शेवटच्या क्षणी वातावरण फिरवून छत्रपती घराण्याच्या पहिल्या खासदार निवडून आल्या

आज संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून राज्यात चर्चा सुरू आहेत. शिवसेनेमार्फत कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव समोर आल्याने आत्ता संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेकडे सर्वांच लक्ष लागून राहिलेलं आहे.

संभाजीराजे आपण अपक्षच निवडणूक लढवणार यावर ठाम आहेत. शिवसेनेने दूसरा उमेदवार दिला तर मात्र संभाजीराजेंना ही निवडणूक अडचणीची जाईल अस बोललं जात आहे.

मात्र एक वर्ग असाही आहे जो संभाजीराजे छत्रपती देखील मोक्याच्या क्षणी सुत्र हालवतील यावर ठाम विश्वास ठेवून आहेत अन् त्यांना पाठबळ देतेय ती ही स्टोरी…

कारण इतिहास अस सांगतो की राजकारणात छत्रपती घराण्याची एन्ट्रीचं मुळात अचानक गेम चॅन्जेर करणारी ठरली होती..

गोष्ट आहे १९६७ सालची.

देशभरात लोकसभा निवडणूक होत होत्या. पहिल्यांदाच इंदिरा गांधींच्या नेतृत्वाची परीक्षा होणार होती. सरदार पटेल, नेहरू, लाल बहादूर शास्त्री अशा दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत इंदिरा गांधींच्या सारख्या अनुभव नसलेल्या तरुण नेत्याच्या हातात पक्ष आला होता.

काँग्रेसचे जुने नेते इंदिरा गांधींच्या कारभारावर खुश नव्हते पण त्यांनीच त्यांना पंतप्रधान बनवलेलं त्यामुळे त्यांच्याजवळ दुसरा पर्याय नव्हता.

अशावेळी इंदिराजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले नेते म्हणजे यशवंतराव चव्हाण. दोघेही समवयस्क होते. यशवंतरावांचा नेहरूंच्या विचारधारेवर त्यांचा विश्वास होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये इंदिरा गांधींनी मदत केली होती असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणूनच नेहरूंनी हाक दिल्यावर ते मुख्यमंत्रीपद सोडून संरक्षण मंत्री झाले. आणि आता इंदिरा गांधीच्या सोबत उभे होते.

इंदिरा गांधींची नवी टीम उभी करणे चालू होतं. गृहमंत्रालय सांभाळणाऱ्या यशवंतरावांकडे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जबाबदारी सोपवण्यात अली होती. अनेक नव्या नेत्यांना तिकीट दिल जात होतं.

यातच नाव होत माजी उपलष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एस.पी.पी. थोरात

दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून भारतीय आर्मीमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला होता. अनेक शौर्यपदके मिळवली होती. दक्षिण कोरियाच्या मदतीला गेलेल्या शांती सेनेचं देखील त्यांनी नेतृत्व केलं होतं.

१९६२ साली चीनचे भारताशी युद्ध झाले तेव्हा पूर्व आघाडीचे थोरात सेनापती होते. हे युद्ध सुरु होण्यापूर्वी सैन्याच्या तयारीबद्दल त्यांनी अनेक सूचना तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांकडे पाठवल्या होत्या. मात्र कृष्ण मेनन यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. चीनच्या युद्धात आपल्याला पराभव स्वीकारावा लागला.

पुढे कृष्ण मेनन यांच्या जागी आलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्याशी त्यांचे निवृत्तीनंतर देखील चांगले सुर जुळले. यशवंतराव चव्हाण जेव्हा गृह मंत्री बनले तेव्हा त्यांची इच्छा होती कि जनरल थोरात यांच्यासारख्या रणांगणाचा अनुभव  असलेल्या सेनानीच्या हातात भारताचं संरक्षण मंत्रालय देण्यात यावं.

यासाठीच त्यांनी इंदिरा गांधींशी बोलून जनरल थोरात यांना लोकसभेचे तिकीट मिळवून दिलं.

जनरल थोरात हे मुळेच कोल्हापूर जिल्ह्यातील वडगावचे. त्यांच्या घरच्या मतदारसंघात म्हणजेच हातकणंगले मधून त्यांना काँग्रेसच तिकीट देण्यात आलं. त्यांनी अर्ज भरला आणि तिथेच निम्मी लढाई जिंकली होती. यशवंतराव चव्हाणांच्या सारखा दिग्गज नेता त्यांच्या पाठीशी होता. हातकणंगलेच्या परीसरात प्रचार करताना खेडोपाडी तुम्ही भावी संरक्षण मंत्र्याला मतदान करत आहात यावर जोर देण्यात आला होता. आपल्या मातीचा सुपुत्र एवढ्या मोठ्या स्थानावर जाणार म्हणून ऐकणाऱ्या प्रत्येकाला अभिमान वाटत होता.

दुसऱ्या बाजूला विरोधकांकडे उमेदवारच नव्हता. तस बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचं अस्तित्व त्याकाळात जाणवण्या इतपत होतं. शेकापच्या चळवळीला सुरवात झाल्यापासून या पक्षाला अनेक मोठमोठे नेते कोल्हापुराने दिले. पण थेट जनरल थोरात यांना टक्कर घेईल असा एकही नेता तेव्हा निवडणुकीस तयार नव्हता.

शेवटी शेकापने आपलं ब्रम्हास्त्र बाहेर काढलं. छत्रपती घराण्यातील महाराणी राजमाता विजयमाला राजे यांना हातकणंगले मधून थोरात यांच्या विरुद्ध तिकीट दिल.

छत्रपती शाहू महाराजांच्या स्नुषा, राजाराम महाराजांच्या पत्नी विजयमालाराजे म्हणजे कोल्हापूरकरांसाठी आदराचे स्थान होत्या. त्यामउळे त्यांनी जनरल थोरात यांना मोठे आव्हान निर्माण केले. बघता बघता एकतर्फी वाटणारी हि निवडणूक संपूर्ण देशासाठी लक्षवेधी ठरली. दिल्ली मुंबई वरून पत्रकार हातकणंगले, इचलकरंजी परिसरात तळ ठोकून बसले.

जनरल थोरात हे राजकारणी नसल्यामुळे त्यांनी आपला प्रचार देशाचे संरक्षण व केंद्रातील मुद्द्यावरून केला. या उलट महाराणी विजयमाला राजे या स्थानिक प्रश्नांवर बोलत होत्या. खेड्यापाड्यातील जनतेला त्यांची भाषा आपलीशी वाटत होती. त्यांचा प्रचार प्रचंड गाजला. 

याचाच परिणाम यशवंतराव चव्हाणांनी जंग जंग पछाडूनही काँग्रेस चे संरक्षणमंत्री पदाचे उमेदवार जनरल एस.पी.पी.थोरात आपल्या घरच्या मैदानात धाराशायी झाले. विजयमाला राजे यांनी त्यांच्यापेक्षा ४४ हजार मते जास्त घेतली. 

इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती घराण्यातील व्यक्ती लोकशाहीचे मंदिर समजल्या जात असलेल्या संसदेत प्रवेशकर्त्या झाल्या.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.