दुष्काळी भागाला पाणी मिळवण्यासाठी पहिल्यांदा मिळालेली मंत्रीपदाची खुर्ची पणाला लावली होती.

ते साल होतं १९८३ चं.

वसंतदादा पाटील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहू लागले. राज्याची धुरा हाती आल्यानंतर अनेक नवीन शिलेदारांच्या हाती जबाबदारी देण्याचं काम वसंतदादांनी केलं.

दादांच्या या नव्या दमाच्या टिममधलं एक नाव होतं ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील.

विजयसिंह मोहिते पाटलांवर पाटबंधारे व लाभक्षेत्र विकास खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती.

वसंतदादांनी विजयसिंह मोहिते पाटलांवर विश्वास टाकण्याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे त्यांचे आणि सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे असणारे संबंध. दोघंही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील शिलेदार होते. दोघेंही सहकारातून विकासाचा मार्ग आखणारे नेते होते. त्यामुळेच या दोन्ही नेत्यांमध्ये विशेष जिव्हाळा होता.

विजयसिंह मोहिते पाटलांना राजकिय ताकद देण्याच्या हेतूने व विश्वासाने राज्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. विजयसिंह मोहिते पाटलांची ही पहिलीच संधी असल्याने त्यांच्यावर पदाची विशेष जबाबदारी होती.

पाटंबधारे व लाभक्षेत्र विकास मंत्रालयाची जबाबदारी लातूरच्या शिवाजीराव निलंगेकरांकडे होती. तर त्याच खात्याच्या राज्यमंत्रीपदाची जबाबदारी विजयसिंह मोहिते पाटलांकडे होती.

साल १९८४ उजाडलं.

या काळात राज्यभर नवीन प्रकल्प आकारास येत होते. त्यापैकी नीरा देवघर धरणाच्या प्रकल्पाचे काम चालू होते. १२.२६ टिएमसी क्षमतेचे धरण पुणे जिल्ह्यातील नीरा नदीवर बांधण्यात आले होते. त्या धरणांचे पाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी पाटबंधारे खात्याचा आराखडा मांडण्याचे काम चालू होते. पाटबंधारे अधिकाऱ्यांनी विस्तृत आराखडा बनवून धरणांचे लाभक्षेत्र निश्चित केले.

तो आराखडा पाटबंधारे खात्याच्या सचिवांनी प्रथम विजयसिंह मोहिते पाटलांपुढे मंजूरीसाठी पाठवला. 

विजयसिंह मोहिते पाटलांनी आराखडा पाहिला मात्र त्यावर मंजूरीसाठी सही केली नाही. काही दिवसांनी सचिवांनी ही गोष्ट खात्याचे मंत्री शिवाजीराव निलंगेकर यांच्या कानावर घातली. निलंगेकरांनी तीच फाईल पुन्हा विजयसिंह मोहिते पाटलांकडे पाठवण्याची सूचना केली.

विजयसिंह मोहिते पाटलांनी सही न करता पुन्हा ती फाईल परत पाठवली. ही गोष्ट निलंगेकरांच्या कानावर जाताच त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांना भेटून फाईल मंजूर न करण्याचे कारण विचारले,

तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले,

साहेब, जोपर्यन्त माझ्या मतदारसंघातच समावेश धरणाच्या कार्यक्षेत्रात होत नाही तोपर्यन्त मी त्या फाईलवर सही करणार नाही.

विजयसिंह मोहिते पाटलांचे मुद्दे नैतिकतेला धरून होते. पुणे जिल्ह्यात धरण असल्याने त्या जिल्ह्यातील भोर व सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्याचा समावेश नीरा देवघर धरणाच्या कार्यक्षेत्रात केला गेला होता मात्र त्यातूनच नीरा नदीच्या खोऱ्यातील माळशिरस तालुका मात्र वगळण्यात आला होता.

विजयसिंह मोहिते पाटील सही करत नसल्याची गोष्ट निलंगेकरांनी वसंतदादांच्या कानावर घातली.

मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतदादांनी तडकाफडकी विजयसिंह मोहिते पाटलांना बोलवून घेतले व फाईलवर सही न करण्याचा जाब विचारला,

तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले,

माझ्या वडिलांनी दुष्काळाने होरपळलेल्या माळरानाचं नंदनवन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न आजही अपूर्ण आहे. नीरा देवघर धरणांचं पाणी माझ्या मतदारसंघाच्या शिवेवर येईल त्याचवेळी माझ्या भागातील शेतकरी मला जाब विचारेल. त्यांना मी काय उत्तर देवू. माझी बांधिलकी मंत्रिपदाच्या खुर्चीत नाही तर दुष्काळामुळे व नियतीशी झुंजण्यातच शेतकऱ्यांशी आहे. माझ्या एका निर्णयाने त्यांच्या फाटक्या आयुष्याचा साधा एक ठिगळ जरी मी लावू शकलो तरी माझ्या आयुष्याचं सार्थक असेल.

विजयसिंह मोहिते पाटलांचा हा प्रतिवाद ऐकताच वसंतदादांनी सचिवांना माळशिरस तालुक्याचा समावेश धरणाच्या लाभक्षेत्रात करण्याचा आदेश दिला.

माळशिरस तालुक्यासाठी २.९७ टिएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात आला. अतिरिक्त पाण्यासाठी धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

पुढे जेव्हा वसंतदादा पाटलांच्या नंतर शिवाजीराव निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांचा समावेश आपल्या मंत्रीमंडळात केला.

कृषी, पाटबंधारे, युवक क्रिडा, मदत व पुर्ववसन अशा जबाबदार खात्यांवर कॅबिनेट मंत्री करून विजयसिंह मोहिते पाटलांच्या करारी बाण्याची पोचपावतीच त्यांना देण्यात आली.

  • मिलिंद पाटील

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.