सिंचन घोटाळा बाहेर काढणारे विजय पांढरे सध्या काय करतात..?

साल होतं २०१२. गणेशोत्सव सुरु होता. अण्णा हजारेंच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या आंदोलनामुळे गाजलेला काळ. आदर्श घोटाळा पाठोपाठ टू जी स्कॅम, कोळसा घोटाळा यामुळे काँग्रेस सरकार बेजार झालं होतं. अशातच राज्यात एक नवीन बॉम्ब येऊन कोसळला.

सिंचन घोटाळा.

झालं असं होतं की विजय पांढरे नावाच्या एका सरकारी जल अभियंत्याने मुख्यमंत्री आणि राज्यपालांना पत्र पाठवले होते व त्यात राज्यात गेल्या दहा वर्षांच्या काळात राजकीय नेते, ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी यांच्या साखळीमुळे सिंचनाच्या कामावर खर्ची पडलेल्या एकूण निधीपैकी तब्बल ३५ हजार कोटींचा निधी पाण्यात गेल्याचा आरोप केला होता.  हजारो कोटी रुपये खर्च होऊनही गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या सिंचनक्षमतेत झालेली वाढ ०.०१ टक्के इतकी कमी असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

हे पत्र मीडिया मध्ये लीक झाले आणि या लेटरबॉम्ब मुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली. आधीच भ्रष्टाचार व घोटाळ्याच्या आरोपामुळे नाजूक बनलेली सरकारची स्थिती आणखी हलाखीची बनली. पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंत्याने केलेले आरोप गांभीर्याने घेतले गेले.

या सगळ्या आरोपांचा मुख्य रोख तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे होता.

१९९९ ते २००९ या काळामध्ये जलसंपदा मंत्री असताना २० हजार कोटी रुपये खर्चाचे ३८ प्रकल्प मंजूर केले होते. त्यासाठी विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे नियम बाजूला सारून प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आणि तरीही सिंचनाखाली असणाऱ्या जमिनीचे क्षेत्र वाढले नाही, असा पांढरे यांचा आरोप होता.

मीडियाने हा प्रश्न उचलून धरला. विरोधकांनी विधानसभा डोक्यावर घेतली. अजित पवार यांच्या विरुद्ध कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे आरोप वाढत चालले होते. या दबावामुळे अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी देखील या राजीनाम्याला हिरवा कंदील दाखवला.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली.

काही दिवसातच विजय पांढरे हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे हिरो बनले होते. कोणी त्यांना पाटबंधारे खात्याचा सिंघम म्हणत होतं तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मात्र त्यांना मनोरुग्ण असल्याचा आरोप करत होते.

विजय पांढरे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लाखानवाड्याचे.

त्यांनी पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. १९८० साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले आणि पाटबंधारे खात्यात सहायक अभियंता म्हणून रुजू झाले. कालांतराने कार्यकारी अभियंता म्हणून नेमणूक झाली.

काही वर्षांनंतर त्यांना ‘मेरी’चे मुख्य अभियंता म्हणून जबाबदारी देण्यात आली. या पदावर ते सात वर्ष कार्यरत होते. मध्यंतरी त्यांची या संस्थेचा एक भाग असलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधिनीच्या (मेटा) मुख्य अभियंतापदी नियुक्ती झाली. जलसंपदाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाचेही काम त्यांनी प्रदीर्घ काळ पाहिले.

फक्य जलसंपदा खात्यातील अभियंता एवढीच त्यांची ओळख नव्हती तर संतसाहित्याचे अभ्यासक म्हणून देखील त्यांना ओळखलं जायचं. ज्ञानेश्वरी’च्या पद्यमय स्वरूपाचे सोप्या मराठीत रूपांतर, मूळ संस्कृत भाषेतील भगवद्गीतेचे मराठीत भाषांतर, ‘अमृतानुभव’ आणि ‘चांगदेव पासष्टी’ आदी पुस्तकांच्या भाषांतराचे कामही त्यांनी केले.

जानेवारी २०१२ मध्ये नाशिक येथे संत साहित्य संमेलन झाले होते तेव्हा या संमेलनात पांढरे यांनी ‘शासकीय अधिकारी व अध्यात्म’ या विषयावर व्याख्यान दिले. या व्याख्यानातही त्यांनी शासकीय अधिकारी अध्यात्माशी जोडले गेले तर चुकीचे काम करण्यास धजावणार नाहीत, असे सांगितलं होतं.

साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल ज्येष्ठ कविवर्य मंगेश पाडगावकर यांनीही त्यांचा गौरव केला होता.

हा संत साहित्याचा वारसा त्यांना कॉलेज जीवनापासून लाभला होता. विवेकानंदांच्या विचारांनी भारावून गेलेले पांढरे आपल्या जीवनातही साधेपणा जपण्याचा पुरस्कार करणारे म्हणूनओळखले जायचे. मोठ्या पदाच्या सरकारी नोकरीत असूनही त्यांनी गावी मात्र साधंच घर बांधलं होतं. तिथेच त्यांची ९ एकर जमीन आहे. नोकरीत असताना दर शनिवार रविवार त्यांचा शेतावर फेरफटका असायचा. तोही एसटी बसने.

त्यांना दोन मुले आहेत मात्र दोघांनाही त्यांनी जास्त शिकू दिलेलं नाही. आजच्या शिक्षणाचा आणि जगण्याचा काही संबंध नाही. शिक्षणाने माणूस शिक्षित होतो शहाणा नाही असे त्यांचे रोखठोक विचार आहेत. म्हणूनच त्यांनी लिहिण्या वाचण्या इतपत शिक्षण झाल्यावर मुलांना शाळा सोडायला लावली व शेतात गुंतवले.

अगदी शासकीय सेवेत असताना देखील ते गावी आले की मुकुंदराज संस्थानच्या मंदिरात ज्ञानेश्वरीच्या पारायणाला उभे राहात.

त्यांच्या पत्रामुळे सिंचन घोटाळा उघडकीस आला आणि अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला. पुढच्या काहीच दिवसात विजय पांढरे यांनी देखील सेवानिवृत्ती स्वीकारली. माझ्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्यामुळे मी हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

त्याकाळात त्यांना अँटी करप्शन मुव्हमेंटचा हिरो म्हणून ओळखलं जात होतं. त्यांनी राजकारणात यावं म्हणून अनेक पक्षांनी प्रयत्न केले. अखेर अण्णा हजारेंच्या आंदोलनातून प्रसिद्ध झालेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी मध्ये विजय पांढरे यांनी प्रवेश केला.

दरम्यानच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांनी काढलेल्या श्वेतपत्रिकेत काहीही निष्पन्न झालं नाही. अजित पवार पुन्हा मंत्रिमंडळात आले.

२०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपने विजय पांढरे यांना नाशिक येथे छगन भुजबळ यांच्या विरुद्ध तिकीट दिले. मात्र विजय पांढरे यांना या निवडणुकीत फक्त १% इतकंच मतदान झालं. त्यांचा मोठा पराभव झाला. मोदी लाटेत सगळ्यांचीच धूळधाण झाली होती.

पुढे त्याच वर्षी राज्यातील पृथ्वीराज चव्हाण यांचं देखील सरकार कोसळलं, भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. विरोधी पक्षात असताना त्यांनी बैलगाडी भरून अजित पवार यांच्या विरोधात पुरावे आणले होते. सगळ्यांना वाटलं की आता तपासाला गती येणार संबंधितांना शिक्षा मिळणार. पण अनेक वलग्ना करूनही काही निष्पन्न झालं नाही.

२०१९ च्या निवडणुकीनंतर तर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या सोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयोग केला. हा प्रयोग फार काळ टिकला नाही मात्र या तीन दिवसाच्या सरकारमध्ये फडणवीस यांनी अनेक प्रकरणात अजित पवार यांना क्लीन चिट दिली. पुढे नव्या ठाकरे सरकारमध्ये देखील अजित पवार उपमुख्यमंत्री बनले.

सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवारांनी कोणताही घोटाळा केला नाही असे प्रतिज्ञापत्रच मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सादर केले. या नंतर या संपूर्ण प्रकरणावर पडदाचं पडला.

आज विजय पांढरे काय करतात?

निवृत्ती नंतर त्यांनी आपलं आयुष्य संत साहित्याच्या अभ्यासासाठी वाहून घेतलंय. त्यांनी ज्ञानेश्वरी नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केलेत. याचाच भाग म्हणून त्यांनी एक युट्युब चॅनेल देखील सुरु केलं आहे. साधेसे कपडे गळ्यात पांढरा गमछा घातलेले विजय पांढरे ज्ञानेश्वरीच्या ओवींच निरुपण कराताना या युट्युब व्हिडीओ मध्ये दिसतात.

मध्यंतरी आम आदमी पार्टीमधूनही त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. विजय पांढरेंनी फक्त आरोप केले मात्र त्यांच्या आरोपात दम नव्हता, त्यामुळे साधा एक शिपाई देखील अटक झाला नाही असं आपच्या नाराज कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. 

विजय पांढरे मात्र राजकारण व आंदोलन अशा गोष्टीपासून अनेक कोस दूर येऊन पोचलेत. जरी कोणी पत्रकार त्यांच्याकडे मुलाखतीसाठी गेले तरी ते  विपश्यना जे कृष्णमूर्ती यांचे विचार गीतेचा अंतरंग युनिव्हर्सल कॉन्स्कीक्वेन्सेस अशा गोष्टींवर बोलतात.

न्यायालयांपासून ते मीडियापर्यंत सध्याची सगळी सिस्टीम भ्रष्टाचाराला पोषक काम करत आहे असा त्यांचा आजही आरोप आहे आणि यामुळेच घोटाळे पुढे येत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे.

कायम अध्यात्मिक व आकलनीय बोलणाऱ्या विजय पांढरे यांच्या ‘एवढे पैसे लागतातच कशाला’ या प्रश्नाच उत्तर मात्र कोणीही देऊ शकत नाही.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.