीलन्डच्या फास्ट बॉलिंगला तोंड देणे मेहरा यांना शक्य झाले नाही. पुढच्या मॅचमध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली. यावेळी त्यांनी आश्वासक सुरवात केली पण फक्त ३६ धावांवरच आऊट झाले.
त्यानंतर मात्र त्यांच्यावर आणि लाला अमरनाथ यांच्यावर जोरदार टीका झाली. अमरनाथ यांचे जोडे उचलतो म्हणून विजय मेहराला राष्ट्रीय टीममध्ये संधी मिळते असं बोललं गेलं.
अखेर विजय मेहरा यांना टीम बाहेर करण्यात आलं. फर्स्ट क्लासमध्ये कष्ट करून पुन्हा यावं असं त्यांना सांगण्यात आलं.
यानंतर, १९६१-६२ साली कलकत्ता येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने पुनरागमन केले. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात, अंगठा मोडलेला असूनही विजय मेहराने धैर्याने फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने संघासाठी सर्वाधिक 62 धावांची खेळी केली. अंगठा दुखापतीमुळे विजय मेहरा दुसर्या डावात फलंदाजीसाठी ११ व्या क्रमांकावर आला. हा सामना भारताने १८७ धावांनी जिंकला.
पुढे अनेकदा ते टीमच्या आतबाहेर करत राहिले. आपल्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ८ कसोटी सामने खेळले आणि एकूण ३२९ धावा काढल्या. यात दोन अर्धशतकांचा समावेश होता. प्रतिभा नसूनही फक्त लाला अमरनाथ यांच्या कृपेमुळे वशिल्यामुळे मेहरा यांना वारंवार सुवर्णसंधी मिळत गेली पण कधीही त्याचा फायदा त्यांना करून घेता आला नाही.
असं म्हणतात कि पुढे निवृत्तीनंतर ते निवड समितीचे सदस्य झाले. तेव्हा रमाकांत देसाई नावाचे दुसरे सदस्य फटकळपणे त्यांना म्हणाले होते,
“तुझी भारताच्या टीममध्ये निवड होणं कठीण होतं, आता तूच निवड समितीत आहेस.”
हे ही वाच भिडू.