विजय रुपाणी यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामागे भाजपची नेमकी गणित काय आहेत?

गुजरातच्या राजकारणात मोठ्या मोठ्या राजकीय हालचाली चालू आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा सादर केला आहे.  विजय रुपानी यांच्या अचानक आलेल्या राजीनाम्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बालेकिल्ला असणाऱ्या गुजरात मध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी एका अनपेक्षित धक्का म्हणजे विजय रूपाणी यांचा हा राजीनामा असल्याचा म्हणलं जातंय. 

रुपानी यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी भाजपसमोर तीन पर्याय दिले आहेत. एक तर पुढचा उत्तराधिकारी नियुक्त करणे, राज्यात राष्ट्रपती राजवट आणणे, किंवा मग नियोजित वेळेच्या आधीच विधानसभा निवडणुका घेणे.

सूत्रांच्या सांगण्यानुसार, पुढील उत्तराधिकारी म्हणून मनसुख मांडविया ज्यांनी नुकतेच जुलैमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून शपथ घेतली होती, त्यांची रुपाणी यांच्या जागेवर वर्णी लागू शकते. विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते असंही बोललं जातंय.

मनसुख मांडवीया, नितीन पटेल यांच्याशिवाय पुरुषोत्तम रूपाला यांची नावेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दिसत आहेत.

मात्र मुख्यमंत्रीपदाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर चढवला जाईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

असे मानले जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या संमतीनंतर यासंदर्भात घोषणा होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपने रविवारी गांधीनगरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते अशी शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत भाजप गुजरातमध्ये हरता हरता वाचला होता. शेवटच्या क्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः गुजरातमध्ये आघाडी घेतली. त्यानंतर तेथे अगदी थोड्याच फरकाने भाजपने विजय मिळवला होता.

विजय रुपाणी यांची राजकीय कारकीर्द

विजय रमणिकलाल रुपाणी हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून ते ७ ऑगस्ट २०१६ पासून गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री आणि राजकोट पश्चिमचे प्रतिनिधित्व करणारे गुजरात विधानसभेचे सदस्य आहेत. गुजरात राज्यात त्यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम त्यांनी पाहिलं. थोडक्यात त्यांना भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा म्हणून ओळखलं जातं.

१९९६ मध्ये ते राजकोटचे महापौर होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा रुपाणी हे राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. तर २००६ ते २०१२ या काळात रुपानी राज्यसभा खासदार होते.  यानंतर फेब्रुवारी २०१६ ते ऑगस्ट २०१६ पर्यंत रुपाणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देखील होते. त्यानंतर त्यांनी आनंदीबेन पटेल यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार अशी मंत्रिपदं भूषवली होती.

त्यानंतर त्यांनी ऑगस्ट २०१६ मध्ये त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. २६ डिसेंबर २०१७ रोजी रूपाणी यांनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. रुपानी हे नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या जवळचे मानले जातात.

भाजपने गुजरातमध्ये १८२ पैकी ९९ जागा जिंकून बहुमत मिळवले. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत रुपाणी यांची विधिमंडळ पक्षाचे नेते आणि नितीन पटेल यांची उपनेते म्हणून निवड करण्यात आली होती.

अचानक राजीनाम्याचं कारण काय ?

१. आजारपण?

रुपाणी यांनी राजीनामा देण्याचं कारण हे त्यांच्या आजारपण असल्याचं सांगितलं जातंय मात्र हे कारण कितपत खरं याबाबतीत शंका आहे. शिवाय याबाबत कुणीही दुजोरा दिला नाही. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

२. आगामी निवडणुकांची मोर्चेबांधणी?

रुपानी यांचा राजीनामा हा आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर आलेला आहे. त्यामुळे अशी जोरदार चर्चा आहे कि, निवडणुकांची मोर्चेबांधणी म्हणून त्यांचा राजीनामा पार्टी हायकमांड ने मागितला असू शकतो.

३. पटेल समाजाला नेतृत्व?

गुजरातमधील पटेल समाज भाजपवर नाराज असल्याचं स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपला जर पटेल समाजाची नाराजी दूर करायची असेल तर पक्षाला पटेल समाजाचा उमेदवार देणे भाग आहे. अशीच व्यूवहरचना भाजपने आखलीय अशी राजकीय वर्तुळात बोललं जातंय.

त्याचाच एक भाग म्हणून रुपाणी यांचा राजीनामा घेण्यात आला असून त्यांच्या जागी नितीन पटेल यांना गुजरातचे नवे मुख्यमंत्री बनवले जाऊ शकते. म्हणजेच, पटेल समाजातून मुख्यमंत्री देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.

४. कोरोनामुळे नाराजी : 

तर विरोधक रुपाणी यांच्या राजीनाम्यावर म्हणत आहेत कि, भाजप जनतेची दिशाभूल करत आहे. कोरोनामधील अराजकता आणि अपयशामुळे लोकांमध्ये नाराजी होती आणि त्यामुळेच पक्षाने रुपानी यांची उचलबांगडी केली आहे. 

त्याचदरम्यान एक गौप्यस्फोट समोर आला होता. याच गौप्यस्फोटामुळे गुजरातमध्ये कोरोनाच्या मृत्यू झालेल्या आकडेवारीविषयी पुन्हा शंका व्यक्त होऊ लागली होती. त्याच झालं असं कि, मे महिन्यात भास्कर समूहाचे गुजराती भाषिक वृत्तपत्र दिव्य भास्कर या वृत्तपत्रानं गुजरातमध्ये मागच्या ७१ दिवसात मृत्यू झालेल्यांविषयी एक आकडेवारी जाहिर केली होती.

यात गुजरातमध्ये कोरोनामुळे होणारे मृत्यु लपवले जात होते, असा दावा केला होता. दिव्य भास्कर या समूहाच्या आकडेवारी नुसार सरकारच्या आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष मृत्यू झालेल्यांचा आकडा हा १० ते १५ टक्के जास्त होता.

सोबतच राज्यावर कोरोना परिस्थिती हातळण्यात अपयशी ठरत असल्याच्या टिका, मृत्यूचे आकडे लपवले असल्याचे आरोप हे सातत्यानं होतं असल्याचं दिसून आलं होतं आहेत, यामुळे अगदी न्यायालयानं देखील राज्य सरकारला अनेकदा सुनावलं होतं. त्यामुळे देखीलं रुपानी यांचा राजीनामा पक्षाने मागितला असू शकतो.

नवीन नाव कोणाचे?

रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर आगामी मुख्यमंत्री म्हणून सर्वात जास्त चर्चा असलेले नितीन पटेल याचं नाव समोर येतंय. कारण आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. त्यामुळे रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमध्ये नेतृत्व बदलण्याची अटकळ चालू होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रात्री अचानक अहमदाबादला पोहोचले. त्यांच्या गुजरात भेटीचे कोणतेही निश्चित वेळापत्रक नव्हते. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बरोट अमित शहा यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहोचले होते.

असं सांगितलं गेलं कि ते कौटुंबिक कामानिमित्त आले आहेत. मात्र आता स्पष्ट झालं की ते कदाचित सत्ताबदलाच्या संदर्भातच गुजरातमध्ये पोहोचले असतील. त्यात आजच सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अहमदाबादमधील सरदारधाम भवनचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन झाले होते. सुमारे एक तास चाललेल्या या कार्यक्रमात विजय रुपाणी मुख्यमंत्री म्हणून सहभागी झाले होते,

पण दुपारी ३ च्या सुमारास अचानक राजीनामा देण्याची घोषणा करून रुपाणी यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

भाजप शासित राज्यांमध्ये राजीनामा देणारे विजय रुपाणी हे तीन महिन्यांत चौथे मुख्यमंत्री बनले आहेत. जुलैमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची बदली झाली. त्यानंतर जुलैमध्येच उत्तराखंडमध्ये दोन वेळा मुख्यमंत्री बदलले गेले. त्रिवेंद्र रावत यांच्या जागी प्रथम तीरथ सिंह आणि नंतर त्यांच्या जागी पुष्करसिंग धामी यांच्याकडे कमान सोपवण्यात आली होती.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.