राजकारणात संधी दिलेल्या नेत्यासोबतचं वाद घालत विजय वडेट्टीवारांनी शिवसेना सोडली होती…

महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदेपदासाठी आमदार विजय वड्डेटीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने या बाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. राज्याच्या राजकारणात सुमारे चार वर्षांनंतर काँग्रेसकडे हे पद चालून आले आहे.  विधीमंडळाच्या अधिवेशनाला जेमतेम चारच दिवस उरले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेता निवडला आणि यात वर्णी लागली ती वडेट्टीवारांची.

या पदासाठी काँग्रेसचे अनेक वजनदार नेते दिल्लीत फिल्डिंग लावत होते मात्र  त्यात वडेट्टीवारांनी बाजी मारली आणि पद खेचून वडेट्टीवारांनी काँग्रेस हायकमांडमधील वट दाखवून दिलाय.

विजय वडेट्टीवार यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया…

वडेट्टीवार यांचा जन्म गोंडपिपरीजवळील करंजी या खेडेगावातला. वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजी गावचे सरपंच होते. तडकाफडकी आणि कडक निर्णय घेण्यासाठी गावच्या इतिहासातील एकमेव सरपंच म्हणून त्यांना अजूनही ओळखलं जातं. त्यातुनच त्यांनी गावात आपला वेगळा ठसा निर्माण केला होता.

मात्र अचानक नामदेवरावांचे निधन झाले, अन्‌ सगळीच जबाबदारी विजय वडेट्टीवार यांच्या खांद्यावर येवून पडली. कमी वयातच आई कमलाबाई अन्‌ दोन लहान भाऊ यांचीही जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आली. गोंडपिपरीच्या जनता विद्यालयातून शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी गाव सोडले. ते गडचिरोलीत राहायला आले.

एकीकडे कुटुंबांची जबाबदारी आणि दुसरीकडे शिक्षण अशा दोन्ही भूमिका ते पार पाडत असतानाच १९८० च्या दरम्यान ते कॉंग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेत सक्रिय झाले आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला. या काळात नव्याने स्थापन झालेल्या भाजपला कडाडून विरोध करणारा कार्यकर्ता म्हणून वडेट्टीवार आपली ओळख तयार करत होते.

अशातच त्यांना आता भविष्यातील राजकारण टप्प्यात दिसत होते, सोबतचं बाळासाहेबांच्या विचाराने आणि वक्तृत्वाने ते प्रेरित झाले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात शिवसैनिक म्हणून त्यांनी जोमाने पक्षाचा कामाला सुरुवात केली. बाळासाहेबांचे स्वप्न असलेल्या घर तिथं शिवसैनिक यासाठी ते प्रयत्न करत होते.

यातून त्यांना शिवसेनेत छोटी – मोठी पद देखील मिळत गेली. वडेट्टीवार यांच्या पक्ष कार्याची मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा दखल घेतली ती शिवसेनेचे नेते गजानन किर्तिकर यांनी. किर्तिकर यांनीच वडेट्टीवार यांना पहिली संधी दिली आणि ते नेतृत्व म्हणून उभं राहायला सुरुवात झाली.

यानंतर गडचिरोली जिल्हा परिषदेत त्यांना तिकिट देण्यात आलं आणि वडेट्टीवार यांनी देखील विजय मिळत किर्तिकर यांचा विश्वास सार्थ ठरवला. काही काळ शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख म्हणूनही काम पाहिलं.

१९९६ मध्ये युतीचे सरकार असताना वडेट्टीवार यांना महाराष्ट्र राज्य उपक्रमांचे वनविकास महामंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. जवळपास २ वर्ष ते या पदावर होते. पुढे त्यांच्या वाढत्या पक्ष कार्याची दखल घेऊन १९९८ साली त्यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले.

या नंतरच्या काळात नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यातुनच राणे आणि वडेट्टीवार यांच्यातील सलोखा वाढत गेला, राणे देखील वडेट्टीवार यांना विदर्भात ताकद देत होते. शिवसेनेचा चेहरा म्हणून पुढे आणू लागले होते. त्यातुनच वडेट्टीवार राणे गटातील नेते म्हणून शिवसेनेत ओळखले जावू लागले.

याचा परिणाम त्यांच्या स्थानिक राजकारणावर देखील झाला. शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात दोन गट तयार झाले. त्यातुन त्यांचे वाद देखील होत असतं. केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर पक्षाच्या मुख्य वर्तुळ देखील वडेट्टीवार यांचे वादविवाद होऊ लागले.

त्यांचा सगळ्यात मोठा वाद झाला आण तो ज्यांनी त्यांना संधी दिली त्या गजानन किर्तिकर यांच्या सोबतचा. तो वाद महाराष्ट्रात आणि विषेशतः विदर्भात बराच गाजला.

एकीकडे राणे गट म्हणून ओळख तर होतीच पण त्या सोबतचं असं देखील सांगितलं जातं की,

छगन भुजबळांना शिवसेनेपासून फुटण्यासाठी हिंमत देणाऱ्यांमध्ये विदर्भाचेच नेते आघाडीवर होते. त्यामुळे शिवसेनेचा वैदर्भीयन नेतृत्वावरील विश्वास कमालीचा कमी झाला. तो वैदर्भीय नेत्यांना पुन्हा जिंकता आला नाही.या दोन्ही कारणांमुळेचं शिवसेना नेतृत्वाकडून विदर्भात नेत्यांना डावलून संपर्कप्रमुख आणि प्रभारींना ताकद दिली जायची.

पण याच पद्धतीवर बोट ठेवत वडेट्टीवार म्हणतात,

शिवसेनेत संपर्क प्रमुख खूपच ताकदवान बनले. त्यांचे आणि स्थानिक नेतृत्वाचे अनेक मुद्यावरून खटके उडत असत. मुंबईतील नगरसेवक विदर्भात प्रभारी म्हणून येत असत. ते नगरसेवकाच्या पध्दतीने प्लानिंग करत आणि आमदारांना आदेश देत. मोर्चासाठी पत्रके काढली जायची तेव्हा त्यात मुंबईच्या नगरसेवकाचे नाव आधी आणि स्थानिक आमदाराचे नाव नंतर असे, त्यातून किर्तिकर यांच्यासोबत खटके उडत.

अशातच राणे देखील शिवसेनेत अस्वस्थ झाले होते. त्यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत वाद होवू लागले होते. त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी राणेंसोबत सेना सोडण्यात ९ आमदार सोबत होते.

पण आघाडीवर होते विजय नामदेवराव वडेट्टीवार.

नंतर नारायण राणे यांच्यासोबत वडेट्टीवारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. यानंतर कॉंग्रेसमध्येच त्यांनी चढत्या क्रमाने पद मिळवली. यात २००८ – ०९ याकाळात ते जलसंपदा राज्यमंत्री होते. शिवाय आदिवासी विकास, पर्यावरण आणि वन या खात्यांचे राज्यमंत्री पद देखील त्यांच्याकडे होते.

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिमूर विधानसभेतून ते दुसऱ्यांदा विजयी झाले. २०१० मध्ये अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा विविध खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. या दरम्यान ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

२०१४ मध्ये त्यांचा ऐनवेळी म्हणजे अगदी निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला. चिमूर ऐवजी त्यांना ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास सांगण्यात आलं. मात्र तरीही त्यांनी निवडणूक लढवून बहुमताने विजय मिळवला. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

याच काळात राणे यांनी पक्ष नेतृत्वावर टिका करत कॉंग्रेस सोडली. पण विजय वडेट्टीवार यांनी कॉंग्रेसमध्येच थांबत एकनिष्ठतेचा परिचय दिला. सोबतचं लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला संपूर्ण राज्यात अपयश आलं. अपवाद होता तो विदर्भातला. वडेट्टीवार यांच्याच नेतृत्वात त्यावेळी काँग्रेसचे सुरेश धानोरकर हे एकमेव खासदार निवडून आले.

या सगळ्याचा परिणाम म्हणूच राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जून २०१९ मध्ये वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या विधानसभा क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरीच मोठी सभा घेतली होती, पण तरीही वडेट्टीवार यांनी आपला गड राखलाचं. सोबतचं अनेक आमदारांना निवडून आणलं.

मात्र सरकारमध्ये आल्यानंतर मात्र राज्याच्या विरोधी पक्ष नेत्याचा सन्मान राखला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. आज ही विजय वडेट्टीवार ही खंत बोलून दाखवतात.

कॅबिनेट मंत्रीपद मिळाल असलं तरी ते कमीतकमी महसूलमंत्री पदाची अपेक्षा ठेवून होते. मात्र त्यांना तुलनेनं कमी महत्वाचं असं मदत आणि पुनर्वसन सोबतच ओबीसी खातं देण्यात आलेलं. सरकार पडल्यांनंतर देखील वडेट्टीवारांना पक्ष संघटनेत विशेष अशी जबाबदारी देण्यात आली नव्हती. मात्र आता विरोधीपक्ष नेते पद त्याच्याकडे गेलं आणि त्यांचं पुनर्वसन झालं असंच म्हणावं लागेल.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.